भाग २३ - गूंज - अर्थात प्रतिध्वनि (Echo)
तारीख होती ५ जानेवारी २०२३.
पहाटे नेहमीप्रमाणे लवकर उठले ..थंडी खूप होती. रेल्वेच्या खालच्या बर्थवर झोपलं की काय वाट्टेल ते केलं तरी खिडकीतून गार वारं काही थांबत नाही..भले तुम्ही industrial tape लावा किंवा तिथे एखादा पलंगपोस बांधा, आणि स्वतःला स्लिपिंग बॅगमधे कोंबा.. ते वारं येतच राहतं, तुम्हाला रोजच्या नवीन हवेचा गंध, स्पर्श, करतच राहतं.. आणि तुम्ही अधिकाधिक थंडाळलेपणाचा अनुभव घेत बर्थवर झोपण्याचा प्रयत्न करत राहता, आणि शेवटी माझ्यासारखे असाल तर थंडी पेक्षा उठलेलं बरं वाटून भल्या पहाटे उठून डबा सोडून AC chair car गाठता...अंघोळ वगैरे असल्या गोष्टी मी नालंदा नंतर सोडूनच दिल्या होत्या. त्यामुळे पटकन आवरून AC chair car मधे गेले.. रोजचे साथी जमले होतेच.. थोडं ओरिगामी केलं, चहा, गप्पा... आज आम्ही दिल्लीत उतरणार होतो. पण एकुण रेल्वेला होत असलेला उशीर आणि प्लॅटफॉर्म मिळणे वगैरे गोष्टी असतातच..या अशा मधल्या अवधींमधे books and movies वरती informal session व्हायची. ERC केशव ती घ्यायचा. त्याबद्दल उद्याच्या भागात सांगते.
दिल्ली ते अहमदाबाद असा यात्रेतील शेवटचा टप्पा किंवा 3rd leg of Yatra..
यात्रेचे मी मागे लिहिल्याप्रमाणे तीन टप्पे असतात.
1.Exploration
2.creation
3.Recalling or Integration
दिल्ली पासून शेवटचा टप्पा सुरू होतो..एकतर BGT competition संपल्यामुळे रोजची तयारी, टेंशन नसते, शिवाय बहुतेक ग्रुपची role model presentation पण झालेली असतात. ज्यांची राहिलेली असतात, ते तयारी करतातच. पण एकुणात जरा निवांतपणा यात्रेत येतो. त्यातून "दिल्ली मेरी गली" असं म्हणणारे खूप.. त्यामुळे त्या दिवशी सकाळी खूप जणं सामान घरी देऊन येण्याच्या किंवा कुणाला तरी स्टेशनवर बोलावून थोडं सामान देऊन स्वच्छ धुतलेल्या कपड्यांचा संच मागवणे अशा मौल्यवान कामात होते. शक्यतो कुणी डीबोर्ड होऊ नये अशी अपेक्षा असते, कारण वेगवेगळ्या कारणांसाठी लोक यात्रा मधेच सोडून जायला लागले तर, बाकीच्या लोकांवर परिणाम होतो.. आणि तो होतोच हे यात्रेत आलेले अनेक जण मान्य करतील.
माझ्या cohort मधल्या एकीला कोविडनंतर कॉलेजलाच न गेल्याने तिकडे जाऊन सर्टिफिकेट घेणे, शिक्षकांना भेटणे वगैरे गोष्टी करायच्या होत्या, परत तेवढ्यासाठी दिल्लीत येणं कठीण होतं वगैरे.. अर्थात आम्हाला हे सगळं रात्री परत रेल्वेत परतल्यावर समजलं.. अनेकांना दिल्लीतली प्रेक्षणीय स्थळे बघण्यात रस होता, त्यामुळे ते तिकडे जाणार असल्याचं शिजत होतं.... सकाळपासून उतरणार, उतरणार करत दुपारी जेवायची वेळ झाली आणि मग रेल्वे एकदाची खूप खूप खूप जास्त उशिरा आम्ही दिल्लीत म्हणजे जफरगंज स्टेशनवर उतरलो.. प्लॅटफॉर्मवर जेवण लावलं गेलं आणि आम्ही जेवलो... हो हे आता इतकं अंगवळणी पडलं होतं की, आपण काही वेगळं करतोय हेच वाटायचं नाही आम्हाला.
