भाग ३० - परत मुंबई
खिडकीतल्या हलक्या गार वाऱ्याच्या झुळूकीने जाग आली. घड्याळात पहाटेचे ५ वाजले होते... पण आज उठून काय करायचं ?
१० वीची परीक्षा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी लवकर उठून काय करायचं असतं; पण जाग तर हमखास येते तसं काहीसं झालं होतं माझं..
आज उठून काही गडबड नव्हती. आमची ट्रेन दुपारी १२ शिवाय काही मुंबईत पोहोचत नाही याचा अंदाज होताच. 'सामान आवरणे' अशातले मला काही करायचं नव्हतं, सगळं आवरून तयार होतं, sleeping bag ची गुंडाळी केली की झालं. हं आता माझी छोटी चौकोनी उशी बॅगेत मावत नव्हती इतकंच काय ते सामान आवरणे, बसवणे बाकी होतं.
झोप येईना, उठले... पार १५,१६,१७ डबे फिरून आले. आज ना बाथरूमचा डबा उघडला होता ना PA system चालू होती, रात्रीच स्पिकर वगैरे काढून नेले होते.. आवरले आणि AC chair car गाठली.
रात्री खूप जागरण, नाच वगैरे झाल्यामुळे आज पहाटे कुणीच फारसं चेअर कारमध्ये नव्हते. सवयीने मधल्या टेबलावर जाऊन बसले.... चहा प्यायला, लिखाण केले, खिडकीतून सूर्योदय बघितला. महाराष्ट्रात आहोत याचा अंदाज आला.. रेल्वे पुढे पुढे जात होती आणि मी पण पुढे जायचे ठरवले. असो..
थोड्यावेळाने महाराष्ट्रातले कोण कोण यात्री आहेत ते सगळे जमलो. यात्रेत असूनही काही जणांशी मी पहिल्यांदाच बोलत होते... पुणेकर बरेच यात्री आहेत हे समजलं. काही पुणेकर तर काही उद्योग धंदा, शिक्षणासाठी पुण्यात आलेले पुणेकर होऊ घातलेले..
५०० संख्येत असं होऊच शकतं ओ. त्यात मी काही बाबतीत कमालीची भीडस्त. त्यामुळे आपणहून सगळ्यांशी जाऊन बोलणं मला जमणंच शक्य नव्हते, आणि गरज पण वाटत नव्हती.
मग AC डब्यात जाऊन डॉक्टर, प्रगती, विनयजी, कायरा आणि अशा अनेकांना अच्छा म्हणून माझ्या डब्यात मी परतले.
सगळ्या जणी सामान आवरून तयार होत्या...
आणि साधारणपणे १२.३० ला उतरलो. यात्रा मुंबईत CST स्टेशनला उतरली.,. थोडक्यात रेल्वेतून बाहेर पडलो आणि विविध जणांना निरोपानिरोपी करून मंडळी पांगायला लागली... रेंगाळत चालायला लागली..
कुणी एकत्र जेवून मग अलग होणार होती, कुणी पुण्यापर्यंत एकत्र कॅब करून जाणारी तर कुणी मुंबईत काम आहे म्हणून बाहेर पडणारे. नीना मॅम, शामल आम्ही एका ठिकाणी स्टेशनवर जेवलो आणि मग एकमेकांना टाटा करून आपापल्या वाटा पकडल्या. क्लॉकरुमला सामान टाकून बाहेर पडावं असा विचार केला पण तिथली रांग बघूनच तो रद्द केला. मग वेटिंगरुमचा रस्ता पकडला. तिथे थोडावेळ बसले. पण लक्षात आले की मी आतून बाहेरून खूप अशक्य दमलीय. आडवं झोपण्याची गरज आहे आणि तू कोण कुठली, एवढं सामान, कुठून आलात, चौकशी वगैरे भारतीय विचारसरणी, आचारसरणीला मला तोंड देण्याची इच्छा नव्हती. फोन चार्ज करायचा तर सगळ्या पॉईंटवर चार्जर लोंबकाळत होते आणि कुणा ना कुणाचे मोबाइल त्यात गुंतलेले होते. शिवाय कुणी काही प्रश्न विचारला तर माझ्या तोंडून एकही शब्द फुटत नव्हता, पहिल्या लेखात म्हटल्याप्रमाणे अहमदाबाद आम्ही सोडलं आणि माझ्या आवाजाने मला.. अगदी खरं सांगायचं तर मला कुणाशीही बोलायची इच्छा नव्हती, ताकद तर त्याहून नव्हती आणि आवाज तर त्याहून नव्हता.
रात्रीच्या ८.२० च्या थेट रेल्वेच तिकीट काढलं होतं, आणि तेव्हा घड्याळात फक्त दुपारचे २.३० वाजले होते.. सामान तसंच ढकलत वेटिंगरुमच्या बाहेर पडले... तोवर आमचाच एक यात्री भेटला. डॉ दिनेश राजा.
"कहा जा रहे हो मॅडम? कब की ट्रेन है?" तेव्हा मग मी वस्तूस्थिती सांगितली. त्याने Namoh Pod मधे विश्रांती घेण्याचा सल्ला दिला, आणि समोरच असलेलं काचेचं दार दाखवलं.
दार ढकलून, सामानसकट आत गेले. फारच छान अनुभव होता तो.
१२ तासाला ४९९₹ भरून तुम्ही एक बर्थ बूक करू शकता. कदाचित महाग वाटेल पण खरंच गरज असेल तेव्हा मला ही सोय उत्तम वाटली.
भारतीय रेल्वेने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे नमो स्लीपिंग पॉड सुविधा सुरू केली आहे. ही मुळची जपानी संकल्पना, स्लीपिंग पॉड्स प्रवाशांना पारंपारिक हॉटेल्सपेक्षा स्वस्त दरात काही तासांसाठी निवासची सोय करून देते, ज्यांना काही तासांनी तिथूनच परत रेल्वेच पकडायची आहे मधल्या वेळात बाहेरची कामं किंवा विश्रांती हवी आहे त्यांना तर फारच छान सोय आहे ही.. शिवाय महिला, पुरुष स्वतंत्र स्वच्छतागृह, स्नानगृह. सामान ठेवायला कुलूप बंद कप्पे.डबल बेड, कुटुंब असेल तर वेगळी छोटी खोली, एकट्यासाठी सिंगल बर्थ..
पण तो कसा तर दार लावले की पूर्ण बंद होणारा. आत वाचनासाठी दिवा, उशी पांघरूण आणि AC, पाणी. माझा अवतार, सामान बघून तिथल्या काऊंटर वरच्या ताईला काय वाटलं कोण जाणे, तिने बसायची खूण केली, गरम coffee चा कप माझ्या हातात दिला आणि म्हणाली," मराठी? खूप दमलायत तुम्ही, कॉफी प्या, मग मी तुम्हाला तुमचा बर्थ दाखवते."
यापेक्षा आणखी मला काही नको होतं तेव्हा.. सरळ बर्थवर गेले, गजर लावून आडवी पडले.. जाग आली तेव्हा दुपारचे ४.३० वाजलेले. त्या Namoh Pod मधे घड्याळात बघितलं नाही तर वेळ, दिवस, रात्र यांचा पत्ता लागणं कठीणच होतं.
उठून बाहेर पडले, Gate way of India चालत जाऊन येऊन अंदाजे ६ किमी होईल असे वाटत होते, म्हंटले चला, आज वेळ आहे,सामान नाही, बरोबर कुणी नाही तर भरपूर चालून येऊ, रस्त्यावरची आणि दुतर्फा धावणारी मुंबई बघून येऊ.
डोक्यातून यात्रेचा hangover जात नव्हता, पण तरीही मी पुरेशी detach झाले होते. रस्त्याने एकटीच चालत सुटले.. मोजे, टोप्यांपासून भेळ पाणीपुरी पर्यंतचे विक्रेते होते.. काही हैरतंगेज वस्तू देखील होत्या फोल्डिंग कपापासून ते मोबाईल होल्डर पर्यंत. मला खरेदी काहीच करायची नव्हती पण बघायला मात्र मजा येत होती...वाटेत वस्तूसंग्रहालयात शिरले, इमारतीच्या वळचणीला असलेलं, हिरव्या पानांत लपलेलं पक्ष्यांच्या घरट्याचं निरीक्षण केलं.. एका जवळपास २ फूट फुगा फुगवण असणाऱ्या माणसाला बघतच बसले, तर प्रत्यक्ष गेटवे च्या समोरची गर्दी बघून तिथूनच परत फिरले..
जुन्या इमारतींचे फोटो काढले, कमानी, दरवाजे पाहिले, पुस्तकांच्या स्टॉलवर रमले तोवर लक्षात आले आपण गेले २ तास प्रचंड चालतोय फक्त आणि मुंबई छोट्या मुलांच्या कुतूहलाने टिपतोय, एरवी अनेक वेळा आपण गेलोय या रस्त्याने पण रस्ता कधी वाचला नव्हता आपण किंवा जगला नव्हता.. आज खरंच मौज वाटली, शरीर दमले होतेच यात्रेच्या प्रवासाने, आवाज संपलाच होता अहमदाबाद नंतर पण परत स्टेशनवर पोचेते CST स्टेशन लक्ष दिव्यांनी उजळलेले बघितले आणि शरीराचा थकवा नाहीसा झाला..
मन मात्र इतके दिवसात आणि आत्ता सुद्धा थकले नव्हते कधीच... थोडं कंटाळलं होतं मन काही काळापुरतं यात्रेत ,पण काही क्षणच. थकले कधीच नव्हते.. मन थकणे आणि मन कंटाळणे यातला फरक समजणे ही यात्रेने मला दिलेली देन आहे. तर असो मी स्टेशनवर पोचले आणि भूकेची जाणीव होऊन मी थोडे खाल्ले आणि यथावकाश सांगलीकडे जाणारी माझे रिझर्व्हेशन असलेली रेल्वे पकडली.
डब्यात शिरले, घरी आल्याचा फील आला.. चला अजून एक रात्र आपण रेल्वेत राहणार तर.. त्या हालण्याची सवयच झाली होती.. लहान बाळांना पाळण्यात घालून झोके दिल्याशिवाय झोप येत नाही तसं काहीसं. यातला अतिशयोक्तीचा भाग सोडला तरी या यात्रेमुळे भारतीय रेल्वे, डबे , प्लॅटफॉर्म याबद्दल एक अनामिक नाते तयार झाले आहे. नेमकी उद्या जाग आली नाही आणि आपण कोल्हापूर ला पोचलो तर या भीतीने मी चक्क गजर लावून आडवी झाले.. आजुबाजूच्या बर्थवर माणसे काहीशा अवघडलेपणाने झोपली होती पण मी मात्र आपला रोजचाच पलंग असावा इतकी सहजतेने झोपले. रोजची सवय ओ दुसरं काय.... खूप आठवणी मनात साठवत,आठवत, काही घरंगळत जाताना मी बघितल्या, तशाच त्या वाहू दिल्या.
प्राची परांजपे
६ मे २०२३







खूपच छान प्राची.. तुझ्या बरोबरचा हा शब्दांचा प्रवास आज सुफळ संपूर्ण झाला.. तुझ्या लेखनातून पुन्हा एकदा यात्रा घडली... खूप खूप छान वाटलं... धन्यवाद..
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवाफारच छान ताई.... मन थकणे आणि कंटाळणे आवडले फारच... एकूणच प्रवास मस्त.... खरंतर काय आणि कसे आणि कशासाठी बघायचे याचा अभ्यास झाला या वर्णनाने...👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद
उत्तर द्याहटवा👌👌
उत्तर द्याहटवाMast tuzya barobar aamachi pn hi yatra safal sampurn....bravo
उत्तर द्याहटवाThank you
हटवाप्राची मुळे लिखाण करण्याची आवडत परत जागी झाली आणि आपणही काही असच जगलोय या यात्रे मध्येबरेच काही न पाहिलेलं ही समजलं जे माझ्याकून राहिल होत ते प्राची ने शब्द नी दाखवलं खूप मोटाअनुभव आणि सुंदर विचारीचे यात्री भेटले नविन घेउनचा आम्ही घरी पोहचलो ऊर्जा
उत्तर द्याहटवाThank you
हटवा