भाग १३ - थोडं मनातलं थोडं जनातलं ..

 आज खरंतर पुढच्या रोल मॉडेल बद्दल लिहिण्याआधी जरा सध्या आमच्या रेल्वेत तुम्हाला फिरवून आणते, जरा बघा तरी कुठे कुठे काय काय चाललंय...

आता चेन्नई सोडल्यानंतर आमच्या रेल्वेचा उत्तरेकडे प्रवास सुरू झाला अर्थात आमचा देखील.. हा प्रवास आता भारताच्या पूर्व बाजूकडून विशाखापट्टणम,बेहरामपूर, राजगीर (नालंदा), देवरिया(उत्तर प्रदेश) असा उत्तरेकडे होणार होता.

थंडी वाढणार या जाणीवेने हळूहळू बॅगातून स्वेटर,मफलर, कानटोपी बाहेर येऊ लागल्या.. यात्रा संपेपर्यंत बॅगेत परत न जाण्याच्या बोलीवर...हो हो.. अजून वाजतीय का थंडी..पण छे माझ्यासारखे यात्री थांबत नसतात.."थंडीला मी का आवडते, मला सारखी बिलगून बसते..." असं म्हणत स्वेटर रोजच्या बाहेर न्यायच्या सॅकमधे गेला सुद्धा...

विशाखापट्टणम हे बंदर आहे, हा विचार पण मग मनाला शिवत नाही. असूदे लागला तर बरोबर म्हणून तयारी सुरू.

तर असो... अशीच आणखी एक तयारी आमच्या group मधे सुरू झाली होती, role model presentation ची...

आमच्या ग्रुपला sri city वर presentation करायचे होते.. वाचन, नोट्स, कुणी काय मांडायचं, सुरुवात कोण करणार, 

त्यात परत काही जणं हिंदीत मांडणार काहींना फक्त इंग्रजीच जमणार.. काही जणांना काही जणं वरचढ वाटणार तर, काही मे़ंबर आपला याच्याशी काय संबंध अशा थाटात  ..

पण एकुणात काय तर सगळा ग्रुप त्यानिमित्ताने ग्रुप एकत्र आला.. या Sri City वरचं बरंच वाचन झालं.

नेमकं वेगळेपण काय आहे, जर अशी फक्त manufacturing units एकत्र आहेत तशी शैक्षणिक युनिट/प्रयोग एकत्र आले तर?  किंवा फक्त खेळणी बनवणारे सेझ कुठे आहे का किंवा फक्त वस्त्रोद्योग ? मग यांचे फायदे तोटे काय आहेत ~ इथल्या कंपन्या पेप्सी पासून क्रेन बनवणं इथपर्यंत उत्पादन कंपनी आहेत. फक्त agro processing किंवा फक्त food manufacturing कंपन्या एकत्र एकाठिकाणी असतील तर फायदा होईल की स्पर्धा वाढेल की उत्पादन गुणवत्ता वाढेल अशा चर्चा रंगू लागल्या.

चक्क चेन्नईत नंतरच्या रात्री माझ्या cohort आणि ग्रुप मधील काही जणं आपापल्या मोबाईल चा उपयोग insta बघण्याऐवजी sricity वगैरे ची अधिक माहिती मिळवण्यासाठी करू लागले.

मला या सगळ्या प्रक्रियेतून एक लक्षात यायला लागलं की group मधे dynamics आहे. वेगवेगळ्या क्षमतेची, पार्श्वभूमीची मुलं आहेत. 

सहाजिकच कुरघोडी किंवा सामंजस्य दोन्ही गोष्टी लक्षात आल्या.. कुणी हिरमुसलं तर कुणी अगदी पाठ करून का होईना पण presentation ला उभी राहिली. याचा उपयोग मला स्वतःला Facci म्हणून BGT competition ला झाला. एकुण आमच्या ग्रुपचं AC chair car मधे परीक्षकांसमोर presentation छान झालं..यात नंबर वगैरे काही नव्हते पण प्रत्येक गटाच्या vertical subject नुसार ते ते रोल मॉडेल पूर्ण अभ्यासायचं, समजून घेण्याचा प्रयत्न करणं, BGT साठी गटात काम करण्याची पूर्व तयारी म्हणून होतं. प्रत्येकाने जागृती यात्रेचा मूळ application form भरताना दिलेल्या विषयांतून आपल्या कामाशी संबंधित आणि आवड असे विषय अग्रक्रम देऊन भरायचे होते..

त्यानुसार आमचे ग्रुप पाडले गेले होते, आणि त्यानुसार presentation and BGT subject होते... आता अनेकांना आपण नेमका काय अग्रक्रम भरलाय हे आठवत नव्हते आणि आठवत होते त्यांना देखील आपण या ग्रुपमध्ये कसे काय आहोत बरे असा प्रश्न पडत होताच..

ज्यांनी सरळ technology असं म्हंटलं होतं त्यांना त्यांचा vertical बरोबर मिळाला होता..पण agro processing, manufacturing, production design किंवा culture,art, education वगैरे लोकांना जरा ग्रुप पाडण्यात गडबड झाली आहे का?.. असं शेवटपर्यंत वाटत राहिलं...ते काही अंशी खरं देखील होतं.

पण ५१० लोकांना अगदी हवा तोच विषय आणि ग्रुप नेमून देणं, विभागणी करणं हे तसं किचकट काम होतंच Jagriti ERC साठी..

अर्थात संपूर्ण विचार केला तर फार फरक पडला असं नाही.. ठीकच आहे.

रेल्वेमध्ये ज्या व्यवस्था होत्या त्या ठीकच होत्या पण काही बोगीवाल्यांचं नशीबच खराब.. जसं की "बोगी नंबर 9"..  पु.लं. नी ते कसले कसले योग लिहिले आहेत ना तसा या बोगीत "सदैव ठणठणाटोप्रश्न योग" होता. यांच्या स्वच्छता गृहात सतत पाणी नसायचे, इथे पाणी असेल तर वीज नाही, वीज असेल तर चार्जिंग पॉईंट चालत नाहीत..ते चालतील तर पुरेसे चार्जर नाहीत (नको त्या उदारपणे यांचे चार्जर दुसऱ्या बोगीत गेलेले), पंखा चालत नाही, पंखा असेल तर थंडी असेल, थंडी असेल तर खिडकी बंद होत नाही, काहीच नाही तर जेवणच वेळेवर पोचत नाही आणि सगळं ठीक आहे म्हणावं तर या बोगीतल्या गैरसोयीला कंटाळून इथले यात्री अन्य बोगींमध्ये जाऊन बसलेले... सतत Facci meeting मधे आशुतोष किंवा शशांक सरांना, वेगवेगळ्या वेळी  ERC मधील कधी केशवला, कधी ब्रिजेशला , कधी विपुल तर कधी आकाश, तर कधी डॉक्टर ना सुद्धा यातले यात्री प्रश्न सांगत... गंमतीचा भाग सोडला तर खरंच या बोगीत सतत रोजचे नवनवीन प्रश्न असायचे.. (यांची भरपाई म्हणून यांना विशाखापट्टणममधे नेव्ही म्युझियम दाखवण्यात आलं असं समजलं..चांगलं आहे खूप वगैरे पण ऐकलं नंतर..)असो, तर अशी ही युवक यात्रींची त्रस्त, आणि समस्या सोडवण्यात व्यग्र असणाऱ्यांची बोगी...

पण म्हणून हार मानतील तर हे कुठले..

त्यातही गाणी,नाच,नोकझोक, मजा, " how to manage the things in basic minimum"वगैरे व्याख्यान द्यायला हे तयार..

त्रास तर होताच पण कुणी मुद्दाम त्यांच्यावर सूड उगवायचा म्हणून हे करत नव्हते..योग असतो एकेका डब्याचा(बोगीचा)... कोणत्या मुहूर्तावर कुठून निघाला असेल हा डबा कोण जाणे..

मजा मजा..पण त्यावेळी ती सजा सजा 

वाटली असणार हे माहीत आहे. हा डबा सगळ्या रेल्वेत प्रसिद्ध होता..

तरीही सगळे एकमेकांना समजून घेत मदत करत होते.. हीच तर जागृती यात्रा असते.

जसं ही बोगी तशीच बोगी नंबर 17... या बोगीचा काय problem होता कोण जाणे पण हेडकाऊंट काही लवकर व्हायचा नाही.

आम्ही रात्री जेव्हा रेल्वेत परतत असू तेव्हा एकुण रेल्वेतील माणसांची संख्या मूळ संख्येएवढी आहे ना याची खात्री करून घेण्यासाठी ही पद्धत... कारण कोण कुठे उधळेल, खाली राहिल किंवा स्टेशनवर राहिल याचा नेम नाही..

त्यामुळे असा नियम होता की रेल्वेत चढल्यावर प्रत्येकाने आपापल्या cohort  मधेच तेही आपापल्या कंपार्टमेंट मधेच बसायचे आहे.. म्हणजे संपूर्ण रेल्वेचा हेडकाऊंट पूर्ण होत नाही तोवर कंपार्टमेंट सोडायचे नाही..

मग अगदी स्वच्छता गृहात किंवा बाथरूममध्ये किंवा शेजारी डब्यात गप्पा मारायला किंवा chair car मधे कुठेही जायचे नाही..

प्रत्येक बोगीचा boggi cordinator ठरलेला असायचा, त्याच्याकडे वॉकीटॉकी असायचा. Cordinatorने बोगीच्या एक अन् एक कंपार्टमेंट मधे  जाऊन हेडकाऊंट घ्यायचा , त्यावेळी जर आपले सगळे cohort members असतील तर प्रत्येक cohort ने "we are full" असं सांगायचं.  हेडकाऊंट ok असेल तर तसे वॉकीटॉकीवरून कंट्रोल ला कळवायचे. नसेल तर जो यात्री जागेवर नाही त्याचा शोध घ्यायचा, इतरांना शोध घ्यायला लावायचा.

यामध्ये आमच्या बोगी नंबर 15 चा हेडकाऊंट सगळ्यात लवकर व्हायचा..  मुलांच्या पण बोगीज् चा हेडकाऊंट पटकन व्हायचा (or they use to manage the things i don't know ) सगळीकडून ओके आलं की मगच रेल्वे सुटायची.. पण बरेचदा बोगी 17 मधे हा हेडकाऊंट उरकायचाच नाही आणि घोळ चालू असायचा... मग ERC लीना किंवा काही वेळा तर प्रगती येऊन बघून जायची...

असो पण यातून एक छान ब्रेन स्टॉर्म झालं आमच्या इथे... म्हणजे  idea of new start up ..

काय तर म्हणे एक App devolop करायचं प्रत्येक यात्रीला ते locate करेल आणि किमान एवढं सांगेल तो  रेल्वेत आहे की नाही .. किंवा सरळ swipe card system ठेवायची, आलं की swipe.. आणखी पण पुष्कळ काय काय... आमच्या आणि Software developer च्या कल्पना ऊतू जायला लागलेल्या. पण ही App पण crack करायचे यूट्यूब व्हिडिओ निघतील वगैरे पण चर्चा झाल्या..एकुणच हेडकाऊंट मजेचा तर काही वेळा जरा वैतागवाणा प्रकार व्हायचा..

खरंतर 10 मि. ची ही गोष्ट पण कधी कधी अर्धा अर्धा तास चालायची.. मग  अनेक जण.. "कुणी विचारलं तर इथेच आहे सांग गं" असं म्हणून कंपार्टमेंट सोडायचे...

 मला आठवतंय.. दिल्लीत रात्री जेव्हा आम्ही रेल्वेत चढलो तेव्हा हेडकाउंट लवकर संपेच ना.. अनेकजणांना आवरायचं होतं, गूंज जरी inspiring असलं तरी खूप प्रवास झालेला बसमधून... त्यामुळे अनेकांना बाथरूमचा डबा उघडून हवं होता.. मी पण बराच वेळ कंपार्टमेंट मधे थांबले आणि मग सांगून बोगीत 17 मधे गेले... बाथरूमचा डबा बंदच होता.. मग उघडायचा आम्ही काही जणींनी प्रयत्न केला पण व्यर्थ, इतकं घट्ट शटर लावलेलं की मला ते नेहमी जमत असूनही उघडता आलं नाही.. मग तिथेच त्यांच्या हेडकाऊंटचा घोळ बघत उभी राहिले.... गोंधळ चालू होता..

एवढंच कळलं की एक मुलगी आलेली नाही.. येईल येईल वगैरे करता करता अचानक खरंच रेल्वे सुटली... बरीच पुढे गेल्यावर लक्षात आलं ती मुलगी खरंच रेल्वेत नाही.. मग Core Team member प्रगती आली. सगळा प्रकार तिच्या लक्षात आला.. मग फोनाफोनी वगैरे... 

अधिक तपशीलवार सांगत नाही पण थोडक्यात इतकी काळजी घेऊन देखील असे प्रकार घडू शकतात..त्याचा मनस्ताप..संबंधित कंपार्टमेंट,बोगी पर्यायाने संपूर्ण रेल्वेचं प्रवासाचं वेळापत्रक कोलमडण्यात होऊ शकतं...

शिवाय सगळे चर्चा करू नयेत म्हणून याबद्दल अधिक कुठे चर्चा केली जात नाही तरी कळतंच वगैरे..

एवढं सगळं होऊनही त्याचा seriousness न कळणाऱ्या यात्री असतात ही पण एक वस्तुस्थिती होतीच.

मी पण नेमकी तेव्हाच तिथे का कडमडले होते ..

पण हा किस्सा बघायला मी हजर होते एवढं खरं.

असो... तर जसं रोज "यारो चलो"  हे यात्री गीत म्हंटलंच जायचं तसं ,"headcount नहीं तो ट्रेन छुटेगी नहीं"

एवढ्या समुदायाला पुढं न्यायचं तर या बसवलेल्या पद्धती गरजेच्याच होत्या... आता यात सुधारणा करता येईल का, कशी वगैरे चर्चेची ही जागा नाही.

आता थोडं माझ्या "कोझी कोहोर्ट बद्दल"

आम्ही आमच्या एका कंपार्टमेंट मधे ६ जणी होतो.(१facci+५ ) सगळ्या एकसे बढकर एक होत्या.

आमच्या cohort ची मॉनिटर होती "अहं ब्रम्हास्मि" (अशी अक्षरं असलेलं तिचं कानातलं होतं) नावाने रेल्वेत प्रसिद्ध असलेली व्यवसायाने आर्किटेक्ट असलेली स्वतःची डिझायनिंग फर्म चालवणारी मूळची गुजरातची पण पक्की महाराष्ट्रीयन राजवी.. 

वरवर शांत पण आतून एकदम बबली, खूप अभ्यासू, हुशार young aspiring CA, रोज नियमित डायरी लिहिणारी तामिळनाडूची  प्रकल्या..

जागृती यात्रेमध्ये खूप मोठ्या संख्येने ज्या विद्या शाखेतले लोक होते ते म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअर आणि आमची शांत स्वभावाची, सुंदर चित्रं काढणारी, मेकॅनिकल इंजिनिअर, अत्यंत सोशिक, खूप कमी खाणारी कर्नाटक मधील वैष्णवी...

रेखीव ,सुंदर डोळ्यांची, enterprenal management मधे masters करत असलेली, स्वतःचा न्यूट्रीला बार चा start up सुरू करणारी, ओरिसातील  ह्रषिका..

मूळची जळगावची TISS मधून शिकलेली, वाड्या-वस्त्यांवर काम करणारी, रोखठोक मराठी असलेली, माझ्या बरोबर छान नोकझोक करणारी  बिनधास्त प्रतीक्षा...

आणि मी प्राची... प्रतीक्षाच्या शब्दात सांगायचं तर "मैं तो मैं हू.. "

रात्री परत रेल्वेत चढलो की बरेचदा फक्त आमच्या कंपार्टमेंट मधे लाईट नसायचे ही काय गंमत होती माहिती नाही,पण नसायचे मग मेंटेनन्स मधला एक मित्र येऊन मुख्य electric unit box मधे काही तरी करून जायचा आणि लाईट सुरू व्हायचे.. एकवेळ दिवे नसतील तरी ठीक पण चार्जिंग पॉईंट लवकर सुरू झाले पाहिजेत ना...

बर्थखाली बसतील त्या मोठ्या बॅग ठेवलेल्या आणि उरलेलं सगळं सामान एका बर्थवर पसरलेलं, ठेवलेलं, कधी कोंबलेलं,कधी आवरून सावरून ठेवलेलं.

मला फार मजा आली या मुलींबरोबर..

सगळ्या माझ्या निम्म्या वयाच्या, खूप स्वप्नं डोळ्यात असणाऱ्या, खूप काही वेगळं करायची इच्छा असणाऱ्या या माझ्या धडपड्या  रुममेटस्....I Mean compartment mets...आम्ही दिवसभर कुठेही भटकलो, वेगवेगळ्या लोकांशी बोललो तरी रात्री मला या सगळ्या आल्यात ना, कुणाला काही होतंय का, काही बिनसलंय का, all is well na विचारलं की बरं वाटायचं.. दिवसभर खूप दमणूक व्हायची (शारीरिक दमणूक नाही पण मानसिक, हवा बदलाची, प्रवासाची) मग आम्ही आज कुणाला थंडी वाजतीय जास्त किंवा औषध हवंय, किंवा काय बघितलं, वेगळं वाटलं, मजा आली, कसंतरीच झालं असं बोलायचो, काही वेळा भाषा शिकायचा प्रयत्न करायचो, काही वेळा अती फालतूपणा पण करायचो, व्हिडिओ काढायचो, शेजारीपाजारी भटकायचो.. यांना आणखी उत्साह असायचा आणि मला खूप झोप यायला लागायची...

शेजारच्या कंपार्टमेंट,डब्यांमधील मधील मेघा, अदिती, Facci श्रुती, विद्या, सायली,  आमची पमकीन् (voice artist, sound engineer,) शामल, गोड अशी अनुष्का, धृष्टी, दिव्या, दीक्षा, अनिषा, कल्याणी, आराधना, अम्रिता, डॉ प्रियांका, इंजिनिअर प्रियांका, Facci वर्षा, facci नीना मॅडम, स्निग्धा, कायरा..... Frankly unending list..

All lady ERC's यांच्या बरोबर रोज वेगवेगळ्या टप्प्यांवर मी कनेक्ट झाले होते..

याशिवाय केवळ hi, hello  अशा तर खूप...

यात प्रत्येकीची वेगळी कथा, व्यथा, मजा, किस्से, धमाल, चर्चा, उद्योग, शैक्षणिक पार्श्वभूमी....

मुलींच्या शाळेत मी शिकले त्यामुळे I can very much relate boggi number 15,16,17.

जसं शाळेतल्या किंवा आपल्याच इयत्तेतल्या काही मुली नुसत्या बघून माहीत असतात, काहींशी कधी नाहीच वाटतं बोलावं आणि वेळही येत नाही , काही आपल्याला रोज दिसतात पण आवडत असतात आपण लांबूनच बघतो त्यांना, काही वर्गातच असतात,रोजच संबंध येतो तर काही आपल्या खास मैत्रीणी होतात, ग्रुप बनतो आपला किंवा काहींशी ठरावीक विषयावर आपण जाऊन बोलतो... तसं सगळं इथं पण होतं. 

फक्त इथं कोणतीच गोष्ट gender biased नव्हती. फक्त निवास सोय म्हणून व्यवस्था वेगवेगळ्या होत्या, आणि प्रत्येकाने आपापल्या बोगीत रात्री ११नंतर परत जाणे अपेक्षित होते.

फरक इतकाच की male, Female co-yatris can go to each other's boggi, can sit there, can have a food , can have open discussion on any topic.

आता हळूहळू group मधेच दोन गट declare झाले. प्रत्येक ग्रुपमधे दोन male cohort and one women cohort अशी रचना होती.

आता त्यातील मुलींचा cohort उरलेल्या दोन male cohort मधे विभागून ग्रुपमधेच दोन गट पाडून ERC कडून मेसेज पाठवले गेले... कशासाठी तर या गटांमध्ये आपापल्या vertical subject नुसार BGT competition ची तयारी सुरू करण्यासाठी..

आमच्या in all group चा विषय Manufacturing होता. म्हणजे आमच्या ग्रुपमधील नव्याने तयार झालेले दोन गट आता manufacturing idea वर काम सुरू करणार होते... त्यासंबंधी सगळ्या फॅसिलिटेटर ची मिटींग घेण्यात आली....Bizz Gyan Tree competition अर्थात BGT.

चला.. बाकी BGT बद्दल उद्या लिहिते.. आज खरंतर विशाखापट्टणमधील रोल मॉडेल तुम्हाला सांगायचे होते, पण म्हंटलं जरा त्या आधी रेल्वेच्या, आमच्या घराची, तिथल्या लोकांची तुम्हाला सफर घडवून आणूया. खरंतर यामधे कंपार्टमेंट मधे रात्रभर नाचणारे, गाणारे ही यात्री होते पण मी स्वतः फार इतक्या रात्री जागून त्यात सहभागी झाले नाही त्यामुळे ते वर्णन "आँखो देखा" नाही, म्हणून नाही लिहिले...

किती जणं, कित्ती प्रकारचे लोक एकत्र होतो आम्ही, मजा यायची,  पण तरीही मला काहीवेळा  "भीडमे अकेली" हे feeling यायचं.. मग मी पहाटे लवकर उठून chair car मधे बसून बाहेरचा भौगोलिक भारत बघत बसायचे... 

मला कंटाळा यायचा का या बडबड, गडबड,गर्दीचा तर तसं पण नव्हतं..

पण मला खिडकीतून रोजचा नवीन जागचा , नवीन वाटणारा सूर्योदय एकटीने बघायला फार फार आवडायचं...


प्राची परांजपे

१ /२/२०२३

टिप्पण्या

  1. प्रदीर्घ लेख. मज्जा येते वाचताना.काहीतरी सकस वाचल्यासरख वाटतं.
    असेच इकडचे तिकडचे मुक्तपणे लिही. यात्रा झाली त्याच क्रमाने लिहायला हवे असे नाही.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग १ - इच्छा जागृतीची

भाग ३१ - यात्रा सफल संपूर्ण

भाग २५ - राजस्थान .. तिलोनीयाकडे