भाग २२ - बरगत का पेड आणि Baniyan Revolution
या आधीच्या ब्लॉगमध्ये लिहिलंय तसं पहाटे लवकर उठायचं ठरवूनच मी रात्री आडवी झाले... बरपारच्या थंड रात्रीची तुलना बर्फाळ अशीच करता येईल... मजा आली. हो, त्रास झाला तरीही थंडीची पण एक मजा असते, नशा असते... माझ्या सारख्या कधीही, कुठेही थंडी वाजणाऱ्यांना शाल, टोपी, मफलर, स्वेटर, आणि जे जे थंडीपासून संरक्षण करतील असे गरम कपडे जीवाभावाचे सोबती वाटतात. एकवेळ माणसं सोडून जातील, माणसांची उब कमी होईल, पण स्वेटर वगैरे मंडळी आपल्या बरोबर असतात तेवढे दिवस तेवढीच उब देत राहतात..
त्या बर्फाळ थंडीत पहाटे ४ वाजता मी त्या मोठ्या घरातल्या एका मोठ्या खोलीतून बाहेर आले.. कसली भारी थंडी होती... दात वगैरे घासण्याची आपल्याला फारच सवय असते नाही.. आज त्या गार पाण्यात हात घालावा का? हे ठरवण्यासाठी मी सहज गुगल केलं .. तापमान ४° दाखवत होतं.. सहाजिकच जास्तच थंडी वाजायला लागली..पण मग बेसिनचा नळ सोडला आणि भराभर तोंडावर पाणी मारलं.. अंगात एकावर एक चढवलेले स्वेटर, मफलर, टोपी सगळं काढून टाकलं.. म्हंटलं काय होतंय ते तरी बघुया.. काही झालं नाही..मजेत आवरून झालं. सहज खोलीत येऊन कुणी उठतंय का किंवा कुणाला उठायचंय का याचा अंदाज घेतला, हृषिका उठतीय लक्षात आल्यावर तिला सांगितले की मी गच्चीवर जातीये तू पण ये, तिने हो म्हंटलंन्.
गच्चीवर गेल्यावर लक्षात आलं या इमारतीच्या एकाच भागात आम्ही राहतोय.. मधे भला मोठा चौक आहे..शहाबादी फरशी घातलेला, आणि आणखी पलीकडे खोल्या आहेत.. चौसोपी वाडा असतो तशी ही उत्तर हिंदुस्थानी पुश्तैनी हवेली आहे तर.. भली मोठी गच्ची.. त्यातून एक जीना वर गेलेला... त्यावरून दिसणारी लांबच लांब हिरवीगार शेती....
ते तयार होते.. आम्ही सगळ्यांनी चहा घेतला. पण माझ्या ओळखीचे तिथले हृषिकासकट सगळे यात्री लोक ट्रॅक्टरने जाण्यास उत्सूक होते, आणि ट्रॅक्टर भरल्याशिवाय सुटणार नाही आणि तेवढे लोक तिथे जमलेलेच नाहीत.. शिवाय शशांक मणी त्रिपाठींबरोबर जाऊ वगैरे चर्चा पण सुरू होत्या. एकुणात सगळे chill mode मधे होते.. आणि मला तर लवकर जायचं होतं.. "हम दोनो तय्यार है तो निकल जाएंगे क्या?" असं विचारलं आणि मी, संदीप सर असे दोघं, अजून एक मुलगी असं चालायला लागलो.. इतकं मस्त वाटत होतं म्हणून सांगू.. ते काय डिफेन्सवाले, लागले की भरभर चालायला, ती मुलगी केव्हाच मागे पडली आणि मी गती गाठत होते, एका टप्प्यावर त्यांना समजलं आणि मग मी थोडी गती वाढवली आणि सरांनी थोडी कमी केली. आम्ही मग गती जुळवून घेतली. मारे मला भारी वाटत होतं की भल्या पहाटे आपणच पोचणार पण दुसऱ्या बाजूने आशिष सर आणि इचलकरंजीचे विनय परत येताना दिसले..म्हंटलं, अरे हे तर भलतेच बहाद्दर निघाले, कधी बरं बाहेर पडले असतील हे दोघं?
असो, आम्ही आमची गती पकडली, ते त्यांच्या गतीने परत गेले...
बरगत का पेड, बनियान ट्री, मराठीत वडाचं झाड पण याचं नाव मणी सरांकडून इतकेवेळा ऐकलं होतं की पाहायची जाम इच्छा होती...
पूर्वी बरगतच्या खालीच तर किरकोळ विक्रेते वस्तू विकायला बसायचे ते बनिया झाले. गावोगावी व्यापारी यायचे वडाचं मोठं झाड बघून तात्पुरतं दुकान थाटायचे, व्यापार करून पुढं जायचे.. मग त्याचं झालं बनियान ट्री..
वडाच्या झाडाखाली व्यापार बहरतो.... पंचायत बसायची ती वडाच्या झाडाखाली.. गावच्या विकासासाठी चर्चा व्हायच्या त्या इथंच वडाच्या पारावर. उद्यमशीलता वाढवण्यासाठीच तर हा जागृती यात्रेचा खटाटोप... म्हणून मग Baniyan Revolution.
हरितक्रांतीने शेतकऱ्यांना प्रेरणा मिळाली, धवलक्रांतीने दूध दुभत्या जनावरांना आणि त्यावर आधारित लोकांना चालना मिळाली..आता वेळ आहे बरगतक्रांतीची Banyan Revolution ची. Banayan Revolution will motives those Udyamis who can build India of small towns and districts.
आपल्याला कोणताही उठाव, क्रांती करायला एक तात्कालिक कारण लागलं तसंच एक प्रतिक लागतं... शशांक मणी त्रिपाठींनी विचार केलाय की हे २५० हून अधिक जुनं वडाचं झाड उद्योजक घडवण्यासाठी प्रतिक म्हणून, प्रेरणास्थान म्हणून वापरूया.. आणि त्या शेजारी उद्यमशीलता प्रशिक्षण वास्तू उभी करूया, ज्याचा पहिला टप्पा पूर्ण झालाय.. तर ते झाड बघायला आम्ही चाललो होतो.. शशांकजींची तब्येत बरी नाही असे समजले, थोडक्यात ते तिकडे येणार नाहीत हे नक्की झाले, इतक्या वर्षांच्या यात्रेत असं कधी घडलं नव्हतं पण घडू शकतं ना.. त्यामुळे तिथे शशांजींचा प्रेरक संवाद ऐकायला मिळणार नव्हता. ठीकच आहे. तसंही दरवेळी बाह्य पेट्रोलवर काम करायला आपण निर्जीव गाडी थोडीच आहोत... आपापलं पेट्रोल आतून कसं तयार करायचं हेच तर शिकतोय इतकी वर्षे..
नाही तर काय फक्त वय वाढलं आपल्या सजीव गाडीचं एवढंच म्हणता येईल.. बरं ही अशी गाडी १५ वर्ष झाली म्हणून भंगारात नाही घालता येत...
तर खूप सुंदर हवेत.. हम उस बरगत पेडके पास पोहोच गये...
एका फोटोत पूर्ण मावणार नाही एवढं मोठं झाड होतं.. आता मी आणि संदीप सर काहीच बोलत नव्हतो.. काय करायचंय इथे हे आम्हाला न बोलताही समजलं होतं... एक प्लास्टिकचा मोठा कागद झाडाखाली पसरला.. आणि त्यावर आम्ही बसलो.. माझ्या डोक्यात ज्ञान प्रबोधिनीची उपासना करायचा विचार होता, आणि संदीप सरांना काही मेडिटेशन करायचं होतं... खूप वेळ आम्ही डोळे बंद करून फक्त बसून राहिलो... मी श्वास समजून घेत श्वासायाम करत राहिले... प्राणायाम, मेडिटेशन वगैरे शब्द मी वापरतंच नाही.. आपण बहुतेक सगळे ज्याला प्राणायाम म्हणतो, तो फक्त श्वासायामच असतो.. प्राणाला संचलित करायला जी उर्जा गरजेची आहे ती आधी श्वासात तर हवी.. पण शब्द वापरायची हौस सध्या वाढतीय. असो. काही प्रगट स्वयंसूचना दिल्या... किती वेळ जवळपास १५- २० मिनिटे सहज बसलो होतो आम्ही.. काही वर्षांपूर्वी राजगडावर नेढ्यात डोळे बंद करून बराचवेळ बसले असता जे जाणवलं होतं, यात्रेच्या सुरुवातीला एका दगडावर बसून कन्याकुमारीच्या समुद्राकडे बघत जे जाणवलं होतं तसंच काहीसं या वटवृक्षाच्या छायेत बसून जाणवलं.. या सगळ्या ठिकाणी काही महान ज्ञान प्राप्त झालं का? साक्षात्कार झाला का? तर नाही पण inner journey process मधलं काही तरी पुढच्या टप्प्यावरचं जाणवलं हे नक्की.. प्रथम दर्शनी बडबडी, अस्वस्थ, चिडचिडी, आग्रही, काही वेळा वैतागलेल्या मला असे आतले क्षण अनेकदा सापडतात.. जेव्हा, जसे, जिथे सापडतात ते मी मनात टिपलेत. माणूस रोज दिसतो,वागतो तसाच असतो यावर माझा विश्वास नाही.. माणूस आतून वेगळा असूच शकतो.. व्यक्तीमत्व दोन पातळ्यांवर समांतरपणे वाहत असतं. नीट विचार केला तर प्रत्येक माणसाचा एक बाह्य प्रवास आणि एक अंत: प्रवास सुरू असतो.. ज्याला inner and outer journey म्हणू शकतो. लोकांना आपण कसे दिसतो त्याबरोबरच आपल्याला आपण आतून कसे वाटतो हे महत्त्वाचे आहे.हा प्रवास करायला मला आवडतो. या बरगतच्या झाडाखाली मला तो प्रवास करता आला.. डोळे उघडले तर समोर स्वच्छ उजाडले होते, आणि आमच्या मागे बरेच यात्री बसले होते... इतकावेळ हे काहीच कसं जाणवलं नाही मला? इतक्या शांततेचं अचानक शांत गर्दीत रुपांतर झालं. बहुतेक सर्वच यात्री जमा झाले होते, कुणी चालत, तर अनेकजण ट्रॅक्टर मधून.. तिथेच आम्हाला यात्री mentor संजय सर पण भेटले.
तिथे वडाच्या झाडाच्या जवळच्या परिघात चपला घालून जात नाहीत, देव समान मानतात वडाला.. ललिता सतत सांगत होत्या की, इथल्या लोकांच्या भावनांचा आदर करूया....पर यात्री तो ऐसे कुछ समझते नहीं, हर एक का अपना रिवाज, अपनी सोच, अपना दिमाग... और अपने फोटो निकालाने का अंदाज और इंन्स्टापर भेजने की जल्दी..
हळूहळू चालत परत फिरलो.. संदीप सर, मी, ललिता मॅडम.. चालत निघालो परत शाळेकडे. दोघंही ५५ च्या वरच्या वयाचे..old school of thoughts वाले. पण नवीन पिढीतल्या, अगदी स्वतःच्या मुलांनी घेतलेल्या धक्कादायक निर्णायांबाबत स्वीकारशील वाटले. त्यांच्या बोलण्यात सतत येत होतं.. "आजकाल बच्चे किसी देशके नहीं ग्लोबल सिटिझन हो गये है | instead of opposing, better to accept them वो खूश रहे और क्या चाहिए|" अच्छे इन्सान होना जरूरी है बस| मा को तो कुछ समजता है नहीं, चाहें मा किसी कंपनीकी बॉस क्यो न हो| अच्छा है बच्चे अपनी राह खुद ढुंड ले|" यात हतबलता अजिबातच नव्हती, ज्या दोघांशी मी बोलत होते ती कुणी अडाणी माणसं नव्हती. पण मोठ्या शहरात राहून, आणि cosmopolitan वसाहतीतून अंगवळणी पडलेला खुलेपणा होता. हे एकिकडे ऐकत होते आणि काल गावात फिरताना तिथल्या बाया मला विचारत होत्या ,"शादी हुई है?बच्चे है क्या? लडका है या लाडकी? हमे औरतोंको ही अपना घर संभालके यांना है | बाकी तो अपने हाथ में कुछ नहीं, पढना जरूरी है ऐसे लगता है, हमारी बेटियॉ पढेगी |" हे दोन्ही दृष्टीकोन एकाच भारतातले होते... हं. परत गावात थोड्या वेगळ्या गल्लीतून वळण घेऊन, माझं सामान आणि आणखी काही मुलींना चला चला करून आम्ही तिघं शाळेत पोहोचलो....
गार वारा, थंडी, हलकं ऊन हा आनंद तर होताच पण चालता चालता खूप छान ऐकायला मिळालं, यांचंही समाधान होतं. पूर्व , आणि दक्षिण भारतात वाढलेल्या पण समवयस्क माणसांच्या विचारसरणीत वरवर भिन्नता वाटली तरी वयोपरत्वे एक समान धागा सापडतो तसं काहीसं वाटलं..पहाट संपन्न झाली.
आवराआवर करून हळूहळू यात्री बसेमधे चढले.. या थंडीने खरंतर खूप जणं बेजार झाली होती, आजारी होती.. दमली होती, गावात कधी न राहिलेले यात्री होते तसेच गावातच तर राहतोय रोज ,तिथेच तर काम करतो असेही यात्री होते, या ही थंडीत नाचण्या,गाण्याची उर्मी टिकवणारे होते तसेच.. गटागटाने बसून या भौगोलिक, सांस्कृतिक वेगळेपणाला समजून घेणारे यात्री होते, खरंच इथे उद्योग काय उभा राहू शकतो की उभाच राहू नये म्हणून प्रयत्न चालू असतात? बिमारूच राहायचंय का इथे लोकांना? वगैरे वगैरे .... आज जरा दमणूक वाटत होती अनेकांना, कारण रात्रीची झोप नीट झाली नव्हती. थंडी आणि अपुरी व्यवस्था (महिलांकडे उत्तम सोय होती.)
किंवा जमिनीवर झोपायची सवयच सुटली होती यात्रींची... डगडग, डगडग,खडखड, आणि PA system वरून उद्याच्या सूचना ऐकल्याखेरीज न येणारी झोप..
आम्ही काल उतरलो होतो देवरिया सदर या स्टेशनवर आणि आता रेल्वेत चढणार होतो गोरखपूरला. बरपार ते गोरखपूर प्रवास बसमधला फार छान झाला.. बाहेर बघण्यासारखे खूप होते.. मुद्दाम वाढविलेले जंगल, गोरखपूरच्या जवळ आल्यावर दिसणारा Airforce base camp, उत्तर प्रदेशातील एकूण सपाटी, आणि गावागावांमधील कचकच... खूप गर्दी, त्यामुळे बस थांबत, रांगत होती... समोर स्टेशन दिसत होते पण बसला पोचायला थोडं वळसा घालून जावं लागणार होतं..मग तहान लाडू ,भूक लाडू निघाले.. तिथे एक ओम म्हणून यात्री होता, त्याला पण लाडू दिले, तो कानपूरचा होता म्हणून मग जरा UP गप्पा मारल्या.
