भाग ६ - यात्री समजून घेण्याची प्रक्रिया...

कालच्या भागात रेल्वे, PA system बद्दल मी बोलले. त्याच दिवशी म्हणजे 25 तारखेला जागृती यात्रेचे प्रमुख शशांक मणी त्रिपाठींनी रेल्वेमधेच (chair Car मधे) परत एकदा ही यात्रा का आहे, आपण कोणकोणत्या ठिकाणी जाणार आहेत,कसे वगैरे सांगितले.

मुंबई -कन्याकुमारी-मदुराई-बेंगलोर-चेन्नाई-विशाखापट्टणम्, बेहरामपूर-राजगिर-देवरिया-दिल्ली-तिलोनिया-अहमदाबाद आणि परत मुंबई.. असा आमचा रेल्वेने प्रवास होणार होता. 


वरती लिहिली आहेत त्या ठिकाणी रेल्वेने पोचून  मग तास अर्धातास बसने प्रवास करून आम्ही जी संस्था/उद्योग/रोल मॉडेल बघायचे ठरवले आहे ते बघत असू.. आणि संध्याकाळी त्याच ठिकाणी किंवा त्याच गावात दुसरीकडे किंवा मग रेल्वेत येऊन अशी पुढची चर्चा सत्रे (experts session/panel discussion/business stories) ऐकत असू.

आपल्या शाळेतील विद्यार्थी गेल्या ठिकाणी नीट वागावेत, ओळीने परत यावेत ही जशी अपेक्षा असते तशीच अपेक्षा इथे शशांकजींनी व्यक्त केली..त्याची गरज होतीच.. आम्ही संपूर्ण देशभरातून ५०० जणं होतो. जरी बहुसंख्येने भारतीय असलो तरीही... वेगवेगळ्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, भौगोलिक , सांस्कृतिक भिन्नतेतून आलो होतो. काही परदेशी यात्री पण होते.

मद्यपान आणि धूम्रपान करताना कुणी आढळले तर कोणताही विचार न करता त्या यात्रीला डीबोर्ड अर्थात रेल्वेतून उतरवले जाईल अशी सक्त ताकीद किंवा कल्पना त्रिपाठींनी उद्घाटनप्रसंगी दिली होती त्याची परत उजळणी त्यांनी केली.

वरवर बघता खूपच फ्री वाटलं तरी काही मूलभूत गोष्टींबाबत जागृती यात्रा फार कडक कारवाई करते ते माहीत होतेच. त्या दिवशी प्रत्यक्ष ऐकले. (पण...काही गोष्टी घडतात, घडलेल्या समजतात, आपण कितीही वाटलं तरी काही करू शकलो नाही याची खंतही वाटत राहते.. पण माझा इलाज नव्हता किंवा मी मुद्दा संबंधितांपर्यत पोचवून गप्प राहायचे ठरवले.) पण निदान डब्यात कुणी मद्यपान केलंय हे अहमदाबाद पर्यंत तरी निदर्शनास आले नाही, प्लॅटफॉर्मवर काही घडले तर ERC तरी किती आणि काय बघणार.. सोबतचे यात्री काही लहान नव्हते.. खरंतर मोठे होते हाच प्रश्न होता.. पण असो... जागृती यात्रेच्या अखंड परंपरेला बट्टा लागेल असं कुठं काही घडलं नाही, कुठल्याही संस्थेत,आवारात हे कधीच घडलं नाही हे कमी नाही.. खरंतर गैरवर्तन म्हणावे असे काही घडले नाही. २००८ पासून येणाऱ्या यात्रीं मधे, अर्थात युवक युवतींमधे त्यांच्या मनोवृत्ती मधे , राहणीमानात, खानपान कल्पनांबद्दल, व्यवसायिक दृष्टीकोनांबद्दल, इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या वापराबद्दल, उद्योजक म्हणजे काय या संकल्पनेबद्दल कसे बदल होत गेले यावर खरंतर एक छान statistacal analysis करता येईल असं मला वाटून गेलं. 

यात "आमच्या वेळी असं नव्हतं " हा माझा विचार नाही , तर  सगळा बदल कसा घडतोय हे तटस्थपणे पण सांखिकीदृष्टीकोनातून टिपण्याची गरज वाटली. बघूया हा धागा कदाचित मला यात अधिक खोलात कृती करायला लावतोय का..

असो..माझं असं प्रगट स्वगत चालूच राहणार इथे. 

प्रत्येक Groupमधे life time-line story Activity आता दिवसभर करायची होती. थोडक्यात प्रत्येकाने स्वतःच्या आयुष्याचा आलेख चार्ट पेपरवर स्केचपेनचा वापर करत  Group समोर मांडायचा होता.. आयुष्यात कधी high point आले  कधी low point आले.. तेव्हा काय वाटलं, भावना, आज काय वाटतंय मागे वळून बघताना, सध्या काय करतोय, म्हणजे मग त्यात आत्ता करत असलेल्या गोष्टी सांगणे..शिक्षण घेत असू तर तसं नोकरी किंवा start up सुरू केला असेल तर किंवा काही करत नसू तर तसंही...  याशिवाय पुढे काय करायचंय वगैरे..

थोडक्यात आपापल्या Group मधे(ठरवून इंग्रजीGruop शब्द वापरतीय जो तिथे वापरला जायचा. ) बसून आम्हाला एकमेकांना समजून घ्यायचं होतं. खूप मोकळेपणाने बोलणं इथं अपेक्षित होतं, खरं बोलणं अपेक्षित होतं.

प्रत्येक cohort मधे (यात फक्त युवती यात्री किंवा फक्त युवक यात्रीअसतात.. cohort म्हणजे very close group) साधारण ६/७ युवतींचा एक cohort. तशीच रचना युवक यात्रीं कडे पण होती. थोडक्यात एका ठरवून दिलेल्या कंपार्टमेंट मधे राहाणारा छोटा गट.. 

असा युवतींचा एक cohort  आणि युवकांचे दोन cohort मिळून Group ( ग्रुप) अशी रचना होती. त्यामुळे प्रत्येक ग्रुपमधे साधारण ६/७ युवती आणि त्यांची फॅसिलिटेटर आणि १२/१३ युवक आणि त्यांचे दोन फॅसिलिटेटर असत. आमच्या गटात मी, भोपाळचे  आशिष कोलारकर आणि नेदरलँड्सचा Van. आता या Groupमधे आम्हाला इथून पुढच्या बऱ्याच activity कराव्या लागणार होत्या. मग ते रोल मॉडेल सादरीकरण असेल किंवा देवरियाला होणारी BGT competition.

तर...  हळूहळू ज्या ज्या Group ला सोयीचं वाटेल तिथे किंवा जागा मिळेल तिथे मंडळी बसली.. स्वतः बद्दल भरभरून बोलू लागली.. दिवसभर बोलत राहिली, एकमेकांना ऐकत राहिली.. काहींनी आयुष्यात आलेले  हळवे क्षण आठवले, दुःखाचे क्षण आठवून डोळ्यांच्या कडा ओलावल्या, काहींनी पाणावलेले डोळे दुसऱ्याला दिसणार नाही असे स्वतःला सावरले, आनंदी जगणेही सांगितले, उत्तम महाविद्यालयात मिळालेला प्रवेश, पहिल्या फटक्यात कसा CA झालो तो क्षण, TISS मधील अनुभव, बिझनेसमधे घरच्यांना बसलेली होरपळ मग बदललेले आयुष्य, वय वर्ष २५ आहे पण आतापर्यंत सगळंच सुरळीतपणे झालं, low असं काहीच नाही इतरांच्या तुलनेत म्हणून सहसंवेदनेतून आलेली हळहळ, सलग काही वर्षे केलेली नोकरी,  स्वतः अनाथाश्रमात वाढून आज राष्ट्रीय स्तरावर काम, हिऱ्यांच्या खाणी सापडल्या तिथे जंगलतोडी विरोधात केलेलं जनआंदोलन.. , २२वर्षी मिळवलेले पेटंट, राजकीय पार्श्वभूमी असल्याने घेतलेले प्रचार सभांचे अनुभव, डॉक्टर तर झाले/झालो पण वेगळं काहीतरी करायचंय...स्वत:ची संस्था आहे ज्यात पाड्यावरच्या मुलांना शिकवतो, आसाममध्ये चहाचे मळे आहेत, ओरिसात शेती करते, पुढच्या दोन दिवसांत कापणी आहे आणि मी इथे ..परत जाऊ का?

इंजिनिअर आहे पण ते करायचे नव्हते म्हणून मग भरतनाट्यम शिकले, मग परदेशात काम आता परत येऊन वेगळ्याच विषयात Phdकरतीय, IITमधून Mtechआहे पण सध्या नोकरी सोडलीय Start up अमूक एकांकडे Incubator phase मधे आहे, स्वतः ची आर्किटेक्चर फर्म चालवते फक्त महिलाच कर्मचारी आहेत, पर्स शिवणे शिकवणे हा उद्योग आहे, पण इतक्या लांब घरातून पहिल्यांदा बाहेर पडले, Special Need Children बरोबर काम करतो.., Digital marketing, Data analyst आहे पण स्वतः चा travelog चालवतो, आणि गाणं समजतं, मोठ्या परदेशी कंपनीत आहे पण घटस्फोट झालाय, मुलीची आठवण येते.. , माणसं वाचायला आवडतं त्यातून फिलॉसॉफी तयार केलीय मी स्वतःसाठी, मला गावातच जाऊन तिथल्या मुलांना व्यवसाय सुरू करायला उद्युक्त करायचंय,  कशाला लग्न वगैरे करत बसतात आजकाल काही गरज नाही...मी कुठे केलंय , आर्थिक साक्षरता नाही ही देशाची मोठीं समस्या आहे, दोन start up and one NGO started but  need team , सब है like minded people ढूंढ रहा हू , लग्नाच्या आधीच जर बिझनेस सेट झाला तर मग माझ्या मतांची कदर केली जाईल घरी, बस किती काय काय बापरे.... विविध वेळी, विविध ठिकाणी आपापल्या Group मधे नंतर स्वतंत्रपणे, कधी बाथरूममध्ये तर कधी स्वच्छतागृहाजवळ दात घासताना, कधी रात्री १वाजता AC chair car मधे तर कधी बसमध्ये, कधी जेवताना... कधी कुठे तर कुठे..

याला वय २० आहे की ५५ , तुमचं पद, यात्री की Facci की ERC आहात कशाचंच बंधन राहिलं नाही... मोकळं होतं राहिले यात्री लोक.. आणि ऐकत राहिले यात्री लोक. अगदी शेवटच्या दिवशी पण हे अनौपचारिकपणे सुरूच राहिले... त्या दिवशी ही Group मधे सुरू झालेली Activity .. ongoing process झाली.. निदान चेन्नई पर्यंत तरी नक्कीच सुरू राहिली गटागटाने,दोघा दोघांत, Group मधे, cohort मधे.

आमच्या Group मधे ही activity formally करताना नीट झाली नाही असं माझं मत होतं.. पटकन कुणी स्वतः बद्दल बोलायला तयार नव्हतं, अगदी मी सुद्धा.. चार्टवर दाखवून तर कुणीच तयार होईना..एक दोघांनी केला चार्ट चा प्रयोग..

मग जे वाटेल त्या क्रमाने मुक्त बोलू असेच ठरवले.. काही खूप थोडक्यात बोलले तर काही उधळलेच.. पण Group चा अंदाज यायला मदत नक्कीच झाली.. मग नंतर Group छान Gel झाला..ही प्रक्रिया घडवणे मला ज्ञान प्रबोधिनीच्या अनेक शिबिरे घेण्याचा अनुभव असल्याने नवीन नव्हतीच पण... इथे Facci म्हणून जो अधिक आग्रह, पुढाकार, बोलतं करणं Group ला यात त्या दिवशी कमी पडले असं आता वाटतंय.. मला स्वतःला दुसऱ्या व्यक्तीचे खाजगी चढ उतार विचारायला आवडत नसल्याने मीच थोडी .. सांगतील तेवढे ऐकू अशा mode मधे होते... पण नंतर दुसऱ्या दिवशी पासून मी हे असलं सगळं सोडून दिले हळूहळू आणि स्वतः पण मोकळी होऊ लागले..

मी हे समजून घेतलं की ठरवून ही activity करणं अवघड आहे..जो जो जसा मोकळा होईल तसतसे त्याला स्वीकारूयात... माणसं एकत्र राहिली की सहवासाने एकमेकांना समजून घेतातच.. काही start up बद्दल बोलत राहतात तर काही digital marketing, website development, बद्दल.... 

बहुतेक सुरुवातीला 15/4 म्हणजे आमच्या कंपार्टमेंट मधेच बोलणं झालं.. पण मग नंतर सगळेच हळूहळू सैलावले.. आणि कोणीही कुठेही जाऊन गप्पा मारू लागला ,जे अपेक्षितच होतं... Like minded people मिळण्याची हीच ती प्रक्रिया सुरू झाली..

रात्री परत formally AC chair car seesion झाले msme अर्थात micro small medium enterprises वरती. टीम कशी बांधायची, विक्री करण्यासाठी संधी, focus on problem and purpose of business, understanding market demand , strength, weakness.. सूक्ष्म,लघू, मध्यम उद्योग कसे सुरू होतात वगैरे बद्दल माहिती चर्चा झाली.. बहुतेक सेशन हिंदी, इंग्रजी बहुभाषेत व्हायची..

