भाग २० - बरपार, देवरिया उत्तर प्रदेश

आज तारीख होती ३ जानेवारी २०२३..

आज रात्री आम्ही उत्तर प्रदेशातील देवरियामधल्या बरपार गावात राहणार होतो.. जवळपास १०दिवसांनंतर आम्ही जमिनीवर झोपणार होतो.. चक्क रात्री तिथे मुक्काम करणार होतो.. प्रचंड थंडी असणार आहे हे सांगायला गुगल भाऊच पुरेसे होते.. लोकांना काय वाटतं वगैरेची गरजच नव्हती.. तापमानाचा पारा बिहारपासूनच जो खाली गेला होता तो वर येण्याची चिन्हं नव्हतीच. त्यातून खेडेगावात बाजूला भरपूर शेती असणार म्हणजे आणखीन थंडी..

ढीगभर अंगावर आणि बॅगेत अशी थंडीसाठी व्यवस्था घेतली.. आता माझ्या आजूबाजूला खूप मुली आजारी होत्या.. एकुणात रेल्वेतच ताप भरला होता.. खोकला, सर्दी,थंडी काय विचारूच नका.. ती cold wave की काय आत्ताच कशाला मरायला आली होती कोण जाणे..

हो, तरी ५०० जणांत हे चालायचंच ओ.. रोज एकाने तापाचा/सर्दीचा 'खो' दुसऱ्याला द्यायचा की मग कसं सगळी रेल्वे बरोबर balance होते.. शिवाय डॉक्टरांवर ताण पण येत नाही.. आणि भारताचंच प्रतिनिधित्व रेल्वेत असल्याने  इथेही self appointed Doctor  ची कमी नव्हतीच.. शिवाय प्रत्येकाचे on call डॉक्टरही होतेच.. 

प्रत्येक जीव स्वतःची काळजी घेत होता, इतरांची काळजी वाहत होता... आणि एकिकडे सामानही..

मान्य आहे मला पण मुलींच्या हातात एक दिवसाच्या मुक्कामाच्या मानाने सामान जास्त होतेच..पण स्वतः बरोबर इतरांची काळजीवाहू वृत्ती अंगभूत असतेच आमच्याकडे (अपवाद सोडून देऊ.)

तर आम्ही देवरिया सदर स्टेशनवर उतरलो. जागृती यात्रेच्या होम पीचवर आम्ही उतरलो होतो. मोठ्या जल्लोषात आमचं स्वागत झालं. हार,तुरे, ढोल ताशे .. हळूहळू बसेस सुटल्या..

हे देवरिया तसं मोठं शहर, जिल्ह्याचं ठिकाण पण उत्तर प्रदेश, बिहार मधल्या शहरांवर पण एक वेगळाच छाप असतो.. बिमारू असं नाही म्हणायचंय पण फारच बकाल, अस्वच्छ गावं वाटतात इथली. जिल्ह्याचं ठिकाण पण असं .... अहं..

हा पण भारत आहे आणि आपलाच भारत आहे. देवरियाहून आम्ही बरपार या ठिकाणी पोहोचलो.. उतरलो तेव्हा ढोल ताशात परत स्वागत. तिथल्या शाळेत घातलेल्या मांडवात हळूहळू यात्री जमा झाले.

आधी इथे आम्ही का आलो हे सांगते.. आज तसं कुठलं रोल मॉडेल बघायला आम्ही आलो नव्हतो.. तर जागृती सेवा संस्थानचं मुख्य ठिकाण बरपार आहे. जागृती यात्रेचे जनक शशांक मणी त्रिपाठी यांचं हे गाव. जागृती सेवा संस्थानचं हे मुख्यालय.. जागृती यात्रेच्या १५ वर्षांच्या प्रवासात खूप काही हाती गवसलं.. tire 2,3 cities मधे उद्यमीता आणायची तर येत्या २५ वर्षात प्रयत्न करायला हवेत.. त्यासाठी प्रशिक्षण, माहिती, या सगळ्यांची केंद्रं मोठ्या शहरात असून उपयोग नाही.. start up , incubation हे मोठे मोठे शब्द लहान गावांतील बायका पुरुषांना सोप्या शब्दात सांगायचे तर तिथेच असं सेंटर काढायला हवं.. म्हणून बरपारमधे खूप मोठा प्रकल्प उभा राहतोय.. आसपासच्या निमशहरी भागातील लोकांना याचा फायदा व्हावा हा उद्देश. उदा. योजकता विकास, संभाव्य किंवा चालू लघू उद्योजकांचा शोध घेणं, त्यांना उद्योग उभा करण्यासाठी मदत करत मग ते प्रशिक्षण, आर्थिक साक्षरता, मार्केटिंग काही पण असूदेत......

