भाग १७ - बेहरामपूर (पुढे सुरू)
ग्रामविकास संस्थेचचं काम बघून आम्ही kanakia शाळेत पोचलो, दुतर्फा विविध पारंपरिक आणि स्काऊटच्या पोशाखातील शालेय मुलामुलींनी जागृती यात्रेतील सगळ्यांचं स्वागत केलं..
आत भलं मोठं पटांगण.. आणि त्या कडेला एक रंगमंच.
नुकतीच टेकडी चढून त्यानंतर सायकल चालवून लगेचच तिथे आल्याने मला कुठेतरी छान बसून कार्यक्रम बघावासा वाटत होता, तशीच बाजूच्या इमारतीला असलेल्या सगळ्यात वरच्या पायरीवर मी जागा पकडून बसले.. बरोबरचे बरेच जणं तिकडे आले, काही खाली रेंगाळले, काहींनी त्या चमचमत्या, चुलबुल्या छोट्या मुलांबरोबर फोटो काढले, काहींनी ती शाळा बघितली, काहींनी मोबाईल चार्जिंग पॉईंट शोधले ,तर बरेच जणं रंगमंचासमोरील जागेत बसले..
ओरिसातील नृत्य प्रकार रंगमंचावर सादर होत होते. यामध्ये कार्तिकेय आणि तारकासूर युद्धाची गोष्ट पारंपरिक वेशभूषेत लोकनृत्य पद्धतीने सादर झाली. संबलपुरी नृत्य तसेच ओरिया भाषेतील आपल्या कोळी नृत्याला जवळ जाणारी बरीच लोकप्रिय गाणी, नृत्य सादर झाली.. ओरिया पद्धतीच्या रंगबिरंगी साड्या घातलेल्या छोट्या मुली फारच गोड दिसत होत्या...
तो कार्यक्रम संपल्यावर.. चहापानानंतर रंगमंचावर यात्रींनी कब्जा केला.. ३१ डिसेंबर पार्टीला अनौपचारिकरित्या सुरुवात झाली होती.. आणि माझ्यासारखे बघे हे सगळं बसून बघण्याचा आनंद देखील घेत होतेच, गाणी ऐकत ताल देत होते... याच उत्साहात काहीशा त्याच hangover मधे आम्ही सगळेच बेहरामपूर स्टेशनवर आलो, आता जेवायचं आणि रेल्वेत बसायचं.. अशी माझी समजूत होती..
पण स्टेशनवर पोचलो आणि जे बघितलं ते धक्कादायक होतं... सुखद धक्का..
चक्क तो संपूर्ण प्लॅटफॉर्म रंगीत फुग्यांनी, फुलांच्या रचनांनी सजवण्यात आला होता.. "oh ,that means the real party now begins..Yaro chalo.. "
एकीकडे डिजे, गाणी, नाचणे चालू झाले.. आणि मी,वर्षा आम्ही गर्दी नाही तर आधी जेवण करू म्हणून रांगेला लागलो.
फ्रुटसॅलेड, सूप, मांचुरियन, पाव भाजी, न्यूडल्स, राईस, पाणीपुरी वगैरे जोरदार बेत होता...
हे इतके तरतह्रेचे पदार्थ ही लोकं कशी करतात, ते पण रेल्वेत,एक दिवस नाही सलग १५ दिवस.. एक वेळचं नाही तर दिवसाला ४ वेळा..
खरंतर व्यायाम कमी आणि खाणं जास्त चालू होतं.. त्यामुळेच मी आणि वर्षाने किती आणि काय खायचं ठरवून टाकलं होतं. दोनच पुऱ्या, वाटीभर डाळ, अगदी कमी भात.. नाश्ता पण तेवढाच माफक वगैरे.. आम्ही काही रोजचं ठरवून टाकलं होतं.. पण हे असं पाणीपुरी वगैरे समोर आलं ते पण चक्क जागृती यात्रेत म्हणजे जरा जास्तच होतं.. शेवटी 'पापु' ला पुरे म्हणून आम्ही दोघी चालण्यासाठी त्या पार्टीतून थोड्या बाहेर पडलो.. स्टेशनच्या प्लॅटफॉर्मच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत दोन चकरा मारल्यावर जरा हलकं वाटलं,पण आवाज काही कमी होईना.. अशा पद्धतीने नाचणं चूक बरोबर काहीच म्हणायचं नव्हतं..पण आम्हाला जरा तिथे बोअर व्हायला लागलं, नको वाटलं .. मग पूल चढून पलीकडच्या प्लॅटफॉर्मवर जाऊन मस्त strong coffee तर झालीच पाहिजे ना.. अर्थातच "coffee and लाल सा (आसामी बिन दुधाचा चहा) सामने आये तो पी लेना चाहिए" आमची मैत्रीण निवेदिता पोंक्षेचं वाक्य आठवलं..जे जसं आहे तसं, ती जेव्हा जिथं आहे तिथली होऊन जायची.. तिची फार आठवण झाली बेहरामपूरला..मी आणि Facci वर्षा खूप गप्पा मारल्या..आम्ही दोघी अगदी समवयस्क, एकाच वयाच्या. कारण आमचं जन्म साल एकच होतं..त्यामुळे खरंच lifetime line बद्दल बोलायचो तेव्हा लक्षात यायचं की आपल्या लहानपणी म्हणजे खरंच आमच्या दोघींच्या लहानपणी.. मग बाबरी मशीद पडली तेव्हा तू काय विचार केलेला किंवा आपण शाळा कॉलेजमधे असताना 31 डिसेंबर कसा असायचा, जागृती यात्रेचं खरंच प्रयोजन काय वाटतंय, रेल्वेची रचना, बघितलेली रोल मॉडेल अशा अनेक गोष्टींवर आम्ही त्या दिवशी बोललो.. ठराविक जन्म साल आणि वागण्याची पद्धत यात काही साधर्म्य जाणवते का? अशीच एक बळंच चर्चा आम्ही केली.. तुम्ही पण विचार करून बघा बरं..असं काही मोठं साम्य जाणवतं का तुम्हाला?
.. वर्षा ही अतिशय शिस्तबद्ध, विचारी होती. प्रोफेशनलॅलिझम व्यक्तीमत्वात भिनलेली अशी ती होती. वर्षा, ही लेखिका रश्मी बन्सल बरोबर असोसिएट म्हणून काम करते. पब्लिशिंग हाऊसमधे काम करत असल्याने प्रिंट मिडिया बद्दल, books and publisher बद्दलचा तिचा अनुभव मोठा होता.. कायम trousers and shirt मधे असलेली वर्षा हे एक उमदं व्यक्तीमत्व होतं.. आम्ही पलीकडून समोरच्या प्लॅटफॉर्मवर आमच्या नाचत असलेल्या जागृती यात्रेच्या यात्रींना बघत होतो, बघायला, मजा वाटत होती..
परत आल्यावर मी चक्क फुग्यांनी खेळले, "वो आपके यहाँ फुगडी क्या होता है?" असं काही यात्रींनी विचारलं मग फुगडी काय चीज आहे हे पण मी आणि प्रतीक्षा नी दाखवलं...
धमाल.. तरीही अजूनही डीजे,गाणी थांबत नव्हती...बराच वेळ झाला,केक (बरेच केक.. दिशा टीमसाठीचा खास केक) कापून खाऊन झाला..
अचानक फुग्यांच्या माळांमधले फुगे फोडायला सुरुवात झाली.. थोडावेळ गेला, मग शशांक मणी त्रिपाठींनी सगळ्यांना थांबवून आहे तिथे मेडिटेशनसाठी उभे रहा, बसा पण डोळे बंद करून शांत थांबायला सांगितले.
मगाशी चालू असलेल्या आवाजाचं शांततेत रुपांतर झालं..
"मजा तो आया पार्टी का, पर अब पूरा प्लॅटफॉर्म साफ करकेही रेल्वेमे चढना है।"
बऱ्याच जणांनी लगेचच स्वच्छता करायला सुरुवात केली... प्लास्टिक, फुलं पानं, पाण्याच्या बाटल्या, फुटलेले फुगे... सगळं साफ करायला हवंय हे लक्षात आलं आणि ERC बरोबर आम्ही यात्री कामाला लागलो..
बघता बघता प्लॅटफॉर्म स्वच्छ झाला. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच चांगली सुरुवात आणि फार काही न बोलता हवा तो संदेश शशांकजींनी सर्वांपर्यंत पोहोचवला.. अनेकांना त्यांना काय म्हणायचंय ते भिडलं, आणखी काय पाहिजे होतं..
रेल्वेत चढलो तर 'छेना पोडा' ही ओरिसाची प्रसिद्ध मिठाई डब्यात डब्यातून फिरत होती.. पनीर, गूळ, तांदूळाची पीठी, दूध, तूप आणि हवा तो आणि हवा तेवढा सुकामेवा..या सामग्री पासून हा गोड पदार्थ बनतो एवढं ज्ञान मी अवगत करून घेतलं.. जिथं जाऊ तिथला पोशाख अनेक यात्री गंमत म्हणून परिधान करत होते, ,"फील आना चाहिए" म्हणून... पोशाखाबाबत मी जरा rigid च आहे पण खानपान संस्कृती मी आपणहून समजावून घेते..
"माणसाच्या ह्रदयात पोचायचा मार्ग पोटातून जातो हे मला पक्कं ठाऊक आहे."
खरंतर एव्हाना १ जानेवारी उजाडला होता म्हणजे जवळपास १२.३० वाजले होते... हवेतही किंचित गारवा जाणवत होता, आणि आता झोपेची नितांत गरज होती...
नवा गडी नवं राज्य तसं आमचं चालू होतं.. रोज नवीन ठिकाण, नवीन रोल मॉडेल बघणे, चर्चा, presentation असेल त्या ग्रुपची तयारी, Pannel discussion, नवीन माणसं, नवीन जागा, नवी हवा...
पण १ जानेवारीचा अख्खा दिवस रेल्वेतच म्हणजे प्रवासातच जाणार होता, कुठे उतरायचे नव्हते, काही बघायचे नव्हते... त्यामुळे यात्रीची सकाळ थोडी धीमी धीमी होणार होती हे नक्की.. फक्त एव्हाना BGT compitition ची तयारी, चर्चा सुरू झाली होती.... त्याचेच वारे रेल्वेभर दिवसभर वाहणार होते हे नक्की.. तूर्तास खिडकीतून येणाऱ्या वाऱ्याचा बंदोबस्त करून मी झोपणार होते तोच स्पिकरवर ऐकू आले...
"सभी यात्रीओको अब अपने अपने शरीर को विश्राम देने की जरुरत है|"...पर मानेंगे तो वो यात्री कैसे... अजूनही नाचण्या,गाण्याची उर्मी लोकांमध्ये होती...
यारो चलो जाओ यहाँ से ...असं म्हणत मी माझ्या कंपार्टमेंटमधील लोकांना पिटाळलं आणि स्लिपिंग बॅग जवळ केली..
प्राची परांजपे
१२/२/२०२३










चांगलं लिहिलंय. आपण तिथे आहोत असे वाटते. सगळ्यांमध्ये सगळ्यांसारखी आणि तरीही आपली वेगळी असते. सुंदर... नानी.
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवा