भाग ३१ - यात्रा सफल संपूर्ण
पहाटे गजर वाजला आणि जाग आली.. बघितलं तर लक्षात आलं मी चक्क स्लिपिंग बॅगमधे नाही तर AC डब्यात ते पण वरच्या बर्थवर आहे. अरे हो, यात्रा संपली नाही का,.. आता काहीच वेळात सांगली येईल, गडबडीने खाली उतरले.सामान गोळा करून दाराजवळ येऊन थांबले. रेल्वेने नांद्रे स्टेशन सोडलं होतं... म्हणजे अजून वेळ आहे तर
पण तरीही तशीच उभी राहिले सामान घेऊन.. एक भली मोठ्ठी बॅग, एक निळी हॅडबॅग, सॅक आणि बॅगेत न बसल्याने बाहेर गुंडाळी करून आणलेली स्लिपिंग बॅग... किती ते सामान.. जाताना आटोपशीर वाटत होतं आज पसरलेलं वाटलं.
यात्रेची सुरुवात फॅसिलिटेटर मिटिंग, पहिला दिवस, चेतना गाला सिन्हांनी साधलेला संवाद, रेल्वेतली पहिली रात्र, मग सकाळ,मग १५ दिवसात विविध रोल मॉडेल, त्या चर्चा, ती रेल्वे आणि रेल्वे प्लॅटफॉर्मवर केलेली जेवणं, ते start up, उद्यमीता, ऐकलेले सेशन्स, सांस्कृतिक कार्यक्रम, सगळं साठवून मी आता सांगलीत खूप 'मोठ्या' सामानासह उतरतीय अशी जाणीव झाली आणि भल्या थंडीच्या पहाटे शहारा आला अंगावर.
अमर, माझा नवरा अर्थातच आणायला स्टेशनवर आला होता, घरी मुली पण खूप वाट बघत होत्या, आई परत आल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर होता.. मला पण खूप खूप खूप काही सांगायचे होते पण आवाज फुटत नव्हता. जवळपास १८ दिवसांनी मी मला लागते तशा coffee चा घोट घशाखाली घालत, शेकत आवाजासाठी प्रयत्न केला पण व्यर्थ... आणि मग सुरू झाले आवाज परत मिळवण्यासाठी सर्व प्रयत्न...
विपश्यना की काय ते विनासायास घरीच घडत होती, घडणार होती. पुढचे १५ दिवस मौनव्रत....
मग त्यातूनच लिखाणाची कल्पना पुढे आली. ब्लॉग लिहायला सुरुवात केली..
अमरने तर दिवसाला एक ब्लॉग लिहून झालाच पाहिजे हा आग्रह धरला. मी फक्त लिखाण करून, फोटो शोधून त्याला पाठवून द्यायचे. पुढचे संस्कार किंवा ब्लॉग पब्लिश करायचे सोपस्कार अमरने विना तक्रार पार पाडले किंबहुना मला लिहितं ठेवलं.. शेवटापर्यंत नेलं. सुरुवातीला काही काळ मी पण रोज लिहिले पण तब्येत साथ देत नव्हती.. आणि तब्येत, आवाज ओके झाले तेव्हा इथली रोजची कामे सुरू झाली.. तरी प्रयत्न करत गेले..मग कधीतरी काही सुचायचं नाही, सलग लिखाणाला वेळच मिळायचा नाही.. फक्त नोट्स उपयोगी नसतात ओघवती लेखनासाठी. भट्टी जमली तर एकहाती लिहून व्हायचे, नाही तर खरंच काही सुचायचे, आठवायचे नाही.. मग सरळ लिखाण बंद करून इतर कामे चालू ठेवली. तिलोनियाच्या भागानंतर तर जरा खरंच वेगवेगळ्या कामांत अडकत गेले, की लिखाण नकोच वाटायला लागले.. परत कधीतरी "अगं पुढचा भाग पाठव ना किंवा हाती घेतलंय तर पूर्ण कर ,मधेच सोडून नको किंवा सध्या फक्त लिही गं ते मुद्रित शोधन संपादन वगैरे नंतर बघू, त्यात अडकून नको सध्या" असे विविध सल्ले, मागण्या सुहृद जन करत गेले आणि अहमदाबादमधे झालेल्या समारोपापर्यंत मी लिहिले.. आपण घरी पोचेपर्यंत Home to Home असे ब्लॉग लिहायचे मी ठरवले होते म्हणून ३०वा आणि ३१ वा हा ब्लॉग मी लिहितीय. मधे जवळपास ४ महिन्यांचा कालावधी गेला.. किंवा लेखनकाळ लांबत गेल्याने जानेवारीत सुरुवात करून आज हे मे मधे ब्लॉग मी संपवत आहे.
आज वाटतंय सलग लिखाण झाले नाही हे बरे झाले.. मधल्या टप्प्यात मला Yatra after Yatra खूप उलगडायला वाव मिळाला.. बुडबुडे थोडे शांत झाले, पाणी स्थिरावले की हलके तरंग पण सहज लक्षात येतात तसे झाले.
आता यात्रेकडे मी hangover म्हणून नाही तर तटस्थपणे बघू शकते. खरंतर अजूनही काही सेशन, कार्यक्रम लिखाणाच्या ओघात सुटून गेलेत यांची जाणीव आहेच. अचानक काही वेळा यात्रेतले संदर्भ येतात, भरभरून बोलले जाते, हा एक भाग झाला पण आता खरंच Different inner journey started. हे जाणवते. माणसांच्या सहसंबंधांमधे बरोबर किंवा चूक पेक्षा अधिक काही वेगळं असू शकतं हे अधिक ठसलंय. काही मतं ठाम झाली, काही परत घासून पुसून घेतली, काही नव्यानेच साकारली. जागृती यात्रेचा शोधबोध किंवा त्या अर्थाने चिरफाड करण्यात काही अर्थ नाही, ही ती जागा पण नाही..
ललित अंगाने, जे जसं वाटलं, घडलं तसं या पद्धतीने केलेल्या अनुभवपर प्रवास वर्णनात मांडत गेले.
व्यक्तिगत वर्णन, गोष्टी सहजतेने येत गेल्या, त्यांचे संदर्भ काहींना लागले, काहींनी लावले आणि फार प्रेमाने ब्लॉग वाचले. प्रतिक्रिया कधी ब्लॉगच्या खाली तर कधी, WhatsApp वर तर कधी चक्क फोन करून कळवल्या. बऱ्या वाईट दोन्ही प्रतिक्रिया, अभिप्राय कळवले त्यामुळे लिहिण्याची उर्मी टिकून राहिली... नाटकात प्रेक्षकांच्या प्रतिसादावर नाटक खुलते तर काहीवेळा पडते तसा काहीसा अनुभव मी हे लिखाण करताना घेतला.. अर्थात फक्त प्रतिसादांवर मी अवलंबून नव्हतेच पण कुणीतरी वाचतंय ही भावना छान असायची. ९ जानेवारी २०२३ ला मी घरी सांगलीत पोहोचले तेव्हा दमले होते तरी पटकन झोप लागेना..म्हंटलं तर माझी रोजची गादी, पांघरूण... पण काहीतरी missing.
आज ब्लॉग मालिकेचा शेवट लिहिताना .. खूप महिने मधे गेलेत, मी आपापल्या रोजच्या उद्योगात, कामात स्थिरावलीय. खरंतर रोज झोपताना वाटायचं काय लिखाणाची कटकट आपणच मागे लावून घेतलीय..आज ती so called कटकट संपणार तरीही काहीतरी missing.
यात्रेआधीच्या , यात्रेदरम्यानच्या आणि यात्रेनंतरच्या "missing the links" मला इथून पुढे जोडत जायच्या आहेत. माझ्या पातळीवर 'उद्यमशीलता' म्हणजे काय याचा वेगवेगळ्या प्रकारे, बहुअंगाने, बहुरंगाने शोध चालू राहील. कारण या शब्दाच्या अनेक अर्थछटा समोर येत राहतील.
(यात्रेचा संयोजकांनी केलेल्या यात्रेच्या व्हिडिओ ची लिंक
सर्वांना धन्यवाद..
प्राची परांजपे
७/०५/२०२३

Chaan
उत्तर द्याहटवाअभिनंदन प्राची... लेखन प्रवासही जिद्दीने पूर्ण केलास... अमर आणि लेकींचंही कौतुक.. या सर्व प्रवासात तुला साथ दिली त्यांनी...
उत्तर द्याहटवाधन्यवाद. हो अमर आणि लेकींची साथ होती म्हणून तर जमले
हटवा