महिलांची सोय शशांक मणी त्रिपाठींच्या जुन्या, ज्याला आपण पुश्तैनी हवेली म्हणू शकतो अशा, घरात केली होती... आणि काही बाजूच्या घरात..

पडवी, आतल्या खोलीतून, वरांड्यातून पडदे लावून तिथे खाली गाद्या पसरवून दिलेल्या.. भरपूर रजया, उशा... उत्तम सोय होती.. प्रश्न सोईच्या नव्हताच फक्त अनेक मुलींच्या तब्येतीचा होता... प्रचंड थंडी होती... आणि ती कमी होतच नव्हती... याचवेळी असेही समजले की पुरुष निवास तिकडे शाळेत होता.. तिथे स्वच्छता गृहापासून झोपण्यापर्यन्त सोय म्हणावी तशी नीट नव्हती... कडाक्याच्या थंडीत हे जरा जास्तच होते.....पण खरंच तक्रार नव्हती कुणाची.. सगळे एकमेकांना सांभाळून घेत होते. आम्ही मुलींनी सामान ठेवले, आणि परत शाळेत जमा झालो.

आता गटागटाने ठरवून दिलेल्या छोट्या छोट्या गावात, वस्त्यांत जायला चालत निघालो... सर्वत्र सपाटीची जागा. हिरवीच हिरवी शेतं. मोहरीची पिवळी सोनसळी फुलं . सपाटीवरून एकामागोमाग एक आम्ही चालत गावात पोचलो.. वेगवेगळ्या गावात किंवा वस्त्यांवर जाऊन तिथली परिस्थिती, राहणीमान, स्त्री पुरुष प्रमाण, शिक्षण , आरोग्य, उद्योग याबद्दल जाणून घ्यायचे होते.. BGT competition साठी प्रत्येक गटाने जो business plan केला होता, तो खरंच इथं होऊ शकतो का? प्रत्यक्षात काय परिस्थिती आहे हे पण पडताळून पाहण्यासाठी या ग्राम भ्रमंतीचा उपयोग होता, किंबहुना यात्रींनी गावपण प्रत्यक्षात बघणे हाच उद्देश होता गावागावात पाठवण्याचा.. 

अर्थात कोणतंही गाव, वाडी, वस्ती अशी एकदा जाऊन कळत असती, सुधारली असती तर.... ग्रामीण भागातील सगळे प्रकल्प एव्हाना आटोपते होऊन सगळं कसं 'विकसित' झालं असतं...

पण म्हणून कुणी एखादेवेळी केवळ बघायला जाऊच नये असं बिलकुल नाही... जात जातच कुणाला अशाच ठिकाणी आयुष्याचं ध्येय सापडू शकतं, कुणाला मानसिक आरोग्यावर काम करायच्या शक्यता दिसतात तर कुणाला प्रत्यक्ष आरोग्याबाबत जागरूकता वाढवणे, वैद्यकीय सेवांबद्दलच्या अनास्थेने अस्वस्थता येते. उद्योगांची कमी त्यामुळे नाही रोजगार हमी. शेतीचे छोटे तुकडे, आधुनिक शेतीतंत्राचा अभाव कारण योग्य शिक्षणाचा अभाव, ज्यांच्यावर शिक्षणाचा प्रभाव त्यांचा गावात राहायला नकार...हे सगळं मी काही नवीन सांगत नाहीये. भारतातील खेडेगावातील वस्तूस्थिती आहे.. खेड्यातून ,गावात, गावातून, शहरात आणि मग मोठ्या शहरात प्रवास करत राहणाऱ्या जनसमुदायापैकीच आपणही अनेक जण आहोतच की. आपण शिकलो की जेव्हा जेव्हा परत गावात जातो तेव्हा वाटतं ,काय हा प्लास्टिक कचरा,घाण... "ही गावं काही सुधारत नाहीत".. म्हणजे नेमकं काय अपेक्षित असतं आपल्याला?.. तिथली स्वच्छता, टापटीप, भाषा, राहणीमान,घरं यांमध्ये फरक हवा असतो की वृत्तीत? "ती ती माणसं सुखीच असतात का?.. त्यांना सुधारणेचा हेका आपण घेतो.. त्यांचं जुनं बाद करून नवीन गोष्टी डोक्यात भरवतो, नवीन शिक्षण देतो.. मग विकास.. मार्केटिंगच्या रेट्यात मग तिथे एकवेळ झाडावर चढणारा माणूस मिळणार नाही की पिक तोडायला तरुण मजूर पण क्रिकेट लीग खेळायला, चिप्सची पाकिटे रिचवत चौकात पिचकाऱ्या मारणारे शाळकरी शिक्षित तरुण नक्की दिसतात.. मग "गावात लोकांनी हालाखीतच रहावं की काय?" किंवा सारवलेल्या भिंतीत, जमिनीवरच आयुष्य काढायचं काय?"