हळूहळू अनेकजण पांगले, उधळले, विखुरले,...उरलेले आम्ही सगळे बसेस मधे बसून निघालो... ऐन दुपारची वाहतुकीची वेळ... खूप जास्त रहदारी... बस रांगायला लागली... कन्याकुमारीत आम्ही उशीरा पोचलो त्या नंतर सगळ्या वाईट वाटलं ते दिल्लीत गूंजला पोचायला दुपार उलटून गेली याचं.. किती वेळ आम्ही बसमध्ये होतो... बाहेर दिल्लीतल्या उंच इमारती, चकाचक रस्ते, सुशोभित चौक, राजधानी असल्याचा 'अलग ही अंदाज इस शहर पर है|'
गूंजला पोचेते खरंतर जरासं अंधारून आलेलं, आणि थंडी परत वाढली. गूंजच्या प्रत्यक्ष कार्यालयात आम्ही जमलो नव्हतो तर एका मोकळ्या जागेत आणि आत सभागृहात एवढी जनता बसू शकेल अशा ठिकाणी जमलो होतो..
रंगबेरंगी कपडे, पिशव्या, रजया, कागद, पुस्तके यांची प्रदर्शनी आणि विक्री केंद्र चालू होती... गूंजमधे किंवा गूंजच्या माध्यमातून काय काय बनतं ते यात्रींनी आधी पाहावं अशी अपेक्षा होती आणि मग आत सभागृहात बसावं.
दाटीवाटीने यात्री बसले. खोकला हा श्वासाइतका सहज, सारखा पसरलेला ... एकाला उबळ आली की आसपासचे पटापट खोकायला लागायचे, ते झाले की पुढचे... खोकल्याच्या लाटांवर लाटा पसरत होत्या इतक्या की मला अजून आठवतंय स्ट्रेप्सीलच्या गोळ्यांचा ट्रे सभागृहात फिरता ठेवण्यात आला.
आमच्या संपूर्ण प्रवासातलं गूंज हे रोल मॉडेल आणखी वेगळं आहे.
सगळ्या रोल मॉडेल बद्दल परत एकत्रित थोडं लिहिणार आहेच शेवटच्या भागात कदाचित.. बघू..
तर स्वतः अंशू गुप्ता गूंजची कहाणी सांगायला उभे राहिले, जोडीला ppt, स्लाईड शो, फोटो पण होतेच. ग्रामीण भागातील लोकांचा आत्मसन्मान आणि शहरी भागातील लोकांकडे असलेल्या जास्तीचे कपडे यांमधील समन्वयक म्हणून गूंजने प्रत्यक्ष काम सुरू केले, 1999 साली. पण गूंजचं बीज त्याआधी 1992 मधे पडलं.
मास मिडिया कम्युनिकेशन आणि स्टोरी मेकर, पब्लिक रिलेशन मधे काम करणाऱ्या अंशू गुप्तांनी जेव्हा एका स्टोरी साठी एका माणसाचा पाठलाग केला तेव्हा त्यांना समजले की दिल्लीत थंडीमुळे मरणाऱ्या किंवा बेवारस असलेल्या मृतदेहांना हातगाडीवर उचलून गोळा करण्याचे काम हबीब आणि त्यांची आंधळी बायको करतात.. दर मृतदेहाच्या योग्य विल्हेवाटीमागे त्यांना २०रु. मिळत. हबीब २ मैलाच्या परिघात फिरून १०/१२ मृतदेह गोळा करत असे. थंडीत सहाजिकच जास्त मृतदेह सापडत, पैसे जास्त मिळत आणि उन्हाळ्यात हे प्रमाण घटत असे. त्यांची ६ वर्षांची मुलगी जेव्हा म्हणाली, की "मैं लाश ओढके साथ सो लेती हू, रातको गर्मी मिलती है|" (रात्री थंडीपासून संरक्षण करण्यासाठी,शरीराला ऊब मिळवण्यासाठी मी मृतदेह पांघरूण किंवा मृतदेहाला धरून झोपते).. त्या कुटुंबाने अंशू पूर्णपणे भानावर आले..
अंशू गुप्ता साठी हा Turing Point होता. आम्हाला हे सांगताना त्यांनी उच्चारलेलं "ये ठंड नहीं, कपडोंकी कमी है|" हे वाक्य इतकं संतृप्त होतं की पुढे काही वेळ शांतता पसरली....गूंजची सुरुवात या कपड्यांच्या कमतरतेमुळे झालेल्या मृत्यूत आणि त्या शांततेत दडली होती.
प्रत्यक्षात अंशू गुप्तांकडून हे ऐकायला मिळत होतं. त्यांनी स्वतः तर नोकरी सोडलीच पण त्यांच्या बायकोने मीनाक्षी गुप्ताने BBC मधील नोकरी पण सोडली आणि १९९९ मधे गूंजची स्थापना झाली.."गूंज" means "Echo" अर्थात "प्रतिध्वनी".. आपण घातलेल्या सादाला प्रतिसाद, प्रतिध्वनी मिळवत ६७ कपड्यांपासून गूंजने सुरुवात केली दिल्ली मधून आणि मग २००३ नंतर हे काम वाढत जाऊन आज १५० हून अधिक पूर्ण वेळ कर्मचारी १४००हून अधिक छोट्या गटात आणि ३१ राज्यांमधे गूंजचा आज विस्तार आहे. जवळपास ६०० हून अधिक स्थानिक संस्थांच्या सहभावर हे काम पुढे जातंय. गुप्ता म्हणाले की, अन्न, वस्त्र निवारा या मुलभूत गरजा आहेत हे आपल्याला माहीत असतं पण जोपर्यंत कुठे पूर, भूकंप अशा नैसर्गिक आपत्ती येत नाहीत तोपर्यंत वस्त्र या गरजेकडे कोणाचेच लक्ष जातं नाही.. त्वचेचा थर जसा शरीर झाकायला गरजेचा असतो, त्यावरती अंग झाकायला, थंडी वाऱ्यापासून संरक्षण करायला कपडे गरजेचे असतात.. रोजच कपडे घालणाऱ्या आपल्याला कपड्यांची कमतरता म्हणजे काय हे पटकन लक्षात येत नाही.
"While there are more than 100 issues being talked about in the development sector, right from domestic violence to global warming, this basic need doesn’t find a mention anywhere. ये तो बेसिक चीज है जी|" अंशू गुप्ता बोलत होते, आणि थंडीसाठी आम्ही घातलेल्या उबदार कपड्यात मला क्षणभर उकडलं... कपडे हा मुख्य धागा घेऊन कामात सुरुवात केली मग गरज पडेल तसे काम गुंफले... बांबूचे पूल बांधले, लोकसहभागातून रस्ता, विहिरी खोदल्या, शेती, पाणी आणि महिला आरोग्य यामधे काम विस्तारतंय.
सामाजिक संस्था बरेचदा one man show असतात पण अंशू गुप्ता भविष्याचा विचार करताना सुरुवातीपासूनच म्हणतायत, "We don't want to grow as an organization, We want to grow as an idea. I want to setup framework for this issue of clothing for people across the globe, to replicate." गूंज हा एक वस्तूपाठ बनवावा, जो आहे रे ते नाही रे मधील पूल बनावा. सुरुवातीला फक्त कपडे हा विषय लावून धरलेला, पण आता गूंज जास्तीची भांडी, चपला, संगणक अशा गोष्टी देखील स्वीकारते. कपड्यांवर प्रक्रिया करून म्हणजे काही आहेत तसे ठाकठीक करून तर काहींपासून पुन्हा वापरण्यास योग्य असे कपडे, पर्स, जाजम, पायपुसणी बनवली जातात.
भारतीय संस्कृती खरंतर वापर, दुरुस्ती, बदल आणि पुनर्वापर अशीच आहे.. repair and reuse... अंशू गुप्ता परत तीच जाणीव कामातून करतायत.. सतत सांगत राहतात, The world doesn't want thinkers right now , it needs doers.. महिला आरोग्याबद्दल देखील काम चालतं. मासिक पाळीच्या त्या दिवसांमध्ये कपड्याला असलेला, पण गंजलेला हुक लागून आणि स्वच्छ कपड्याचा तुकडा न मिळाल्याने महिलांचा मृत्यू झालेला लक्षात आलं आणि सॅनिटरी पॅड, कापड याबाबत काम सुरू झालं. ती आकडेवारी तर भीषण आहे. अर्थात हा अनुभव ग्रामीण भागात महिलांसाठी, महिलांसोबत काम करतात त्या सर्वांनाच येत असेल. 'महिलांची गोष्ट' म्हणून सहज दुर्लक्ष करण्याची ही साधी बाब नव्हे.
काही मूलभूत गृहितांवर गूंज आधारलेलं आहे. No charity, it should be donation. Clarity kills integrity of people. Donation - Donate what you have, don't donate what the people need. मोफत काही द्यायचे नाही तो केलेल्या कामाबद्दलचा मोबदला असायला हवा. ग्रामीण भागातील विहीर खोदणे, गावसफाई, पाणी व्यवस्थापन, पूल बांधणी अशी कामं लोकसहभागातून चालतात तिथे पैसे न देता कपडे आणि इतर वस्तू दिल्या जातात.. ही एकप्रकारे barter system च आहे.
गूंज चं काम डोक्यात घुमायला लागतं, अंशू गुप्ता कडून ऐकताना डोळे पाणावतात, घरातले 'असूदे' म्हणून जास्तीचे ठेवलेले गरम कपडे डोळ्यासमोर येतात... एका पती पत्नी जोडीने ठरवून सुरू केलेली आणि वाढविलेली ही सामाजिक संस्था काम म्हणून नाही तर कल्पना म्हणून भारतभर पसरते मॅगॅसेसै आणि इतर मानांकित पुरस्कार मिळवते. सामाजिक पुरस्कार त्या व्यक्तीला मिळाला तरी समाजाप्रती उत्तम कामाचीच ती पावती असते त्या त्या संस्थेला.. Clothing couple of India असं मीनाक्षी आणि अंशूला म्हंटलं जातं. कपड्यांपासून पुनर्वापर आणि पुनर्निर्माण करून "कोई भी कपडे का टुकडा वेस्ट नहीं जाता|" असं म्हणणाऱ्या अंशू गुप्ताचे शब्द कपड्यांचं आयुष्यातील वेगळं स्थान अधोरेखित करून गेले... आणि यात्रींची बोटं आपण राहतो त्या जवळपास गूंजचं कलेक्शन सेंटर कुठे आहे आणि volunteer म्हणून कोण काय करू शकतं हे शोधण्यासाठी मोबाईलकडे वळू लागली..
'गूंज'चे दिल्लीतले प्रोसेसिंग युनिट प्रत्यक्ष बघण्याचे वेध घेऊन मंडळी निघाली आणि मनातल्या मनात आपला 'प्रतिध्वनी' काय सांगतोय ते ऐकायचा प्रयत्न करू लागली..
प्राची परांजपे
१५/०३/२०२३





टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा