भाग ५ - पहिला दिवस रेल्वेतला....

स्लिपिंग बॅगमध्ये झोपले खरी पण तोपर्यंत 25 डिसेंबरचे जिंगलबेल सुरू झाले...

मी पण मग उठले, थोडी गाणी ऐकली आणि बरोबर नेलेले क्रेप रोल मोकळे करून माझ्या कंपार्टमेंटमध्ये पताकांसारखे लावले. बर्थला, पंख्याला, ओढायच्या चेनला ..... चला.. "भारी वाटतंय" असं चार लोकांकडून ऐकून घेतलं आणि  ख्रिसमस साजरा करून परत स्लिपिंग बॅग जवळ केली.

सकाळी जाग आली तेव्हा मी खालच्या अरुंद बर्थवर आणि स्लिपिंग बॅगमधेच आहे या जाणीवेने हायसे वाटले. बर्थवर स्लिपिंगबॅगमधे झोपण्याची माझी पहिलीच वेळ, सतत वाटत होतं की  स्लिपिंग बॅगमधली मी खाली पडणार.. नाही नाही.. मी स्वतःवर जिंकले होते.

जाग आली अन् लक्षात आलं सगळा डबा झोपलाय. सहाजिकच आहे आज जरा निवांत उठणार सगळे, अख्खा दिवस आम्ही रेल्वेतच असणार होतो.

चला सगळ्यात आधी रेल्वेची रचना समजावून सांगते तुम्हाला.

शेवटापासून सुरुवात करू.. क्रू मेंबरचा डबा धरला नाही तर, शेवटचा डबा लेडीज बाथरूम (महिला स्नानगृह) त्यानंतर 17,16,15 हे तिन्ही डबे  महिला यात्री निवास डबे, त्यानंतर दोन  AC Chair Car चे डबे, 12,11 हे Core team members, Dignitaries, Mentors, Press यांसाठी एसी डबे  तर 10,9,8,7,6 हे पुरुष यात्री निवास डबे. त्यानंतर  स्वैपाक डबा थोडक्यात pantry. त्या  डब्यानंतर पुरुष स्नानगृह  आणि मग इतर सुरक्षा वगैरे डबे आणि इंजिन.. तर अशी आमच्या रेल्वेची रचना! 

ही रचना सरळ एका रेषेत होती कारण ती रेल्वे होती. त्यामुळे स्वैपाकघरातून एक चहा घेऊन येणाऱ्या  दादाला  महिलांच्या शेवटच्या डब्यात जायचं तर (11/12 डबे ओलांडून) अख्खी रेल्वे ओलांडायला लागायची.

त्यामुळे खूप नियोजनबद्ध आखणी केली जायची चहा, नाश्ता, जेवण वितरणाची. ते व्यवस्थापन समजून घेणे माझ्या देखील विशेष रुचीचा विषय होता. पण ते नंतर सांगते. 

फार कुणी उठलं नाही तेव्हाच प्रातर्विधी उरकणे, कारण एका डब्यात चार स्वच्छतागृह, आणि असं रोज 15 दिवस राहायचं होतं. आम्ही रोल मॉडेल व्हिजिटला गेलो की, अख्खी रेल्वे स्वच्छता कर्मचारी झाडून घ्यायचे. स्वच्छता गृह साफ करायचे पण तरीही जोपर्यंत वापरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हे वाटत नाही तोपर्यंत कठीण आहे, हा अनुभव उच्च विद्याविभूषित यात्रींमधे पण येत होताच .असो...

प्रत्येक कंपार्टमेंटमधे कचरापेटी दिल्या होत्याच. तर मुद्द्यावर येते, अंघोळ -- हे धाडस मी फक्त बेहरामपूर पर्यंत करू शकले... अंघोळ पहाटेच आवरून घ्यायची. (नंतरची रांग आणि पाणी संपणे यापेक्षा.. लवकर उठे त्या अंघोळ घडे) आणि me time साठी, लिखाणासाठी AC chair car  मधे जाऊन बसायचं हे मी पहिल्या दिवशी पहाटे ठरवलं आणि ते मुंबईत परत येईपर्यंत पाळलं.

तर मी बाथरूम कसे आहे आणि खरंच कशी व्यवस्था असेल म्हणून मी 25 तारखेला पहाटे 5.30 वाजताच निघाले.. पूर्वी बायका गाठोडे घेऊन नदीवर जायच्या हे ऐकलं असेल ना, हसू नका हेच आठवून मी पण एकटीनेच खूप हसून घेतलंय त्या दिवशी.. (ग्रामीण भागात आजही ही स्थिती आहेच काही ठिकाणी, तर काही ठिकाणी तो बायकांच्या गप्पांचा, मोकळेपणाने बोलायच्या ठेहराचं ठिकाण असतं.) तसंच आपलं निघायचं माझ्या 15/4 मधून, दोन महिला यात्री निवास डबे ओलांडत... कुणी उठलं असेल तर वण्णकम्, सुप्रभात, hey good morning  म्हणत.., काहीवेळा उडी मारत तर काही वेळा खाली वाकत तर अनावधानाने सामान तुडवूनही.. पण पोचायचे मी रोज तिथपर्यंत. दोन वेळा अती उत्साही पाणीप्रेमींमुळे घसरूनही पडले बाथरूम जवळच्या 17 नंबर बोगीत.