उद्यमीता, विकास जो आपल्याला शहरात झाला असं वाटतं तो आज कोणत्या टप्प्यावर आहे?  नव्याने विकास साधायचा असेल गावांमध्ये तर त्याचे स्वरूप काय असायला हवे? की ही आता एक अटळ सुरू झालेली जागतिक प्रक्रिया आहे..न थांबवता येणारी? 

खूप विचार डोक्यात घोळत होते.. 

सांगली जवळच्या दंडोबाच्या परिसरातील खेडेगावात किंवा कवठेमहांकाळ भागात फिरणं झालंय, कधी कोकणातल्या खेड्यात, घरांत कामासाठी गेलीय, ईशान्य भारतात अरुणाचल प्रदेशात रोईंगच्या आतल्या खेड्यात शिबीर घेण्यासाठी राहिलीय, रोप मल्लखांब स्पर्धेमुळे तर निमशहरी गावांततले ठिकठिकाणचे अनुभव घेतले. सगळी भारतातीलच गावं,खेडी पण किती विविधता.. 'उंच असे हिमाचल परि प्रिय आम्हा सह्यकडा' तसं महाराष्ट्रातील खेडी आपली वाटतात हे मान्य करावं लागेल.. त्यामानाने टापटीप, स्वच्छता जास्त वाटते.. इथे उत्तर प्रदेश, बिहार जरा बकालच वाटला.. अगदी रेल्वेतून बघताना, बसमधून बघताना देखील. मान्य की हे वरवरचे निरीक्षण असेल पण आसाम,बंगाल मधला "लाहे लाहे" प्रकार एकवेळ समजतो पण इथला "उदासीन थंडपणा" वेगळा वाटतो.. गावात फिरताना पण मला तो एक अशिक्षित नव्हे तर "परंपरागत, अर्थहीन, उदासीन भाव" जाणवला... ओय, सगळं वाईट होतं असं नव्हे पण हे खेडं मनात भरलं नाही.. तर मनात उरलं,साठलं...

गेल्या गेल्या ट्रॅक्टर, मग ऊस, मग तो खाणे, शेकोटी भोवती बसलेले गावकरी, तरुण बायका घरात, पोरं गोट्या नाहीतर काही तरी खेळतायत.. काही लोकं शेतातला ऊस तोडतायत.. काही गूळ तयार करण्याची यंत्रणा, रचना जोडतायत... हळूहळू प्रत्येक जण विखूरला.... सैलावला...

 मला BGT competition मधे प्रत्यक्षात सादरीकरण करायचे नसल्याने मी फक्त उद्योग कोणता सुरू होऊ शकेल वगैरे यात गुंतून पडायचे नाही असे ठरवले... बरं मी Facci असले तरी आमच्या गटात पुरेसे अभ्यासू लोक होते..ते नक्की उत्तम तयारी करतील याची खात्री करून घेतली होती मी... एका पोराची सायकल मिळवली.. आणि गावभर हिंडून आले.. थेट स्वैपाकघरात घुसून बांबूच्या वेगळ्या प्रकारच्या  मोड्यावर बसून थेट बायांशी गप्पा मारल्या. शेकोटी भोवती हात शेकत बसलेल्या बुजुर्गांची हालचाल विचारली..

