भाग 29 - समारोप

साबरमती आश्रमातून बाहेर पडलो, बसेस पकडून आम्ही निघालो होतो. बसेस मधून यात्रींची शेवटची यात्रा समारोप स्थळ EDII Entrepreneurship Development Institute of India.

तिथे आम्ही निघालो. विनयजींना दुसरीकडे जायचे असल्याने ते बसमध्ये नव्हते आणि त्या बसचा कॉर्डिनेटर म्हणून त्यांनी मला जायला सांगितले. बसमध्ये डोकावले तर तिथे चक्क दोन फॅसिलिटेटर अगोदरच आपापल्या ग्रुप बरोबर होते. ERC चा मेंबर नाही एवढेच.  खरं म्हणजे माझी तशी तिथे गरज नव्हती. पण सवय जडली आहे विविध शिबिरांमुळे की, दिली आहे ना आणि घेतली ना जबाबदारी मग पार पाडा. बस ड्रायव्हरला गुगल मॅप प्रमाणे चल असं मी सांगितले तर तो अहमदाबादच्या ट्रॅफिक मध्ये आणि शॉर्टकटच्या नादात चक्क चुकला, वेगळ्याच वळणावर वळला. मग जरा मी वैतागले "मै मॅपसे बता रही हू वैसे चलो ,विनयजीने मुझे मॅप लगानेको बोला है " .. तो फारसा ऐकत नाही असं बघून सागरने सांगितले "मॅडम बोल रही है वैसा चलो" मग गाडी रुळावर आली अर्थात बस नीट सुरू झाली . 

सागर तपाडिया या आमच्या facilitator बद्दल ओळख करून देण्यासारखं व्यक्तिमत्व आहे.  आवाजापासून देहबोली पर्यंत सगळेच पहाडी, भारदस्त असलेला हा माणूस.  प्रचंड उत्साही. मूळचा कच्छी की राजस्थानी, सॉरी नेमका फरक मला कळत नाही..पण माझ्या भाषेत मारवाडी. नानाविध उद्योग व्यवसाय केलेले. सध्या कर्नाटकात हंपी जवळच्या गावात राहतो किमान सहा प्रादेशिक आणि इंग्रजी भाषा याला समजतात आणि बोलता येतात. मराठी छानच बोलतो तितकाच सहज कानडी. तितकीच सहज मारवाडी. हिंदू जीवनपद्धतीचा कमालीचा पुरस्कार करणारा. तरुणांमध्ये सहज मिसळणारा यंग फेलो यात्रींचा लाडका होता तो. टेक्नॉलॉजी बद्दल जागरूक असला तरी खूप जमिनीवर असायचा.  खुल्या मनाचा असला तरी थोडा जुन्या विचारसरणींना धरून ठेवणारा होता. पेहराव ,कुंकू ,नाम याबाबत त्याची मत कुणावर तो लादत नसेल पण स्वतः ती आचरणात आणत होता. त्याची याबाबत स्वतंत्र मतं होती त्यावर तो ठाम होता. तरुणांबरोबर चर्चा करताना दिसायचा. 'जैसा देश वैसा भेस' अशा कंप्यू मधला  तो एक होता.  राजस्थान गुजरातला त्या पद्धतीने पगडी फेटा त्याने बांधून घेतला होता. त्या त्या प्रांतात आम्ही गेलो की दिवसाकाठी एक तरी अभिवादन हा त्या भाषेत करायचा. मार्केटिंगचे बाळकडू त्याच्या रक्तात होतं. काही करोड मध्ये आपण उलाढाली केल्यात, मोठाल्या कंपन्यांबरोबर असोसिएट कामं केलीयेत हे असूनही अजिबात अहंभाव याच्यात नव्हता. आत्मविश्वास प्रचंड आणि कॉलेज वयातील जे यात्री होते त्यांना तो खूप मदत, मार्गदर्शन, संधी याबाबत चर्चा करायचा. मस्तीखोर, सहज शाब्दिक खेचणे, अगदी निकोपपणे किंवा दिलखुषपणे दाद देणे यामुळे सागर विशेष लक्षात राहिला. यात्रेत शिस्तभंग होत नाही ना यावर त्याची बारीक नजर असायची. खिडकीत कोणी बसायचं किंवा मी आधी  तू आधी इतकी सहज नोकझोक सुद्धा आम्ही याच्याबरोबर करू शकायचो.  आम्ही सगळे औपचारिकपणे गोष्टी, NGO, रोल मॉडेल, उद्योजकता समजावून घेत होतो तेवढेच घरगुती वातावरण पण निर्माण होत होतं, झालं होतं. काही वेळा तर चक्क मे महिन्यात आपण भावंडं जमतो ना तसं..  सागरची दोस्ती होण्याचं आणखी एक कारण म्हणजे तो हम्पी जवळ राहते आणि मला खूप वर्षांपासून हम्पी अतिशय डिटेल बघण्याची इच्छा आहे. मी हंपीला माझ्या एका वास्तू विशारद  मैत्रिणीला घेऊन जाणार आहे. तिथल्या hospitality management बद्दल आता चिंता नाही. यात्रेतून पुढच्या यात्रेची तयारी होते ती अशी. असो..तर असा हा एक आमचा सह फॅसिलिटेटर.

परत बसकडे येते....

तो बस ड्रायव्हर एका महिलेने गुगलवर सांगितलेल्या नकाशाप्रमाणे काय जायचं ..असं वाटून पण पण  शेवटी तयार झाला. कुठेही जा हा अनुभव अनेकींनी घेतला असेलच मग तुम्ही चालवत असलेली चार चाकी भर चौकात बंद पडो, तुम्ही मोठ्या कंपनीच्या सीईओ असो वा बँकेतल्या महिला अधिकारी मॅनेजर. एक वेगळी नजर तुम्हाला कधी ना कधी जाणवतेच ज्यात न बोलताच दर्शवलं जातं "हिला काय कळतंय? ही काय मला सांगणार" त्यासाठी देवरियाच्या खेड्यातच जायला लागतं असं नाही.  यावर फारच अनुभव देवाणघेवाण होऊ शकेल अनेकींबरोबर. 

आज यात्रेच्या शेवटचे काही भाग लिहिताना यात्रेतले खूप चेहरे त्यांच्या वैशिष्ट्यांसह आठवून जातायत.. जागृती यात्रेचा सीईओ सध्याचा सर्वेसर्वा, अतिशय शांतपणे काम करत राहणारा, उत्तम श्रोता अशुतोष कुमार, प्रोग्रामिंग मधली अर्चना बोरा जी हँड रायटिंग रिडिंग स्पेशालिस्ट आहे.. औरंगाबादची साऊंड इंजिनियर असलेली यात्री; स्वतःचा रेकॉर्डिंग स्टुडिओ चालवणारी शामल. साताऱ्याच्या माणदेशी संस्थेच्या माध्यमातून पण स्वतःचा व्यवसाय उभा करणाऱ्या विद्याताई, सायलीताई, सध्या दुबईत काम करणारा IT वाला प्रखर,  कानपूरचे हेरंब, केशव, डिझायनिंगच्या पदवीधर असणाऱ्या गोड , बोलक्या चेहऱ्याच्या दीक्षा आणि अनुष्का.

माहेर संस्थेशी निगडीत मंगेश, रात्री तबला रियाज आणि सकाळी योगा करणारे दिल्लीचे आदित्य, 

 विविध CAआणि Mtech चे कंपू. मीडिया पर्सन म्हणून यात्रेत सहभागी झालेले लल्लनटॉपचे लोक. युट्युबवर स्टँड अप करणारी कायरा. DISHA  टीमचा मनीष. प्रोग्रामचा आणि उत्तम सूचना देणारा, सर्दाळलेला पण छान आवाजाचा पोत असणारा ब्रिजेश, शरीरयष्टी अतिशय बारीक, पण प्रसंगांना खंबीर तोंड देणारी ERC monitor प्रगती .. खूप खूप जणं त्यांच्या त्यांच्या वैशिष्ट्यांसह मनात कोरली गेलीयत. खरंतर आज सगळ्यांशीच तसा वैयक्तिक संपर्क आहे असं नाही, पण काही मोजक्या लोकांशी जरूर आहे. आणि गरज पडली तर यात्री कम्युनिटी वर कधीही कोणाशीही, कोणत्याही विषयाबद्दल चर्चा आम्ही करू शकतो. सगळेच यात्री हा संवाद वेगवेगळ्या माध्यमातून आणि पातळ्यांवरून सुरू ठेवताना दिसतात....

बघा समारोप म्हंटलं की असं रेंगाळायला होतं... तसेही आपण बसमध्येच होतो मगाचपासून म्हणून एकीकडे बोलत होते, प्रवास सुरू होताच..... गुगलमॅपच्या आधारे finally आमची बस EDII त्या प्रांगणात पोचली.  फारच सुंदर वास्तु समुच्चय होता ओपन ब्रिक स्टाईल. आता आधी जेवण. मग सगळे यात्री आवराआवर, सांस्कृतिक कार्यक्रम तयारी वगैरे. समारोप कार्यक्रम सुरू झाला. सुंदर Auditorium होतं. संपूर्ण यात्रेतील आणखी एक वैशिष्ट्य ते म्हणजे आमची चर्चा सत्र panel discussion, cultural program जिथे व्हायचे ती सर्व सभागृह उत्तम होती. बेंगळुरू, विशाखापट्टणम, दिल्लीचं कमानी, आणि हे समारोपाचं.. माईकच गंडलाय, आवाज घूमतोय, ऐकूच येत नाही, पुढचं दिसत नाही असलं काही नाही... खरंच ही एक फार उत्तम व्यवस्था होती, हे आत्ता लिहिताना जाणवतंय तेव्हा हे असलं काही विचार करायला डोक्यात जागाच नव्हती इतके विचार भरले जात होते आत.

तर समारोपाच्या कार्यक्रमात BGT competition च्या विजेत्यांचा बक्षीस समारंभ झाला. इथे एक आत्ता वाटून गेलं की, जर परत फक्त त्या विजेत्यांना आपलं presentation सादर करायची संधी तिथे दिली  तर, म्हणजे संपूर्ण यात्रेला त्या त्या vertical subjectची सादरीकरण बघता आली असती. शिवाय अहमदाबाद सारख्या उद्योगशील शहरात ती कल्पना प्रत्यक्षात यायला sponsored  मिळू शकतात जर कुणी उद्योजक तिथे आले.

 I Know, it's loud thinking, but for improving Yatra point of view only....

बक्षीस वितरण झाल्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम भरतनाट्यम पासून सिनेसंगीत नृत्याच्या आविष्कारा पर्यंत..

स्वरचित कविता वाचनापासून ते अभिप्राय व्यक्त करण्यापर्यंत सगळं मी सांस्कृतिकमधेच धरते.. धमाल. त्यानंतर सगळे ERC member स्टेजवर आले आणि informally thanks giving झाले. आणि यात्रेतील शेवटचं यात्रा गीत सुरू झालं. 

आता पर्यंतच्या कोणत्याही ब्लॉगमधे मी हे गीत मी तुम्हाला ऐकवलं नाही, फक्त यारो चलो .. असा शेवट काही लेखांचा केला होता.. आज यांचा व्हिडिओ आणि ऑडिओ दोन्ही सोबत जोडत आहे.

समारोप एकिकडे चालू होता आणि आमची 'ती' गडबड चालू झाली....  माझ्या  cohort मधल्या वैष्णवीला आणि अजून एका यात्रीला आजारपणामुळे शेजारच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं, माझ्या  cohort मधल्या सगळ्या मुलींचं खरंतर कौतुक आहे.. त्यांनी समारोप होईपर्यंत त्यांनी वैष्णवीला सांभाळलं, कधी रागावून,कधी सोबत करून, कधी धीर देऊन ... तिची तब्येत प्रचंड बिघडली होती. सांगायचा मुद्दा हा की ही घटना पण तेवढ्याच सुरळीतपणे हाताळली गेली. यात्रेच्या organizing committee चे हे वैशिष्ट्य आहे. अर्थात  तेवढंच माझ्या cohort च्या मुलींचं. मी या प्रक्रियेत प्रत्यक्ष होते, डॉक्टर अतिशय शांतपणे हे सगळं कसं हाताळत होते ते बघितले मी.. ग्रेट.

पण यामुळे एक बरं झालं.. मी समारोपातून पटकन बाहेर पडले, मनाने आणि शरीराने.... वैष्णवीला मी गाडीत बसवले "सब ठीक है,आप जादा सोचो मत, सलाईन लगा के , टेस्ट करके भेज देंगे", मला हे सांगण्यात आलं आणि मी पण शांतपणे बाहेर मोमोज् खिलवले जात होते तिथे डॉ आणि काही यात्रीं बरोबर सहभागी होऊ शकले, शांतपणे. हा माझ्यासाठी मोठा धडा होता.. 

आता निरोपाची वेळ होती... काही यात्री तिथूनच पुढच्या प्रवासाला गेले, काही कलोल स्टेशनवर येऊन पुढे निघाले....  जेवण करून रात्री रेल्वेत चढले ते थेट डॉक्टर कंपार्टमेंट गाठले... तर समजले की वैष्णवी सुखरूप डब्यात परतलीय. त्यावेळी खरोखर माझ्यातली आई मला जाणवली. तिला समोर बघून फार आनंद झाला. पण हृषिका आज रात्री आपल्या बरोबर नाही याचं वाईटही वाटलं.... 

बरीच रेल्वे रिकामी रिकामी वाटतं होती...

'यात्रा सार' चे काम, त्या मिटिंग, त्याबद्दल informal चर्चा सुरू झालेल्या होत्या..


एक रिते,मुकेपण रेल्वेत मला जाणवले..मांडव परतणीच्या  झळा पहिल्यांदा मी अनुभवत होते... 


प्राची परांजपे

२८/०४/२०२३

टिप्पण्या

  1. प्राचीजी मला प्रवास विशेष आवडतो, पायाने चालून, सायकल ने , स्कूटर- मोटर सायकल ने व मोटारी ने , समुद्र जहाज ने विमानातून सर्व प्रकारचे आनंदी प्रवास झाले आहेत मात्र ही यात्रा जरी ट्रेन ने असली तरी सांस्कृतिक , सामाजिक, व्यावहारिक , सायंटिफिक...थोडक्यात सर्वच अंगाने परिपूर्ण अशी होती एक दोन वेळा वाचल्यानंतर च निष्कर्ष काढावा सांगावा असी मानसिक स्थिती असली तरी लगेचच टिप्पणी देताना अन्याय होऊ शकतो ही जाणीव आहे पण असे प्रवास करणार्‍यांनी टिप्पण...नोंद..लिखाण करणे किती जरुरी चे आहे हे श्री अमर जी चे व्यावसायिक प्रवास ( अध्यापक म्हणून) ज्ञान प्रबोधिनीच्या प्रवासा चा अनुभव व आताच्या सौ. प्राची जी चा वरील प्रवास मालिका हे पुढील generation साठी ठेवा-खजिना आहे हे नक्कीच, आपण उभयतांना खूपखूप शुभेछा येथुन पुढील सर्व प्रवासा साठी, जय हिंद- वंदे मातरम.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. आम्हा उभयतांकडून मनापासून धन्यवाद.. आपलं नाव कळू शकेल काय?

      हटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग १ - इच्छा जागृतीची

भाग ३१ - यात्रा सफल संपूर्ण

भाग २५ - राजस्थान .. तिलोनीयाकडे