भाग २६ - तिलोनिया
तिलोनियाच्या दारात मी तुम्हाला सोडलं आणि वर्तमानातल्या नानाविध व्यापात परत अडकले,गुरफटले, मग थोडा कंटाळा केला लिखाण करायचा, पण नवनवीन गोष्टी समोर येत राहिल्या आणि हवा तसा लिखाणाला सूरच सापडेना.....
But..now back to Yatra ,back to Tilonia... चला,परत माझ्याबरोबर यात्रेतील काही शेवटचे पडाव दाखवते, रोल मॉडेलची ओळख करून देते... खूप लिंक तुटली असेल तर या आधीचे काही भाग परत वाचा म्हणजे आपण कुठे होते ते आठवेल....तर....
रंगिबेरंगी भव्य कठपुतळीबरोबर आम्ही आत गेलो, दुतर्फा बेअर फूट कॉलेजमधे काय चालतं एकुणच Work And Reasearch Centre यांचे चालू काम याबद्दल चित्रांसकट फलक लावले होते, आणि गरज पडेल तिथे तिथले कार्यकर्ते माहिती देण्यास तत्पर होते. गूंजप्रमाणे इथे देखील आधी काम पहा किंवा माहिती घ्या. मग ते कुणी उभे केले त्यांना भेटा..
आम्ही तिथे पोचेपर्यंत प्रत्यक्ष बेअर फूट कॉलेजची ..Barefoot college-- म्हणजे खेड्यापाड्यातील महिलांसाठी चालणारे छोटेमोठे कोर्सेस..
त्या दिवशीची वेळ संपलेली , म्हणजे सौर दिवे, हातपंप दुरुस्ती, fabrication, वगैरे प्रशिक्षण जिथे चालतं ते बघणं किंवा त्यात शिकणाऱ्या बायकांना भेटणं शक्य नव्हतं.(दरवर्षीचं माहिती नाही पण यावर्षीच्या यात्रेतील सगळ्यात मोठी तृटी, रोल मॉडेलच्या ठिकाणी पोचायला उशीर होणं.. कन्याकुमारी, दिल्ली आणि आता तिलोनिया. असो)
पण म्हणून नाराज होण्याचं कारण नव्हतं. इथे छान मेळाच भरला होता. म्हणजे soldering, सौर पॅनल बनवणाऱ्या काही भगिनींनी तिथे आम्हाला माहिती दिली. त्यांना कसा सुरुवातीला घरून विरोध झाला, हे पंप दुरुस्तीचं काम बायांचं कसं नाही वगैरे वगैरे.. पण हळूहळू कार्यकर्ते येऊन भेटले, घरचे इथे आले, बंकर नानाजी त्यांना भेटले. बायकांना इथे सुरक्षित वातावरणात राहता येईल, घरातली पोरं शिकतील,चार पैसे मिळतील मग बायका यायला लागल्या मग एकातून एक कामं सुचलं जसं हातपंप बिघडला तर दुरुस्ती करायला माणूस बाहेरून कधी येणार त्यापेक्षा इथेच त्याचं प्रशिक्षण घेतलं तर गावात सोपं पडेल...
खरंतर दुतर्फा लावलेले फलक खूप छान विस्ताराने काम समजून घ्यायला पुरेसे होते. पण आमच्याबरोबर परदेशी यात्री पण होते, आणि मग आमच्यापैकी कुणी किंवा आमचे दुभाषी विनय निखरा त्यांना इंग्रजीत अधिक तपशीलवार सांगत होते, मग त्यातल्या काही बायका पुढे होऊन त्यांना अतिशय आत्मविश्वासाने हिंदीत सांगत होत्या.साडी डोक्यावरून पदर, तो सरकला तर तितक्याच सफाईदारपणे तो सावरणे, प्रचंड आत्मविश्वास आणि आम्ही अजिबात कमी नाही, जे येतं,रोज करतो ते आत्मसात केले आहे, कष्ट करून. त्यामुळे माहिती देताना लाज, न्यूनगंड वगैरे तीळमात्र नाही जाणवत या बायकांच्यामधे.
थोडं पुढं जाण्याअगोदर हे सगळं काय , कसं सुरू झालं ते सांगते.
या सगळ्यांचे जनक बंकर रॉय हे मूळचे बंगाली. दिल्लीत उच्च शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी भारत भ्रमण करायचं ठरवलं. फिरत फिरत ते इथे राजस्थानात आले, इथली अल्पशिक्षित लोकं, त्याकाळी तर जेमतेम नाक दिसेल इतका पदर घेतलेल्या बायका, पाण्याची कमतरता हे सारं बंकरनी बघितलं.त्यांनी १००दुष्काळग्रस्त भागात पाणीपुरवठ्याचे सर्वेक्षण केल्यानंतर त्यांनी इथेच काम करावे असे ठरवले. सुरुवातीला त्यांना वाटले की आपण शिकलेलो आहोत या लोकांना पटपट शिकवू शकू, सुधारणा करून विकास करू.. हे जरी खरं असलं तरी प्रत्यक्षात गावा गावांत परिस्थिती बिकट होती, मुलांच्या अर्धवट सोडल्या जाणाऱ्या शाळा, लवकर लग्न,मुलं, अल्प पाण्यावर शेती, आरोग्य प्रश्न आणि खूप काही ज्यामुळे विकास विकास म्हणतात तो पटकन होणारा नाही पण हे ही बंकरनी ओळखलं. गावातल्या लोकांकडे काही अंगभूत क्षमता असतात की ज्यांचा आपण शहरी लोक विचार न करता त्यांना अडाणी ठरवतो, जसे की पाणी कुठे लागेल याचे ठोकताळे किंवा काय लक्षणं असली की पाऊस पडतो वगैरे.. थोडक्यात गावातील जगण्याची कौशल्ये टिकवून त्यांना तंत्रज्ञान ओळख करून देऊन प्रशिक्षण द्यायचे ठरले, मग सुरू झाली बरोबरीची वाटचाल आणि त्यातून १९७२ साली 'सामाजिक कार्य संशोधन केंद्र 'अर्थात Work And Reasearch Centre (WARC) ही सामाजिक संस्था सुरू झाली.पुढे बेअर फूट कॉलेजचा जन्म यातूनच झाला. जवळपासच्या खेडेगावातील बायका सहा महिन्यांचे सोलर पॅनल किंवा हातपंप दुरुस्तीचे प्रशिक्षण इथेच येऊन घेतात आणि परत आपापली गावं प्रकाशमान करतात.Barefoot college म्हणजे खेड्यापाड्यातील महिलांसाठी चालणारे छोटेमोठे कोर्सेस..२०१२ पासून UNSCO बरोबर मुली आणि महिला शिक्षणासाठी ग्लोबल पार्टनरशीपमधे काम चालतं. अफ्रिकेतील महिला येऊन बेअरफूट कॉलेजमधे सोलर प्रशिक्षण घेऊन अफ्रिकेतील त्यांच्या वीज नसलेल्या गावात दिवे उजळतात..या प्रयोगातून शिक्षण तर होतेच पण दोन देशांच्या खेडेगावातील महिलांची सांस्कृतिक देवाणघेवाण, प्रश्न, उत्तरे यांची देखील देवघेव होतो. खरंतर बेअरफूट म्हणजे अनवाणी.. या अनवाणी,अनपढ लोकांना स्वत्वाची जाणीव देऊन पढत करणारं, स्ववाणी देणारं, गरजेचं तंत्रज्ञान कौशल्य सोप्या पद्धतीने शिकवणारं हे बेअरफूट कॉलेज.. दूर आतल्या खेड्यात राहणाऱ्या, लौकिकार्थाने अशिक्षित,भाषेचा अडसर असणाऱ्या बायका सोलर इंजिनिअर होतात.. सराईतपणे कामं शिकतात करतात...इथे त्यांना कोणत्याही प्रकारचे सर्टिफिकेट दिले जात नाही. पण नेमकं काय कसं करायचं सर्किट कसं जोडायचं,लाल बटण कधी दाबायचं, आणि हिरवं कधी असं प्रत्यक्ष शिक्षण दिलं जातं त्यामुळे वाचता लिहिता न येणाऱ्या पंन्नशीतल्या बायका पण सराईतपणे जोडणी करतात. एकीला याबद्दल विचारले तर म्हणाली, "रोट्टी भी तो करते करते आवी है, हम इतने गवार थोडी है की ठीक से सिखाया,दिखा दिया तो न आवे है|"
