भाग १६ - बेहरामपूर - ग्रामविकास

विशाखापट्टणम स्टेशनवरून रेल्वे सुटायला बराच वेळ लागला... दिवसभरात खूप काही ऐकलं, बघितलं होतं, झोपेची गरज होतीच.. उठून पुन्हा नवीन ठिकाणी नवीन उत्साहाने जायचं होतं. 

नेहमीप्रमाणे माझी सकाळ पहाटेच झाली. ओरिसा, आंध्रप्रदेश सीमावर्ती भाग.. नदीवरचे पूल..बाहेरच्या भौगोलिक बदलांना AC chair Car मधून न्याहाळताना मजा येत होती पण ती बदलती हवा, तो वारा, तो बदलता वास या बंद डब्यातून मनाला उमगत होता, पण स्पर्शाला जाणवत नव्हता. पण गरम चहाने गरजेचा ताजेपणा घशाला स्पर्शवला..

चला, काही तासांतच बेहरामपूरला उतरण्यासाठी आम्ही सज्ज झालो. आज तारीख होती ३१डिसेंबर २०२२.

इंग्रजी किंवा आपल्या रोजच्या वापरातील कॅलेंडर नुसार वर्षांचा शेवटचा दिवस... आमच्या बोगीत जरा Blue - Red Colour Code करू अशी चर्चा होती.. रोजची मी असते तर हे असलं मी काही केलं नसतं, पण , "माहोल का सुनो मॅडम, बुढे मत बनो"...असं मला सांगण्यात आलं, अन् मग मी पण जरा अखडूपणा सोडायचा ठरवलं. मी बसमधे बसले, तोच कुठून तरी डॉक्टर सुरेंद्र आणि Facci संदीप, Facci श्रुती आले.. आणि धमाल सुरू झाली.. भरपूर गप्पा. 

जागृती यात्रेच्या डॉक्टरांबद्दल मी अजून काही सांगितले नाही, पण त्यांच्या बद्दल लिहायचे आहेच पुढे म्हणून आत्ता सांगत नाही. Facci संदीप हे डिफेन्समधे असलेले उच्च पदस्थ अधिकारी, अतिशय विनम्र, तसे पटकन कुणात न मिसळणारे, पण मदतीसाठी सदैव तत्पर,  Caring Nature, Civilian बद्दल जाणून घेण्याची इच्छा असलेले, technology ची जाणीव- आणि गरज समजणारे,  अद्ययावत ज्ञान असणारे, Young India पहायला, समजून घ्यायला म्हणून यात्रेत सहभागी झालेले.. खूप प्रगल्भ माणूस, तितकाच शिकण्याची इच्छा शाबूत ठेऊन असलेला. ते वयाने तर मोठे होतेच पण वेगवेगळ्या अनुभवांमुळे तर फारच वंदनीय होते. बहुतेक त्यांचा Core Work Area सोडून मी त्यांना प्रश्न विचारत असे, ते कोण आहेत या वलयापेक्षा त्यांना हे सगळं बघून कसं वाटतंय, त्यांची मतं हे मी मनापासून समजून घेण्याचा प्रयत्न केला ,  पुढे कधी जाता येता, तर अनेकदा ठरवून एकत्र बसून ओरिसातील आर्थिक, शैक्षणिक स्तर, विभागणी.., नद्या, प्लास्टिक कचरा, शहरांचा बकालपणा,  सांस्कृतिक वेगळेपण, मुलांचे करिअर बद्दलचे विचार, वास्तव, उत्तर प्रदेशातील परिस्थिती, जागृती यात्रेचं प्रयोजन, हा प्रयोग कसा वाटतो वगैरे अशा खूप खूप  विषयांवर गप्पा, चर्चा झाल्या. 

माझ्यामते ज्या थोड्या यात्रींशी ते चांगले कनेक्ट झाले, गप्पा मारू शकत होते त्यातली मी एक सुदैवी होते.. एका विलक्षण, हुशार पण अत्यंत साध्या माणसाला भेटल्याचा आज नक्कीच आनंद आहे. 

Facci श्रुती  ही दिल्लीत राहणारी.. एकदम बिनधास्त. फारच निवांत.. सुरुवातीला विचार न पचणारी अशीच होती.. काही विचार तर खटकावेत अशीच होती ती.. मिडिया फिल्डमध्ये १०वर्षाहून अधिक काळ  काम केल्याने आणि दिल्लीत एकटी राहिल्याचा, शिक्षणाचा, मूळची UP ची असल्याने आलेला मोकळाढाकळा, वरवर बेपर्वाईचा स्वभाव सुरुवातीला मला जड गेला.. आपल्याला अशी सवय नसते, म्हणजे मला नाही.  पण ती छान होती, फार सुंदर हिंदी कविता ती लिहिते.. एकदम खास हिंदी.. मुक्त छंदातल्या कविता.. मिडिया इंडस्ट्रीतील टक्के टोणपे तिला चांगलेच समजलेत.. वैयक्तिक पातळीवर देखील ती पुरेशी स्वतःच्या मतांबाबत मोकळी आणि स्वच्छ होती..आत बाहेर काही नाही.. रोज एकदा तरी हिच्याशी बोलल्याशिवाय माझा दिवस संपत नसे. बेहेरामपूरला तर आम्ही जाता, येता एकत्र होतो, कविता ऐकल्या, ऐकवल्या lifetime line share केली.. हा एक exercise मला आवडलाय.. पण तो आत्ता नीट कळतोय, प्रत्यक्षात यात्रेत स्वतःबद्दल सांगायला मी फारशी उत्सुक नसायचे, आणि दुसऱ्याला फार खोदून खोलात जाऊन विचारायचा माझा स्वभाव नाही.

सगळ्यांच्या तब्येती ठीक आहेत ना? याची चाचपणी मात्र होता होईतो मी शेवटपर्यंत करत राहिले, शक्य त्यांना हवी ती मदतही केली.. किमान विचारपूस, गरज तिथे मदत.. मी काही गोष्टी ठरवून करत राहिले.. रोजच हॉस्टेलवर किंवा मूळ घरापासून दूर राहणाऱ्या या बऱ्याच तरुण यात्री/यात्रीणींना आजारी पडल्यावर एकटं वाटू शकतं, दुसऱ्याला मदत मागायला अवघडलेपण येऊ शकतं.. हे मला माहीत होतं...

आता मी दर भागात काही माणसांबद्दल मधे मधे का सांगतीय ..तर आणखी खूप जणं होतीच बरोबर पण सगळ्यांशी आपलं नाही जमत, तेवढा वेळ पण मिळायचा नाही यात्रेत की प्रत्येक यात्री लक्षात राहील किंवा बोलायला वेळ मिळेल. ग्रुपमधले माहिती होतात कारण एकत्र वेळ घालवतो, कामच असतं..

पण रेल्वेभर पसरलेल्या यात्रींमधून आपल्या तारा जुळू शकतील अशी माणसं मिळणं पण अवघडच असतं.

बेहरामपूरनंतर मी फार सतत नवीन लोकांना explore करणं थांबवलं .. म्हणजे कुणा नवीन यात्रीशी मी बोलायचेच नाही का तर असं अजिबात नाही उलट, कोणत्याही बसमध्ये मी चढत असे..( नालंदा, देवरियाला जातानाचा अपवाद वगळला) तर मी कुठल्याही बसमधे, कुठल्याही ग्रुप सोबत गप्पा मारत असे, एकटीने पण बसून बाहेर बघत असे किंवा कुणा यात्री बरोबर चालत, बोलत असे... पण ते वरवरचं व्हायचं.. म्हणून मग  ठरवून गप्पा मारायला हव्यात हे लक्षात येत होतं. मग चक्क ठरवून एकत्र बसमध्ये बसून चर्चा मी केल्या. तरी सुद्धा असे अनेक चेहरे डोळ्यासमोर आहेत की..अररर, हिच्याशी किंवा याच्याशी अधिक बोलायला हवं होतं, राहून गेलं.. तशी हुरहूर लागली त्यांना आता WhatsApp माध्यमातून कनेक्ट होता येतंय याचा आनंद आहे..

असो,

बेहरामपूरहून आम्ही निघालो होतो ग्रामविकास ही संस्था बघायला.गंजाम इथं पोचलो.कंपाऊंड फाटकातून आत गेले आणि  प्रथमदर्शनी राणी बंगांच्या 'शोधग्राम' मधेच मी आलीय असं वाटलं.. तशीच झाडं झाडोरा , त्यातून वाट...

परिसराची माहिती घेत, महिलांनी बनवलेल्या आणि तिथल्या उत्पादनांचे स्टॉल बघत मुख्य पेंडॉलमधे आम्ही एकत्रित झालो, आणि मग गटागटांनी इथल्या कामाची माहिती घेतली.

Joe Madiath, संस्थापक आणि Liby Johnson सध्याचे CEO यांच्याबरोबर प्रश्नोत्तराचे पॅनल डिस्कशन झाले. चांगले झाले.


मुळात केरळचे जो मेडियाथ लहानपणापासून कामगार हक्कासाठी जागरूक होते, अगदी घरच्या कामगारांसाठी देखील ते अस्वस्थ होत. चेन्नईमध्ये शिक्षण घेतल्यानंतर १९७१ बांगलादेश युद्धातील शरणार्थी शिबिरात देखील त्यांनी नेतृत्व केले.१९७१ मधेच ओडिसा मधे मोठं चक्रीवादळ झालं, तिथे मदतकार्यात जो मेडियाथ पहील्यांदा ओडीसात आले.. मदतकार्य करताना त्यांना लक्षात आले की लोक तात्पुरते यातून सावरतील, आपण आणि सहकारी निघून जाऊ, पण इथे मूलभूत पाणी, स्वच्छता याविषयावर काम करण्याची गरज आहे.. पण आपण बाहेरून आलो, येत राहिलो तर लोक स्वीकारतील का? त्यासाठी इथेच पूर्ण वेळ वास्तव्य करायला हवे, तरच लोकांचा विश्वास संपादन करून काम करणे शक्य होईल. They moved to Ganjam district in 1976 to begin work with adivasi communities. Madiath founded Gram Vikas in 1979. हळूहळू Gajapati and Kalahandi ह्या जिल्ह्यांमध्ये हे काम पुढे वाढतंय.

ग्राम विकासचे काम पुढे जाताना स्वच्छता आणि पाणी या विषयांची  बायोगॅस ही सुरुवात होऊ शकते हे त्यांनी हेरले.गंजाम जिल्ह्यातून सुरुवात करून आता जवळपासच्या जिल्ह्यात काम पसरले.उघड्यावर शौच नाही, पाणी, शौचालये यांची सुविधा, ती गरज पटवून देणे,  आणि त्यातून बायोगॅस ..

हळूहळू बंधारे, मग शिक्षण क्षेत्रातील काम सुरू झाले.. सध्या ४ GramVikas Residency School सुरू आहेत.

अनेक संस्थांमध्ये असते तेच सूत्र इथे पण जाणवले.. बंधारा बांधायचा, विहीर खणायची तर गावाची सहमती हवीच..ती पण १००% सहमती..मग त्यासाठी परत परत गावात जाणे, महत्त्व पटवणे वगैरे आलेच.. पण ग्राम विकासची हौस न राहता विहीर आणणे ही गावाची गरज, जबाबदारी झाली पाहिजे, ग्रामविकास लागेल ती मदत करेलच... 

Liby Johnson (CEO) लिबी ज्योहनसन  सध्याचे कार्यकारी संचालक म्हणू आपण, कारण आता रोजचे कामकाज तेच बघतात.. 

लोकांचे प्रश्न ऐकत राहायचे, पण जे योग्य असेल ते रेटत राहायचे..

• Gram vikas - truly being community driven

• The challenge is not to listen but to make sense of what you listen

• Give long time and keep at it over many years to understand the problem at its grassroot level..

 हेच दोघांनी सांगितलेले ग्रामविकासच्या कामाचे सूत्र आहे.. करत रहा, सांगत रहा, बदल पटकन घडतच नाही आणि community मधला बदल पटकन घडला तर तो वरवरचा असतो, मुळातून झालेला नसतो.. जो बदल शाश्वत हवा तो हळूहळूच झिरपतो..

Vision of GramVikas  - an equitable and sustainable society where people live in peace and dignity.

कामातील मंत्र

• All or none 

• 100% inclusion in the area they work

• Financial Stability 

• Creation of corpus fund ensure “in-built financial stability”

• Availability of resources for maintenance of infrastructure

• Share Costs 

• Community contributes significantly to capital cost and bears the running and maintaining facilities

• Take Responsibility 

• People take responsibility from early stage

• Equitable participation 

• Includes everyone in the area irrespective of gender age etc

कोणकोणत्या विषयांवर काम होतं सध्या तर,

Village Institutions,Livelihoods, Agricultural productivity,Skill building, Masoon training,Sanitation and Health, Menstrual health,Behavioral changes,Water ,Pipe water supply system,Habitat and Technology,Solar powered cells,Education and Youth

खरंतर ग्रामीण भागात एखादं काम एका गोष्टीवरून सुरू होते आणि गरज आहे, लोकसहभाग जसजसा मिळत जाईल तसं वाहतं होतं ,हेच इथं जाणवलं, 

Joe Madiath, यांच्यावर world economic forum मधे लेख छापून आलाय, नोबेल पुरस्कार विजेत्या poor economics या पुस्तकात ग्रामविकास आणि Joe Madiath चा उल्लेख आहे...


वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना भेटून मग गावा गावात गेलो आम्ही .. काही जणं शाळेत, काही अटल टिंकरिंग लॅबमध्ये, काही गावात लोकांशी गप्पा मारायला, गाव बघायला, गावातल्या मुलांशी खेळायला, कोंबडीची पिल्लं हातात घ्यायला आणि टोमॅटो विकणाऱ्या गावातल्या माणसाला कुठे विकता, कसे वगैरे चौकशी, अगदी टेकडीवर चढून वर बांधलेली पाण्याची टाकी बघायला पण आम्ही गेलो, छान चढायला पण मिळालं आणि बांधीव टाकी वरून परिसर पण न्याहाळता आला. सगळं छान वाटलं..पण तरीही मला गाव म्हणावे तेवढे स्वच्छ नाही वाटले, किंवा इतकी वर्ष काम चालू आहे त्यामानाने त्या खुणा कमी वाटल्या.. ग्रामविकासचं काम चालतं त्या सगळ्या भागात घरात नळ आहेत, स्वच्छता गृह आहेत..पण ती घरातल्या कुणी वापरायची यावर अजूनही काही गृहितके आहेत, हे महिलांसोबत बोलताना जाणवलं.. .पण आपल्या कडची गावं बघायची सवय झालेली इथं जरा वेगळंच वाटलं एवढं नक्की..

४०वर्षांहून अधिक काळ एका ठिकाणी सहकारी जोडत,  गावं, माणसं सांधतअविरत काम करत राहणं, स्वतःच्या कामाचं role model बनणं , त्या अनुभवातून अनेक जण कामासाठी उभे राहणं...हे सोपं नाहीच.

अनेक MSW सारखे कोर्स करणारे, किंवा ज्यांना अशा कामाचा अनुभव घेऊन बघायचाय असे अनेक तरुण इथे internship साठी येतात, काही इथलेच होतायत तर काही परत जाऊन आपल्या भागात प्रयत्न करतायत..

"Most of my travel was by Train" हे Joe चं वाक्य अनेक यात्रींच्या कानात रुजलं. पुण्यात water, sanitation वर काम करणारी पूजा अधिक कुतूहलाने, समजून घेत चर्चा करत सगळं बघत होतीच पण रायगड भागात काम करणारी प्रतीक्षासारख्या मुलीला हे सारं खूप जवळचं वाटतं होतं.

वेल्हे भागात ज्ञान प्रबोधिनीचं चालणारं ग्राम विकसनचं काम किंवा जव्हारच्या आदिवासी भागात मिलिंद -दिपालीनी उभं केलेलं 'वयम्'चं काम, तिकडे गडचिरोलीत चाललेलं शोधग्रामचं वैद्यकीय सेवेतून पुढे गेलेलं काम, देशभरात चालू असलेलं वनवासी कल्याण आश्रमाचं काम, किंवा अरुणाचलात रोईंगला विजय स्वामी करत असलेलं community building, represntion, cultural restoration चं काम... आणि अशी अनेक कामं, संस्था डोळ्यासमोर उभ्या राहिल्या.

प्रत्येक काम उभं करताना हळूहळू संस्था उभी राहते, कामाला वेगवेगळ्या दिशा मिळत ते वाढत जातं... हे सारे प्रयोग आहेत, अविरतपणे...ही बेटं आहेत, ती अधिक विस्तारणं शक्य नसेल तर अधिक बेटं तयार होणं, ती एकमेकांना सांधणं हे इथून पुढे महत्त्वाचे वाटतेय. काम करायचा core area प्रत्येक NGO चा वेगळा असेल पण त्या एकमेकांच्या प्रतिस्पर्धी नसून सहकारी NGO होण्याची गरज वाटते.


सहकार्य, समभाव हे शब्द ऐका - लिहायला छान वाटतात पण प्रत्यक्षात काम करताना इगो मधे येतातच... त्यामुळे कामं अडतात,थांबतात, दुसरेच वळण घेतात.. technology  येईल, दळणवळण सुधारेल, शिक्षण पोचेलही पण माणूस आणि वृत्ती घडण किंवा बदलाचं फार मोठं काम आहे जे आजही सर्वात challenging वाटलं ग्रामविकास संस्था समजून घेताना.. 

मी मनात, विचारात फार रेंगाळते म्हणून मग पुढच्या कार्यक्रमात मी पटकन swich on-off होतं नाही हे जाणवलं मला त्या दिवशी...

खरंतर ग्राम विकासाच्या कामाबद्दल विचार रेंगाळत होते आणि पाय मात्र kanakia शाळेत चालले होते... दुतर्फा उभ्या असलेल्या शालेय मुलांनी सर्व यात्रींचं स्वागत केलं, आणि  सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार असल्याची नांदीच दिली..


हा दिवस इतक्यात संपणार नाही.. अजून खूप काही शिल्लक आहे..यात्रींचा दिवस सुरू होतो वेळेबरोबर पण कधी संपेल हे सांगता येत नाही...आणि आज तर दिवस खूप मोठा होता, भरगच्च होता, वाहता होता, जागता होता....

प्राची परांजपे

१०/२/२०२३

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग १ - इच्छा जागृतीची

भाग ३१ - यात्रा सफल संपूर्ण

भाग २५ - राजस्थान .. तिलोनीयाकडे