आपल्याकडे शेणाच्या गोल गोवऱ्या थापतात,इथे चौकोनी लांब खांब असावेत तशी रचना गोवऱ्याची बघितली. शेणात गव्हाच्या भुसा मिसळून तयार केलेले हे खांब एकमेकांवर उभे आडवे ठेऊन वाळवले जातात हे समजलं. लाकडासारखे चुलीत घालायला हे उपयोगी पडतात, पुढे मागे करता येतात. मग आपल्याकडे गोल का थापत असतील बरं?

मी सायकल चालवत फिरत होते आणि काही बायका माझ्या मागं असं लक्षात आलं.. मग थांबले.. "हर साल क्यौ आये हो ..ये जागृती यात्रा क्या करती है? आचार बनवणाऱ्या या बायका होत्या आणि त्यांना माझं लग्न झालंय का? मुलगा आहे की मुलगी यामधे फार रुची होती. मग "लडकी ही है तो किसीने कोसा नहीं?" "आदमीने इस यात्रा पे छोडा कैसे? हम तो बहुओंको ऐसे नही जाने देते" वगैरे प्रश्न आणि मग "सायकलपे क्यौ घूम रही हो... यहाँ तो बहूए सायकल नहीं चला ती, म मर्दको अच्छा नहीं लगेगा"

मला हे प्रश्न नवीन नव्हते किंवा धक्कादायक तर मुळीच नव्हते.. सायकलचा विषय सोडला तर, मुलीच का ? हा प्रश्न मी अनेकदा अनेकांकडून ऐकला आहे त्यामुळे आता काही वाटत नाही आणि मी त्यावर हसण्यापलीकडे काही प्रतिक्रिया देत नाही.

सायकलचं म्हणाल तर मला अजूनही खूप चालवत नव्हते, अशक्तपणा होता आणि खूप फिरून गाव बघायची इच्छा होती.. त्यामुळे सायकल मिळवली होती.. पुढे घरं बघत जात होते.. तर बरीच कच्ची घरं होती तशीच पक्की सिमेंटची छान बांधलेली नवी घरही होती.. पुश्तैनी घर भी थे... कुछ खंडहर जैसे सुनसान पडे घर भी थे, जहाँ आजकाल कोई नहीं रहेता|

एका घरापाशी थांबले.. म्हंटलं आपण काहीच करायचं नाही त्यांनीच घरात नेलं पाहिजे, चहा पाजला पाहिजे,...(छात्र प्रबोधन शिबीराचा पीळ)

त्या घराचा दरवाजा लाकडी, कोरीवकाम केलेला होता, फोटो काढून घेतला, पडवीतल्या भिंतीला कोनाडे छान,ते ही टिपले पटकन तोवर दार किलकिलं झालं.. समजलं की हे खूप जुनं घर आहे..दिसत होतंच....धूळ काळाची पुटंही वस्तू आणि वास्तूवर दिसत होतीच. ते एका डाॅक्टरचं घर होतं, आता कुणी डॉक्टर नाही.. बरंच म्हणजे ७०हून अधिक काळ जुनं घर होतं..."दीदी खाली चाय पिओगी?" असं एका तरुण मुलीनं मला विचारले.. म्हंटले," जरूर पिऊंगी, पर छतपे जा के चाय पी सकते हैं क्या? "तर ती तयार झाली... आणि cohort मधली प्रतीक्षा पण समोर दिसली, ती पण आली वरती... भिंतीतून जाणारा जिना, घर कधीकाळी आवरलं होतं का ?असं वाटावं अशी परिस्थिती होती.. खूप जुनं जुनं सामान... आम्ही छतावर आलो..(गच्चीवर वगैरे आपल्याकडे.. यहाँ छतपे जाना मतलब बहोत सारे काम रहते है .. प्यारसे लेके, बरसात तक और साडीयाॅ सुखानेसे लेके पापड सुखाने तक सबकुछ छतपे...हे ज्ञान पण पदरात ... कानटोपी, स्कार्फ मधे पाडून घेतलं). सगळी छतं खेटून खेटून... थोडक्यात घरं चिकटून.. हे घर पुरेसं मोठं होतं..ट्रेमध्ये काळा चहा आणि तांदुळाच्या पोह्यांचा वेगळाच चिवडा आला समोर.. थंडी होतीच.. मी, प्रतीक्षा आणि घर मालकिण काकू असा चहा घेतला. पलीकडच्या घराच्या छतावर पण अशीच चहा पार्टी चालू होती... यात्रेकरूंची...