पाणी प्रश्न घेऊन सुरू झालेलं Work And Reasearch Centre सुरू झालं पण हळूहळू आरोग्य,शिक्षण, पर्यावरण, सौरऊर्जा, गुरुढोरं संगोपन- संवर्धन आणि संवाद (communication) या क्षेत्रात काम सुरू केलंय. गावांसाठी, गावातल्या वीजेसाठी, हातपंप दुरुस्तीसाठी महिला प्रशिक्षणातून काम पुढे आलं आणि आता संपूर्ण कुटुंब सुदृढ करण्यासाठी ज्या ज्या गोष्टींची गरज लागते त्या त्या कामात बंकरनी मार्गदर्शन केले..
आम्ही आत गेलो. ओपन थिएटर सारखी रचना होती जिथे यात्रींनी आपापले बघून झाले की जमणे अपेक्षित होते, हळूहळू यात्री जमले.
सुरुवातीला कठपुतली शो, मग तरुण युवक-युवतींनी केलेला फॅशन शो, मग बंकर रॉय आणि अरुणा रॉय यांनी यात्रींशी साधलेला संवाद......
जेव्हा तुमच्या समोर ७५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या दोन कार्यरत व्यक्ती असतात, जेव्हा त्यांच्या सहजीवनाला ५०हून अधिक वर्षे झालेली असतात, दोघांची तशी कार्यक्षेत्र वेगवेगळी असतात..वरवर स्वतंत्र वाटणारी पण समान धाग्यांनी बद्ध व्यक्तीमत्त्व समोर असतात जसं की Sanit Bunkar Roy, Aruna Roy तेव्हा मला ती माणसं समजून घेण्यात जास्त रस वाटतो , त्यांनी उभं केलेल्या कामापेक्षा.. पर्यायाने कामं समजतंच. कामं उभी राहतात पण सहजीवनातले चढउतार झेलत या व्यक्ती कशा घट्ट उभ्या असतात इतकी वर्षे , याबाबतचं कुतूहल तर आहेच पण अभ्यास करावा अशी गोष्ट वाटते. अरुणा रॉय या IAS officer होत्या १९६८-७५या काळात भारतीय प्रशासकीय सेवेत त्या कार्यरत होत्या.'मजदूर किसान शक्ती संघ 'या समाजातील दुर्बल घटकांसाठी काम करणाऱ्या संघटनेच्या त्या संस्थापक सदस्य आहेत. सूचना/माहिती अधिकार अर्थात RTI या कायद्याच्या मागे अरुणा रॉय यांचे कष्ट, संघर्ष, आंदोलन चळवळ आहे. त्यांच्यामुळे प्रथम राजस्थान आणि मग सगळीकडेच आंदोलन चळवळ झाले आणि आपण आज RTI चा उपयोग खूप सहजतेने करतो, त्यामागे अरुणा रॉय यांचे विचार, संघर्ष होता. त्या या वयातही महिला,त्यांचे हक्क, शोषण, भ्रष्ट व्यवस्था याबद्दल कमीलीच्या अस्वस्थतेने बोलतात, बंकर रॉय पेक्षा खूप वेगळं करारी व्यक्तिमत्त्व. बंकर(बुंकर/नानाजी) हे त्यामानाने मीतभाषी, सौम्य वाटतात.
