भाग २८ - साबरमती आश्रम
Cafe बघून पलीकडेच असलेल्या साबरमती आश्रमात आम्ही निघालो.
This was supposed to be last part of absorbing leg. (Jagriti Yatra last leg's last part). Some calls it as integration part, some says recollection. शशांक मणी त्रिपाठी गांधींच्या विचारधारेला एका हाताने घट्ट धरून दुसऱ्या हातात नवनिर्माण ध्येय घेऊन चालताना दिसतात. उद्योजकता विकासाबद्दल तळमळीने बोलताना,काम करताना दिसतात तसंच गांधी विचारांचा भक्कम पाया आपल्याला लाभला असंही सांगताना दिसतात. दांडी यात्रा साबरमती पासून सुरू झाली. मीठाचा सत्याग्रह हे एक निमित्त होतं, त्यानिमित्ताने गांधीजींना लोकसंघटन, लोकसहभाग, जनजागृती साधायची होती. १९३० मधे दांडी यात्रेला सुरुवात करून गांधीजींनी साबरमती आश्रम सोडला ते स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच ते परत आश्रमात परत आले.
जागृती यात्रेचा शेवट साबरमती आश्रमात होतो की बाह्य यात्रेतून प्रेरणा घेऊन आतला प्रवास, आतली चळवळ इथून सुरू होते? आणि काही वेगळं घडवल्या शिवाय परतायचं नाही हा संदेश मिळतो?
हा विचार घोळवतच मी आश्रम बघत होते. विनोबा कुटीर, गांधीजीं-कस्तुरबा यांचं निवासस्थान 'हृदयकुंज', प्रार्थना स्थळ, गांधीजींच्या वस्तू -विचार यांचं स्मारक, संग्रहालय आणि समोर एका अंगाला वाहणारी साबरमती नदी..
छान आहेत वास्तू आणि परिसरही स्वच्छ आहे. पवनार आश्रमापेक्षा वेगळं वाटतं एवढं नक्की. पवनार आश्रम आळणी, अती शिस्तबद्ध वाटलेला मला. त्यामानाने साबरमती आश्रम पुष्कळ उत्साहवर्धक वाटला. संग्रहालयाच्या आधुनिक इमारतीची उभारणी आणि रचना जगप्रसिद्ध वास्तुशिल्पकार चार्लस कॉरी यांनी केली आहे. स्थापत्य शास्त्राचा अभ्यास करणारे अनेक विद्यार्थी त्यावेळी इथल्या वास्तूंची मोजमापं घेताना दिसली, त्यांच्या अभ्यासाचा भाग म्हणून ते विद्यार्थी इथे आले होते. या संग्रहाची सुरुवात १९६३ साली करण्यात आली. यात प्रामुख्याने तीन दालने आहेत. वस्तू संग्रहालये बघण्यात ज्यांना रस आहे, त्यांना हे नक्की आवडेल अशी विस्ताराने मांडणी आहे.
अ) अहमदाबादमधील गांधी
ब) चित्रांचे दालन
क) ‘माझे आयुष्य हाच माझा संदेश’
३४ हजार हस्तलिखिते, १५० हून अधिक सन्मान, सहा हजारांच्या आसपास फोटो निगेटिव्ह, २०० फाइल्स आहेत. ३५ हजारांच्या आसपास पुस्तके इथल्या वाचनालयात आहेत. गांधीजींच्या जीवनाचा आणि तत्त्वज्ञानाचा अभ्यास करणाऱ्यांसाठी तर हा खजिना म्हणजे मौलिक ठेवाच आहे. गांधीजींचे आणि त्यांच्यावरचे साहित्य, पुतळे, किचेन्स, पेन्स आदी प्रचार साहित्यदेखील विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्यात आता सीडीज, व्हीसीडीज् आणि चित्रफिती, ध्वनिफिती यांचीही भर पडली आहे.इथलं वातावरण कसं आहे तर त्यावेळी तुम्ही कसे आहात तसं आहे..self learning place.
एकटे असाल एकटं वाटेल किंवा शांत वाटेल, मोकळे असाल मोकळं वाटेल, समजावून घेतलंत तर समजेल, ... या परिसराचा, वास्तूंचा म्हणून तुमच्यावर काही परिणाम होत नाही तर तुम्ही तो परिसर स्वतःला कसा चिकटवून घेता त्यावर बाहेर पडताना तुमची मनस्थिती ठरेल असं मला त्या दिवशी जाणवलं. गांधी, गांधी तत्वज्ञान याविषयी प्रत्येकाची वाचनातून, अनुभवातून, गप्पांमधून वैयक्तिक मतं आहेत, असतातच... त्याबद्दल तिथे चर्चा झडत होत्याच. "गांधीजी पूर्ण समजून घेतल्याशिवाय, वाचल्याशिवाय त्यावर बोलायचे नाही. बोललेच पाहिजे असेही नाही." स्वतः १९४८ चं जळीत सोसल्यावरही हा सल्ला माझ्या आजोबांनी मला दिलेला आमच्या दोघांच्या गप्पांमध्ये. तेव्हा आजोबांचं वय ८० होतं...सल्ला मला खूप काही सांगून गेलाय. ती प्रक्रिया मी आजही चालू ठेवलीय त्यामुळे आश्रमाबद्दल बोलण्यापेक्षा यात्रींकडे येते. प्रत्येक जण आपापल्या परीने बघत होता, समजावून घेत होता.
आता वेळ होती एकत्र फोटो काढण्याची.. साबरमतीकडे तोंड करून पायऱ्यांवर आम्ही सारे यात्री जमलो.. ५००+ संख्या एका फ्रेममधे, सगळे समोर बघतायत, सगळे आहेत असं सामावून घेणं म्हणजे कसरतच होती.. अनेक प्रयत्नानंतर अखेर clicked..
and celebration started... आता इथून जायचं होतं समारोपाच्या कार्यक्रमाला ... काहीसे रेंगाळत सगळे बसमध्ये बसले काहींची तिथल्या सांस्कृतिक कार्यक्रमाची तयारी सुरू होती, काही फोटो मूडमध्ये होते...
पण थकतील, थांबतील तर ते यात्री कसले... यारो चलो.....
प्राची परांजपे
२६/०४/२०२३





ब्लॉग च्या माध्यमातून जागृती यात्रा अनुभवता आली म्हणून तुम्हा दोघांचेही आभार. 🙏🙏
उत्तर द्याहटवा