या डॉक्टर घरातून बाहेर पडताना समजलं की आज गावात हवी तशी वैद्यकीय सेवा नाही, देवरियाच गाठावं लागतं. तिथून बाहेर पडले, जाणवलं मुली,बायकांची स्थिती इथून तिथून सगळीकडे कमी अधिक तशीच.. सायकल त्या छोट्या मुलाला परत केली आणि एकटीच चालत सुटले... आमचा गट कुठे होता कोण जाणे, पण ती काही लहान शालेय मुले नव्हती, त्यामुळे तसे टेंशन नव्हते. पुढे एक काका हातात सायकल घेऊन चालत निघाले होते, सहज विचारलं कुठे चाललाय  ते स्कुलही जा रहे थे...

तो पुछा "आप चलते ही जा रहे हो तो मैं सायकलसे घुमके स्कुल आ जाऊ क्या?" तर चक्क हो म्हणाले...मी अशी दिली असती सायकल कुणाला इतक्या पटकन? पण हा माणूस निवांत होता... मणी सर की यात्रा ना तो ठीक है.. इतका विश्वास त्याला होता.

मग मी मोठा फेरफटका मारायचा ठरवला आणि जवळपासच्या वस्ती फिरत फिरत शाळेत पोहोचले, बाकीचे येतायत ना एवढं फोनवरून समजून घेतलं. वस्त्या ,गावं अस्वच्छ आहेत... हे फार प्रकर्षाने जाणवले... तर दुसरीकडे बांधीव घरांचा मुख्य दरवाजा लाकडी कोरीवकाम केलेला असतो, ते जरा प्रतिथयश,जुनं घर असतं एवढं लक्षात आलं... जातीनिहाय वस्त्या आहेत हे लक्षात आलं पण तशी चर्चा नाही करता आली कुणाशी.... 

आमच्या गटाच्या BGT competition साठी चर्चेत असलेली कल्पना इथे चालू शकते असा अंदाज नक्की आला.. म्हणजे चला अगदीच हवेत कल्पना तरी नाही आहे..मग झाले तर..

दमसास घेत घेत शाळेपाशी पोचले... जेवण करून लगेचच पुढचे जवळपास ३.३० तास स्पर्धा तयारीला मिळणार होते.. जाऊन आमच्या दोन्ही गटांसाठी कार्डशीट पेपर, स्केचपेन साहित्य घेऊन आले.. यात्री टेबला-टेबलावर आपापल्या गटात बसू लागले... 

दिवस संपला नव्हता उलट आता तर खरा रंग चढायला लागला होता, 

गटात काम करणे, आपले मत पटवणे, बिझनेस कल्पना सादर करणे .. त्यासाठी facts, figure, loans, govt schemes, finance वगैरे चर्चा कागदावर उतरू लागल्या... हे सगळं खोलीत नव्हे तर झाडाखाली, कुठे मांडवात, जागा आणि टेबल मिळेल तिथे... पुढचे तीन चार तास खऱ्या अर्थाने गटात काम झाले... आमचा गट manufacturing बिझनेस बद्दल सादरीकरण करणार होता.. कल्पना नक्की झाली, खातेवाटप झाले, गुगल करण्यात, लिहून काढण्यात मंडळी दंग झाली... स्पर्धा स्पिरीट यात्रींमधे पसरलं.. आमच्या गटाचे आशिष सर तिथे आहेत असं मी बघितले आणि थोडी बाहेर पडले.. माझी प्रत्यक्षात गरज तिथे नाही हे लक्षात आल्यावर इतर गोष्टी बघून घेऊ असा मी विचार केला....

तर काही Facci ना गट स्पर्धेत भागच घेणार नाही म्हणत होता..ही समस्या होती.. त्यामानाने मी आणि आशिष सर फारच सुदैवी होतो.. आमचा गट full charge होता.. फक्त मोबाईल बॅटरी मात्र संपत चालल्या होत्या..... दिवस संपला नाही, आत्ता कुठे खऱ्या अर्थाने काम सुरू झालं. भाज्य आणि भाजक तर ठरले बाकी उद्याच्या भागात....


प्राची परांजपे 

७/०३/२०२३

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग १ - इच्छा जागृतीची

भाग ३१ - यात्रा सफल संपूर्ण

भाग २५ - राजस्थान .. तिलोनीयाकडे