सर्टिफिकेट, डिग्री यांना इथे काही महत्त्व नाही, अशिक्षित बायका सुद्धा शिकवले तर नीट शिकतात.थोडक्यात शिक्षण हवे पण फक्त त्या कागदांच्या भेंडोळ्यात अडकून नका, शक्य तेवढ्या लवकर निर्णय घ्या आणि उडी मारा ..हा त्यांच्या बोलण्याचा सारांश.
तुम्ही वयाच्या २३ व्या वर्षी कसं ठरवलंत इथे आणि हेच काम करायचंय? या एका प्रश्नावर प्रश्न विचारणारीला त्यांनी उत्तर देताना विचारले ," तुम्हारे पास कितना समय है? " "है समय तो "... " तो फिर आप आ जाओ यहा ,तीन महिने तक रुको,देखो,साथ काम करो... उसके बाद सोचेंगे की कैसे आगेगा करना है,कहा करना है|"
जे वाटतंय , जिथे वाटतंय काम सुरू करा, अनुभव घ्या..मार्ग सापडतोच.
सगळ्या गप्पांमध्ये जाणवत होते की आता दोघंही थकलेत. वय.कष्ट.
पण तरीही आजच्या पिढीतल्या नकारात्मक भाव नाहीत.
फक्त आता कार्यकर्त्यांच्या फळीत अंतर आहे. पुढे कोण? तेवढंच सक्षमपणे नेतृत्व करत राहील असं व्यक्तिमत्त्व किंवा गट तयार झालेला जाणवला नाही, निदान मला तरी.. पण हा प्रश्न तर देशाच्या आजच्या पंतप्रधानापासून कोणत्याही उद्योजकांपर्यंत आणि कुटुंबापासून ते कोणत्याही सामाजिक संस्थेपर्यंत लागू आहे..पुढे कोण,कसे काय पद्धतीने... एकतर दोन पिढ्यांमधला संघर्ष, हस्तांतरित होतानाचे अतीमौन वा वाद किंवा योग्य मनुष्यबळ कमतरता... ..
तिलोनिया खरंतर बेअरफूट कॉलेज साठी प्रसिद्ध आहे, तुम्हाला आणखी जाणून घ्यायचे असेल तर गुगल करा.. मला तिथे याही पेक्षा वेगळी एक गोष्ट भावली ती म्हणजे तिथे चालवला जाणारा community radio.
तिथल्या बायकांशी गप्पा मारत मी एकटीच पुढे चालले होते, एका इग्लू सारख्या घुमटाकार वास्तूने लक्ष वेधून घेतले. तो डबिंग स्टुडिओ होता, असं मला सांगितलं गेलं... मग मात्र बाकी सगळं बाजूला ठेवून इथे रेकॉर्डिंग कुठे होते, काय काय करता असा काहीसा भडीमार सुरू केला आणि मग तिथल्या एका महिलेने मला आणखी एका इमारतीच्या दिशेने इशारा केला,"जादा किसीको नहीं बुलाऊंगी, लेकिन क्या है देखना है मुझे," असं म्हंटल्यावर एका खोलीतून दुसऱ्या खोलीत आणि मग जिन्याने थेट तळघरात मी पोचले.. आहा.. मला जे वाटतं होतं तेच.. तो एक community radio स्टुडिओ होता.. तिलोनियामधे चक्क community radio चालवला जातो, हे मला माहीत नव्हते,माझी माहिती फक्त सोलर पॅनल, आणि इतर विकास कामं यांपुरती होती.
आकाशवाणीत बरीच वर्षे काम केलेल्या मला तिथली निवेदिका आरती हिला भेटून जो आनंद झालेला तो केवळ शब्दातीत होता. Community radio बद्दल मला माहिती होतीच , शिवाय नुकतीच आमची मैत्रीण धनश्री ही आकाशवाणीतून सांगली जवळच्या Sugar Fm community radio त रुजू झाल्याने तिच्याकडून ऐकले होतेच.
Community radio means स्थानिक गरजा ओळखून, कार्यक्रम निर्मिती,कमी परिसरात ऐकू येईल असं हे केंद्र.ना नफा ना तोटा हे साधारणपणे तत्व. मराठीत याला समुदायिक रेडिओ म्हणतात. व्यावसायिक (commercial) आणि सार्वजनिक प्रसारण (public broadcasting)या प्रकारच्या मॉडेल पेक्षा तिसरा प्रकार म्हणजे सध्या लोकप्रिय होत असलेला सामुदायिक रेडिओ अर्थात community radio.सध्याचे आधुनिक सामुदायिक रेडिओ स्टेशन्स त्यांच्या श्रोत्यांना विविध प्रकारची सामग्री उपलब्ध करून सेवा देतात, जी मोठ्या व्यावसायिक रेडिओ स्टेशनद्वारे प्रदान केली जात नाही. सामुदायिक रेडिओ केंद्र स्थानिक क्षेत्रासाठी विशेषत: स्थलांतरित किंवा अल्पसंख्याक गट, छोटी गावं, विद्यापीठ क्षेत्रात ज्यांना त्यांच्या उपयुक्त बातम्या आणि माहिती दिली जाते. हे प्रत्यक्ष live किंवा प्रोग्रामिंग sheduled recording असू शकते .
एका विशिष्ट भौगोलिक भागातील, किंवा काही वेळा विशिष्ट रुची गटांसाठी हे जगभरात चालवले जातात. स्थानिक लोकांना ज्ञान, माहिती, मनोरंजन देण्याबरोबरच त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी एक सशक्त माध्यम म्हणून तिलोनियामधे यांचा वापर केला जातोय.
तर मी चक्क बूथमधे होते, कंसोल, माईक, आहा हा.. मजा आ गया जी..
आरती तिथली निवेदिका, program head, producer सब कुछ .. एक घुंघट घेतलेली बाई जेव्हा तुम्हाला विचारते की ," आप आकाशवाणीमे sound forge यूज करते हो या Audacity?" मी थक्क झाले दोन मिनिटं... तिचा जबरदस्त आत्मविश्वास होता आणि नवनवीन कंसोल सेटिंग शिकणे, recording software शिकणे, लोकांच्या गरजा ओळखून कार्यक्रम तयार करणे, लिखाण करणे, मुलाखत घेणे वगैरे अजून एका निवदकाबरोबर समन्वयाने काम सुरू ठेवणं..बढीया था सब कुछ..
स्टुडिओ कसा तर आवाज घूमू नये म्हणून चक्क अंड्याच्या पुठ्ठ्याचे ट्रे भिंतीला लावलेले. सकाळी ७ते९, दुपारी १२ते२ संध्याकाळी ६ते९ असं प्रसारण केलं जातं. सिनेसंगीतापासून महिला समुपदेशन ते बालशिक्षण सगळ्या बाबतीत माहिती, चर्चासत्र, मुलाखत, असं बरंच प्रसारित केलं जातं. लोकशिक्षणाचं प्रत्यक्षात काम तर बेकर फूट आणि बंकरजींच्या मार्गदर्शनाखाली चालू आहेच पण सर्वसमावेशक विकास साधन म्हणून पण या रेडिओकडे बघितलं जातंय. ९०.४ tune केलं की तिलोनिया परिसरात हा रेडिओ ऐकू येतो.. एकिकडे सोशल मीडियाचं जाळं पसरत असताना,तिथे देखील हाताहातात मोबाईल आलेले असताना नव्याने सुरू झालेल्या community Radio ची गरज आणि त्याचं यश मला विशेष वाटलं. आजही छोट्या छोट्या समुदायांसाठी श्राव्य माध्यम सशक्त भूमिका बजावतंय हे बघून माझ्यातली निवेदिका सुखावली, आणि पत्रकारवृत्ती जागी झाली."नानाजी किसी को ना नहीं बोलते लेकिन पुरी जिम्मेदारी लेके सब सिखके करने को बोलते है, इसलिए हम ये कर पाये,नहीं तो कहा इतना अंग्रेजी आता था,पर उनके प्रोत्साहन से सब सिख दिया|"
एखाद्यावर विश्वास दाखवणे, जबाबदारी टाकणे,कर जमेल म्हणणे आणि लागेल तिथे तेवढीच मदत देणे वा सुचवणे हे अवघड असतं.. नानाजींना हात जोडले..
बाहेर तिथे बनणाऱ्या विविध वस्तूंचे विक्री स्टॉल होते. महिला उद्योजिकांना आणि आमच्या उद्योजक यात्रींना ही मोठी संधीच होती.. विचारविनिमय,संधी,धोके, याबाबत चर्चा करायला..मोठमोठ्या कलाकुसरीच्या वस्तू, लाकडी खेळणी, सॅनिटरी पॅड ते भरड धान्य पीठांपर्यंत खूप खूप काही होतं. मी सगळं बघितलं, समजून घेतलं, आणि चक्क 'खरेदी नाही' हे मी ठरवरेलं सूत्र पाळलं.
मला तिलोनिया आवडलं ते तिथल्या बायकांच्या कामामुळे नव्हे म्हणजे ते तर ग्रेट आहेच.. पण माझ्या मनात बंकर आणि अरुणा हे दांपत्य अधिक खोलवर पोहोचलं, कुतूहल वाटलं की जरा वेगळ्या पद्धतीने यांना बोलतं करायला हवं अशांसाठी की ज्या पती-पत्नींना सामाजिक काम करायचंय मग ते स्वतंत्रपणे किंवा एकाच ठिकाणी.. मला माहिती आहे की आयुष्यात सहजीवनाची प्रत्येक समीकरणं वेगळी असणार,जरी गणितात समीकरण सोडवण्याची पद्धत एकच असली तरी आयुष्यात ती एकच पद्धत नसते.. आणि म्हणूनच यांचं समीकरण सोडवण्याची पद्धत,पायऱ्या समजून घ्यायला परत तिलोनियाला जायचंय...
शिवाय community radio वरती एखादा वेगवेगळ्या भाषांतील लोकगीतं, गाणी, अर्थ, रुढी असा काही कार्यक्रम करता येईल का ??
असो..
मला जे दिसलं,बघितलं,जाणवलं ,समजलं ते मांडलं.
परतीच्या प्रवासाला निघालो, बसमध्ये बसलो तर एका परदेशी सहयात्रीला हिंदी गाणं आणि अर्थ आमची कायरा समजून सांगत होती, मग ती फ्रेंच यात्री एक फ्रेंच गाणं त्याचा अर्थ सांगत होती....
इथे लिहिता वाचता येणारे आम्ही यात्री भाषा समजून घेत होतो तिथे लिहिता, वाचता न येणाऱ्या महिला तंत्रज्ञान समजून घेत होत्या,त्याचा उपयोग करत होत्या... क्षणभर सगळेच "बेअर फूट" आहोत असं वाटलं.. कधी, जी वहाण पायात सरकवू आपण तसे होऊ.. एरवी सगळेच अनवाणी 'बेअर फूट '
प्राची परांजपे
२४/४/२०२३






विमान प्रवासात काही कारणास्तव उशिरा मग विमान मुख्य ट्रॅक वर येण्याचा वेळ आणि नंतर टेक off साठी थांबणे आणि शेवट एकदा भरारी चि सुरुवात झाली की जस झक्कास वाटत तसच आज नवीन लिखाण वाचताना झाले..मात्र लीडरशिप चि वणवण संपवायची असेल तर Rishi Prabhakarji's Teachers Training Course चेच मॉडेल मला प्रभावी वाटत आहे कारण त्यांनी वैमानिक Engineer USA व Ontario कॅनडा येथील MBA करून सुधा bare फूट कॉलेज प्रकारची ट्रेनिंग देऊन अप्रतिम शिक्षक निर्माण केले श्री श्री रविशंकर व जगी वासुदेव हे दोनच उदाहरण पुरे से आहेत.
उत्तर द्याहटवा