ती बहुतेकांना समजायची प्रश्न होता फक्त इंग्रजी किंवा फक्त हिंदी समजणाऱ्या यात्रींचा... त्यांच्या साठी मग कुणीतरी दुभाषी म्हणून काम करत असे किंवा आपापल्या cohort, group मधील कुणीतरी समजावून सांगत असे...

पण ,"काय या बाई गोरखपूरहून आल्यात, कशाला आल्यात यांना काय कळणार आहे हे" किंवा "ही कशाला फ्रेंच मुलगी आलीय धड इंग्रजी येत नाही,कसं समजणार हिला"... किंवा "छत्तीसगडहून आलाय तो पण पटकन समजत कसं नाही हे इंग्रजी याला..." असं कधीच कुणी कुणाला म्हंटलं नाही.. प्रत्येक जण मदत करत होता एकमेकांना,जे नाही समजलं ते समजून सांगत होता. पेटंट मिळवलेली मुलं insta कसं डाऊनलोड करायचं हे साधं पण  सांगत होती, किंवा साईट उघडून दाखवत होता, शिकवत होता..तर पास्ता सॉस करायचा बिझनेस असणाऱ्या young startup वाल्या यात्रीला आपुलकीने लोणच्याचा मसाला तिथे वापर हा सल्ला पण यात्री देत होते... msme म्हणजे काय हे नीट माहिती नसणारे यात्री होते तसंच सगळी theory, technology माहिती आहे पण खरा बिझनेस कसा करायचा, कशाशी खातात हे माहीत नसलेला IIM वाला पण होता..

पण सगळे यात्री होते जे इथे एकमेकांचे स्पर्धक नव्हते तर वर्धक  होते.. मदतीचा हात देऊन युवा भारताला उद्योगशील बनवण्याची स्वप्नं बघणारे होते.... त्या दिवशीच्या सत्रातून सुरू झालेला हा समान धागा पक्का बांधला गेला.. बांधला गेलाय यात्रा संपली तरीही...

एक नव्या पद्धतीचं , अस्वस्थ जीवांचं, धडपड्या युवक युवती यात्रींचं एक कुटुंब बांधलं जातं होतं... आणि आमचं घर अर्थात रेल्वे या कुटुंबाला सुखरूपपणे निवारा देत होती.. कन्याकुमारीकडे घेऊन जात होती.

रात्रीचे 11 कधीच वाजून गेलेले आता वेळ होती... "प्रिय यात्रींओ सब यात्री अपने अपने डिब्बेमे जानेकी कृपा करे | समय हो गया है की अब सब अपने शरीरको विश्राम दे , कल फील मिलेंगे ,शुभ रात्री|"


प्राची परांजपे

१८ जानेवारी २०२३

टिप्पण्या

  1. ग्रुपमध्ये पुढील पाच वर्षांत मी कुठे असेल हे मांडताना सांगितलेली एक गोष्ट अजून पूर्ण करते आहे मी... १३ वर्षांनी सुद्धा.. हा स्वतः शी होणारा संवाद स्वत:ची प्रेरणा टिकवणं ही यात्रेची देण आहे...

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. हं... खरं आहे.हेच यात्रेचं बलस्थान मला पण वाटतंय.स्व संवाद सुरू करून देणं.मी नेमकं काय मांडलाय हे तू relateकरू शकत असशील ना.. वंदना खरंच परत एकदा तुझे धन्यवाद

      हटवा
  2. ब समिती सदस्य आणि प्रबोधिनीत हे exposure आवश्यक आहे... बघुया...
    तुझे प्रत्यक्ष अनुभव कथन ठेवूया, ऑनलाइन सुद्धा चालेल.. सावकाश, लेखन संपल्यावर...

    उत्तर द्याहटवा
  3. आजचा लेख चढत्या भाजणी चा.
    खूप उंचीवर जैलतुझेहे लेखन जर असेच मुक्त होऊन लिहित राहिलीस तर.
    शुभेच्छा.

    उत्तर द्याहटवा
  4. Keep writing , प्राची माझा येतेय वाचायला... आणि... मुख्य म्हणजे हे वाचताना आमचं पण विचार मंथन होतंय. खूप छान .

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग १ - इच्छा जागृतीची

भाग ३१ - यात्रा सफल संपूर्ण

भाग २५ - राजस्थान .. तिलोनीयाकडे