तो बराचवेळ मला observe करतोय हे कळलं मला, मग न राहवून तो ओम बोलला, "आप ना मेरे एक दीदी जैसे लगती हो, वैसेही रहेती हो, और ये जो लड्डू आपने दिये वो भक्ती दीदी वैसेही लड्डू बनाती थी, कानपूर IIT मे रहती थी|" त्यानं एवढं सांगितलं आणि माझी ट्यूब पेटली ..तो माझी सांगलीची बाल मैत्रीण भक्ती पटवर्धन आताची भक्ती साठे हिच्या बद्दल बोलत होता... ती मधली काही वर्षे IIT कानपूरला राहात होती, आणि वनवासी कल्याण आश्रम आणि अशाप्रकारच्या कामात सक्रिय होती... आम्ही दोघी एकाच गावात वाढलेल्या त्यामुळे असेल किंवा महाराष्ट्रातल्या होतो म्हणून असेल त्याला आमच्या दोघीत कमालीचं साम्य आढळलं, आणि चक्क तिथे भक्तीची आठवण निघाल्यानं फारच भारी वाटलं. कोण कुठे भेटेल आणि काय कनेक्शन लागेल सांगता येत नाही. इतकंच काय पुढे अहमदाबादला मला साडीत बघून हा म्हणतोय ,"मेरी भक्ती दीदी ऐसेही अच्छेसे साडी पेहेनती थी" यात 'अच्छेसे' वर त्याने जोर दिला होता .. त्याला काय म्हणायचंय म्हणून मी विचारले तर आजूबाजूला त्याने मला साडीतल्या यात्री दाखवल्या. मी काय बोलणार यावर हसले होते तेव्हा फक्त.. बोलून उपयोग नसतो, यात्रेत तर नाहीच.
यात्रेत पोशाखातील नवनवीन 'ट्रेंड' मी समजून घेत होते... आणि आपण उगाच 'म्हाताऱ्या' होण्यापासून स्वतःला रोखत होते..
रेल्वेत चढलो आणि हळूहळू यात्री दिल्लीत कोण कोण उतरणार अर्थात deboard होणार थोडक्यात इथेच यात्रेतून परत जाणार किंवा निदान दिल्लीत निम्मं सामान तरी घरी देऊन, मग परत यात्रेत सामील होणार अशा चर्चा सुरू झाल्या. एकतर यात्रेत खूप दिल्लीकर होते, काही मूळचे इथले तर काही शिक्षण,काम यासाठी दिल्लीत स्थिरावलेले... एकुण काय तर उद्याचा दिवस पण "थोडा दिल्ली घूमके आएंगे| इससे मिलेंगे, कॉलेज हो के आते है चलो" असाच असणार हे जाणवायला लागलं. याचा अर्थ ५०० मधले सगळेच गेले असा नसतो पण ३०-४० जणं फिरून येणार एवढं नक्की असतं. बाकी सगळे माझ्या सारखेच.. "जाना तो चाहिए पर जाएंगे नहीं " असंच म्हणणारे.... तरीही मनात 'गूंज'ची गूंज सुरू झाली होती...थंडी 'मी' म्हणत होती, आणि मी लवकर झोपेन म्हणत होते... मनात होतं बर्फाळ बरपार आणि बरगत का पेड...
प्राची परांजपे
११/०३/२०२३




बरगत के पेड कि तरह आपके प्रवास यात्रा कि कहाणी लाजवाब फैल रही है और हम ना सिर्फ इसमे आनंद ले रहे है बलकी 24 घंटे प्रदान किया गया ऑक्सिजन ( गयान रुपी ) भी प्राप्त कर रहे है ..तहे दिल से शुकरीया प्राची जी.
उत्तर द्याहटवाधन्यवाद.
हटवाफारच सुंदर आहे हे रसायन. कदाचीत 22 भगांमधला सर्वोत्कृष्ट. निदान तीन सर्वोत्कृष्ट मधील एक.
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवा