भाग ३१ - यात्रा सफल संपूर्ण
पहाटे गजर वाजला आणि जाग आली.. बघितलं तर लक्षात आलं मी चक्क स्लिपिंग बॅगमधे नाही तर AC डब्यात ते पण वरच्या बर्थवर आहे. अरे हो, यात्रा संपली नाही का,.. आता काहीच वेळात सांगली येईल, गडबडीने खाली उतरले. सामान गोळा करून दाराजवळ येऊन थांबले. रेल्वेने नांद्रे स्टेशन सोडलं होतं... म्हणजे अजून वेळ आहे तर पण तरीही तशीच उभी राहिले सामान घेऊन.. एक भली मोठ्ठी बॅग, एक निळी हॅडबॅग, सॅक आणि बॅगेत न बसल्याने बाहेर गुंडाळी करून आणलेली स्लिपिंग बॅग... किती ते सामान.. जाताना आटोपशीर वाटत होतं आज पसरलेलं वाटलं. यात्रेची सुरुवात फॅसिलिटेटर मिटिंग, पहिला दिवस, चेतना गाला सिन्हांनी साधलेला संवाद, रेल्वेतली पहिली रात्र, मग सकाळ,मग १५ दिवसात विविध रोल मॉडेल, त्या चर्चा, ती रेल्वे आणि रेल्वे प्लॅटफॉर्मवर केलेली जेवणं, ते start up, उद्यमीता, ऐकलेले सेशन्स, सांस्कृतिक कार्यक्रम, सगळं साठवून मी आता सांगलीत खूप 'मोठ्या' सामानासह उतरतीय अशी जाणीव झाली आणि भल्या थंडीच्या पहाटे शहारा आला अंगावर. अमर, माझा नवरा अर्थातच आणायला स्टेशनवर आला होता, घरी मुली पण खूप वाट बघत होत्या, आई परत आल्याचा ...