भाग २७ - टॉयलेट कॅफे
आम्ही तिलोनियाहून परत आलो आणि अजमेर स्टेशनवर रेल्वेत चढलो. उद्या अहमदाबाद... Last stop of Yatra. Last role model.
पहाट 'नेहमीप्रमाणेच' झाली, आम्हाला ती आज शेवटची होती.. उद्यापासून PA Systemबंद.."यात्रीओ सुप्रभात, अब कुछ ही देर मे हम..." वगैरे उद्यापासून नाही. रेल्वेतली आजची पहाट ही तशा अर्थाने सगळे एकत्र असण्याची शेवटची पहाट.. दिवस होता ७ जानेवारी २०२३.
आजचा समारोपाचा कार्यक्रम झाला की खूप यात्री इथूनच आपापल्या घरी जायला निघणार होते. त्यामुळे जरा ती सकाळ पण थोडी हळूहळू पुढे सरकल्यासारखी वाटतं होती.कलोल स्टेशनवर उतरलो आणि साबरमती आश्रमाशेजारी असलेल्या Toilet Cafe बघायला, समजून घ्यायला परत बसमधून प्रवास सुरू केला. अहमदाबादमुळे सकाळी सकाळी नाश्त्याला खाकरा, तूप आणि गाठीया..
आज शेवटचा दिवस. छान कपडे,नीट आवरून यात्री बसमधे बसले आणि आज काय नवीन अशा मानसिकतेत खाली उतरले. जयेशभाई पटेल चालवत असलेल्या अनोख्या कॅफे वर आम्ही पोहोचलो.. स्वच्छ परिसर, छान नीटनेटकी झाडं, स्वच्छता यांनी खरंतर मन उत्साही झालं. हे प्रकरण नेमकं काय आहे याबाबत मी खरंच अनभिज्ञ होते, काही गोष्टी मला गुगल करून आधीच माहिती करून घेण्याची अजिबात इच्छा नसते, त्यातली ही एक जागा होती. मी आत पोचले तो जयेशभाई पटेल बोलत होते आणि यात्री वेगवेगळ्या कमोड सीटवर बसून त्यांना ऐकत होते..
विचित्र वाटतंय का वाचायला, फोटो बघताना? मला पण प्रथमदर्शनी विचित्रच वाटलं पण संकल्पना लक्षात आली आणि या गुजराती माणसाचं, त्याच्यात मुरलेल्या उद्योगी व्यावसायिकतेचं खरंच कौतुक वाटलं. आज हे व्यावसायिक Toilet Cafe दिसत असलं तरी मूळ आहे ते सामाजिक संस्थेत, स्वच्छतेचे महत्त्व या विचारात.. जयेश भाईंचे वडील ईश्वरभाई यांनी स्वच्छता कामगारांना पडणारे कष्ट आणि हे काम फक्त कुणा एका समाज घटकांचं नाही तर प्रत्येकाचं आहे हे जाणून या विचारातून आणि गांधीजींच्या प्रेरणेतून 'सफाई विद्यालयाची' १९६७ साली स्थापना केली.
जातीव्यवस्थेबद्दल लढण्याचा आणि खास करून स्वच्छता/सफाई कामगारांचं जीवनमान उंचावण्यासाठी, त्यांना समाजात स्वीकारले जाण्यासाठी काम करायला १९५०च्या दशकाशेवटी काम चालू केलं. स्वच्छ भारत, जनजागृती आणि स्वच्छतागृहांचं महत्त्व पटवून देण्यासाठी व्याख्याने, गावागावात जाऊन पटवणे, आणि प्रत्यक्ष २लाखांहून अधिक स्वच्छतागृहे त्यांनी बांधली. Mr Toilet म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ईश्वरभाईंना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय.
ईश्वरभाईंकडून अर्थात वडीलांकडूनच प्रेरणा घेऊन जयेशभाई पटेल यांनी २०१०मधे टॉयलेट थीम असलेलं कॅफे कम गार्डन सुरू केलं, सफाई विद्यालय या NGO तर्फे हे चालवले जाते. इथे एकुण ७ शौचालये आहेत. पाच नेहमीसारखी आहेत आणि दोन बायोगॅस तयार करण्यासाठी कंपोस्टिंग मशीनशी जोडलेली आहेत. ती इथे येणाऱ्या प्रत्येकासाठी खुली आहेत. आपण एरवी सुलभ शौचालय वापरतो, आणि त्या बदल्यात पैसे देतो. इथे आपण शौचालय वापरल्याबद्दल आणि वायू, मल विसर्जित केल्याबद्दल आपल्याच २/५ ₹ दिले जातात.
इथली वाक्यं पण वाचण्यासारखी होती,
"प्रत्येक शौचालय ड्रॉइंग रूमइतके स्वच्छ असले पाहिजे", "राजकीय स्वातंत्र्यापेक्षा स्वच्छता अधिक महत्त्वाची आहे." फिरता फिरता जाणवलं की, भारतात आजवर वापरल्या जाणाऱ्या शौचकुपांच्या मॉडेल्स पासून आधुनिक कमोड पर्यंत इथे मांडणी आहे. कमोड सीटवर बसून खाद्यपदार्थ मागायला अवघड वाटू शकतं.. पण ईश्वरभाईंच्याच शब्दात सांगायचे तर....
'शौचालय' आणि 'मंदिर' यांची प्रतिष्ठा समान असली पाहिजे, मंदिरात, एक व्यक्ती त्याच्या अंत: करणाची शुद्धी करतो आणि शौचालयात, एक व्यक्ती त्याचे आंतरिक शरीर स्वच्छ करतो. आणि शौचालयाचे महत्त्व जाणण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तो आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवणे...
थोडं सरकॅस्टिक किंवा विचित्र वाटेल पण समाजातील स्वतःला प्रतिष्ठीत समजणाऱ्यांसाठी स्वच्छतागृह, महत्त्व आणि त्यासाठी काम करणाऱ्या कामगारांप्रती आदर निर्माण करण्यासाठी हा प्रयत्न आहे. कॅफेतून मिळणारे उत्पन्न स्वच्छता कामांसाठी वापरले जाते. इथे राजकीय नेते, छोटी संमेलने, सिनेकलावंत तर येतातच पण तळागाळातील लोक, शाळकरी मुलं,नाटक कविता वाचन कार्यक्रम वगैरे पण होतात. उघड्यावर शौचाला जाणे थांबून शौचालय महत्त्व पटवण्यासाठी हा कॅफे आणि सफाई विद्यालय कार्यरत आहे. जयेश भाईंनी फार छान संवाद साधला. यात्रींनी संपूर्ण परिसरात मुक्त भ्रमंती केली. ही वास्तू म्हणून पण वेगळ्या धाटणीची आहे,छान आहे. गांधीजींच्या विचारांनी भारलेला हा परिसर आपल्याला देखील विचार करायला लावतो.. इथे आत शिरताना खरंतर मी फार उत्सुक नव्हते, साबरमती आश्रमात जाऊन बसावे असे वाटत होते, पण आत शिरले आणि बरं झालं आलो, या उत्साहात मी सारे समजून घेतले, तेच थोडक्यात मांडायचा हा प्रयत्न... असे हे यात्रेतील शेवटचे सोशल एंतरप्रेन्यूअरचं उत्तम उदाहरण असलेलं रोल मॉडेल. कन्याकुमारीच्या शिलास्मारकाला साक्ष ठेवून अमृत काल यात्रा संकल्प सोडत सुरू झालेली ही यात्रा.. , विविध संस्था, उद्योग, उद्योजक, ध्येयवादी,वेडी माणसं बघत बघत या आंतरिक शरीर स्वच्छतेचं सामाजिक महत्त्व समजावून देणाऱ्या संस्थेत आणि पर्यायाने उभ्या राहिलेल्या अर्थार्जन उद्योगापाशी येऊन संपली... बाह्य यात्रा खरंतर संपली. आता साबरमती आश्रम...
हळूहळू यात्री आश्रमाकडे निघाले. कुणी नाईलाजाने, कुणी गांधीजींच्या विषयी आदर-आस्थेने, कुणी पर्यटन स्थळ म्हणून तर कुणी आतापर्यंत ऐकले, पाहिले ते आत झिरपवायला, शांत व्हायला.... चला उद्याच्या भागात साबरमती आश्रमात.. आणि सांगता समारंभ.
प्राची परांजपे
२५/०४/२०२३






आनंद वाटतो गुजराती उद्योगपती मानसिकतेचा आणि स्वतः आयुष्याचा शेवट अवस्थेत गुजराती होऊन गुजरात मध्ये राहण्याचा. 3 वर्षे झालेले आहेत येथे येऊन एक मोटरसायकल 10/12 वर्षांपूर्वी चे मॉडेल tvs कंपनी चे कचरा कुंडी शेजारी टाकून दिलेल्या स्थितीत तसेच आहे भंगारवाला पण उचलून जात नाही आश्चर्य वाटते ही श्रीमंती की बेफिकिरी...fafda सांगलीत 300 kg येथे सर्रास 400kg पण कचा पपई चे कोशिंबीर व तळली मिरची आजिबात thikat नसलेली पाहिजे तेवढी...
उत्तर द्याहटवा