आता मी महिला स्नानगृहाबद्दल  का, कशाला सांगतीय असं वाटून घेऊ नका, वाचा. जे समोर वाट्याला येईल ते खुल्या मनाने बघणे, समजावून घेणे, स्वीकारणे, गरज असल्यास बदल करणे, कोणताही विषय चर्चेला वर्ज्य नसणे ही काही तरुणाईची गुणवैशिष्ट्ये मी यात्रेत शिकलीय. काही पुटं झटकली, काही स्वच्छ केली, काही जुनीच पण चांगली वैशिष्ट्ये तरुणाईत पाझरवण्याचा प्रयत्नही केला, तर काही वैशिष्ट्ये असली तरी त्यात गुण अवगुण असं काही नसतं ती सांस्कृतिक विविधता म्हणून समजून घेत पुढे जायचे हेही नव्याने समजून घेतलं. 

तर..  तर हे स्नानगृह म्हणजे देखील product design होतं. डिझाईन मधल्या मास्टर्स डिग्री घेतलेल्या काही पूर्व यात्रींनीच  पुरुष, महिला यात्री स्नानगृह कसं बनवता येईल, काय मटेरिअल वापरता येईल यावर कल्पना विस्फोट (brain storm) केलं होतं याबद्दल नंतरच्या एका सत्रात समजले.

असो तर जेव्हा आपण यात्रेत असतो तेव्हा प्रत्येक गोष्टीतून नवनिर्माण होऊ शकते, आणि प्रत्येक गोष्ट, कल्पना, वस्तू ठरवलं तर विकली जाऊ शकते यावर ठोस विश्वास असलेली मंडळी म्हणजेच यात्रेकरू.अर्थात enterprenal  mind set.

दिवसाच्या गाडीला  जसे एकासमोर एक कुशनवाले बसायचे बाक असतात तसाच हा डबा होता. त्या दोन बाकांवर आणि बाकांमधल्या जागेत बसेल असे टब, जे प्लास्टिक / फायबरचे होते, ज्याला खाली पाणी जायला सोय होती. आणि ते दोन बाक मिळून तंबू सारखी उभारणी करून जवळपास 8 स्नानगृह तयार केली होती. सुरुवातीला आणि मधे बसक्या पण लांब रुंद पाण्याच्या तीन टाक्या ठेवलेल्या असत, बादल्या,तांबे असत. आपापले पाणी काढून घ्यायचे.


कपडे वाळत घालायला देखील सोय होती, पण अर्थातच अपुरी.. "Women बोगीज्" यावर मोठा लेख मी लिहू शकेन पण मोह टाळणार आहे. स्नानगृहांच्या सगळ्यात शेवटी अती उत्साहींचा धोबीघाट ही सुरू असे.. त्यामुळे बादल्यांची टंचाई भासे.

आता हे का लिहिले तर एवढ्यासाठी की एका चालत्या रेल्वेतून चालत चालत स्नानासाठी स्नानगृहापर्यंत येऊन, बादली मग मिळवून, पाणी उपलब्ध असेल तर स्नान करणे हा वाचताना वाटतोय तेवढा सहज अनुभव नव्हता. कधी अत्यंत गढूळ पाणी असे, तर कधी अती थंड, तर कधी पाणी नसे तर कधी जागा.. पण वेगळा अनुभव होता हे नक्की.

इकडे येण्याचा आणखी एक फायदा होता..मी 15 मधे राहायचे आणि 16,17 ओलांडून जावे लागायचे त्यामुळे अनेकींशी तोंड ओळख, तब्येत विचारपूस, पहाटे चुकून रंगत असलेल्या चर्चा, कुठे पहाट गीत, कुठे रात्रभर झोप न आल्याची चिडचिड, कुठे घरची आठवण, कुठे वस्तूंचे शेअरिंग, कुठे असुविधेने वैतागलेले जीव, कुठे "it's so thrilling  "असं काय काय कानावर पडायचं.. कधी कळत तर कधी नकळत..कारण कानाच्या झडपा बंद करता येत नाहीत.. आणि ते क्षण, खूप सहज गोळा होत होते, टिपले गेले..इतर काहीच हेतू त्यामागे नव्हता..

डब्यात परत आले तर PA system वरती ... सुप्रभात यात्री, Good morning Yatri

आशा करते है की आपकी निंद हो गयी है Hope you all have good sleep.

आणि..... असंच काहीसं.. आणि मग.... एखादं हिंदी पहाटगीत, त्यानंतर  ये जो देस है मेरा स्वदेस  है मेरा ... असं गाणं ऐकू आलं..

प्रत्येक बोगीत स्पिकर लावलेले होते, कंट्रोल रूम मधून समान सूचना एकाचवेळी देण्यासाठी ही व्यवस्था केली गेली होती..ज्यावर अत्यंत सुमधूर आवाजात यात्रींना उठवलं जायचं (अनेकांना या आवाजाचा गळा घोटावासा देखील वाटला कारण दररोज 6 वाजता हे सुरू व्हायचं), काहींना फार आवडायचं हे बोलणं, तर काहींची झोपमोड व्हायची. या PA system वरून त्या त्या प्रांतातील गीत-संगीत रोज  सकाळी तर क्वचित रात्री ऐकवलं जायचं, तिथली सांस्कृतिक ठिकाणं, भाषा याबद्दल सांगितलं जायचं.. 

जसं की मदुराई तर मीनाक्षी मंदिर आणि भारतरत्न सुबलक्ष्मी यांच्या बद्दल सांगून सुबलक्ष्मींनी गायलेलं  ऐकवलं जायचं..मी आकाशवाणीत काम करत असल्याने मला ही संथ ,शांत दिवसांची सुरुवात फार आवडायची.. जणू काही गीर्वाणवाणी, बातम्या, उगवतीचे रंग वाटायचं.. शिवाय बोलणारे दोन्ही आवाज अगदी आकाशवाणी स्टाईलने बोलायचे.

तर याच PA सिस्टीमचा उपयोग फायर ड्रील करण्याकरता देखील केला गेला..

तर मी आवरून गेले AC chair car मधे.. इथे पहाटे येण्याचे दोन तीन फायदे होते, ..फोन चार्जिंगला लावता येत असे.. .. आपापले बसून खिडकीतून सूर्योदय पाहता येत असे..  काय वाटलं, पाहिलं, ऐकलं ते त्याबद्दल लिखाण करायला शांतता मिळत असे... .. चहा बोगीत जात असेल तर जाताना आणि परत येताना असा दोन कप चहा पिता येत असे

इकडे यात्री वेगवेगळ्या कारणांसाठी पहाटे जमत. जसे की warming up, झुंबा, योगासने, फोनवर बोलणे, लिखाण, संगीत रियाज, ओरिगामी वगैरे.. यात इंदोरची M.E.structural अनिशा , दिल्लीचे कलाकार आदित्य, विरारचे फायनान्स कंन्सलटंट हर्षा, IIT मुंबईत Phd करणारी प्रियंका, डिफेन्समधे असणारे संदीप, आंध्रप्रदेश ची  इंजिनिअर चित्रकार, तर ऑस्ट्रेलियाची लाईफ कोच अम्रिता, झुंंनझूनवाला मॅडम, मेघा, पब्लिशिंग हाऊस मधे काम करणारी वर्षा आणखी खूप असायचे.... काही अगदी नियमित काही जमेल तसे.. पण प्रत्येक जण सगळ्यांमध्ये असले तरी या तासाभरात स्वतः साठी  me time साठी यायचे हे नक्की... 

खरंतर पहिला म्हणजे 25 डिसेंबर चा पूर्ण दिवस आम्ही रेल्वेतच असणार होतो..हा तसा रेल्वेतला पहिला दिवस होता.. सकाळच्या नाश्त्यापासून ,जेवण, मधलं खाणं आणि रात्रीचं जेवण रेल्वेत झालं.. मी थक्क झाले होते हे बघून.. कसं करतात, कुठं करतात,कसं ठरवतात , वाहतूक, बापरे... उद्याच जाऊन बघून यायचं मी ठरवलं.

पण तो संपूर्ण दिवस खूप काही घडलं. यात्रेत एकुण प्रवासाचे तीन टप्पे पडतात....

पहिला टप्पा मुंबई ते चेन्नई पर्यंतचा याला यात्रेत Exploration Leg म्हंटलं जातं.

दुसरा टप्पा विशाखापट्टणम ते दिल्ली याला Creation Leg म्हंटलं जातं.

तिसरा टप्पा दिल्ली ते अहमदाबाद याला Integration Leg म्हंटलं जातं.

आम्ही पहिला टप्पा सुरू केला होता... Exploration... थोडक्यात ओळख, एकमेकांना समजून घेणे, कोण कुठे, काय वगैरे... पूर्ण दिवस.... गप्पा, बडबड, series talks with Co Yatris ...

हे जसं सहज केलं तसंच  ठरवून केलं.  ते काय याबद्दल उद्या सांगते..

पण हा 25 डिसेंबरचा दिवस मला वर्षातला सगळ्यात मोठ्ठा दिवस वाटला त्या दिवशी. Exploration चं explosion झालं या दिवशी... 

आजच्या लेखात मुळात तुमची रेल्वेशी,डब्यांची ओळख करून द्यायची होती.. एकदा घर समजलं की माणसं जोडणं सोपं जातं म्हणतात.. किंवा माणसं जोडली तर घर समजतं म्हणतात...आमचा प्रवास दोन्ही बाजूंनी सुरू झाला होता.


प्राची परांजपे 

17 जानेवारी 2023

टिप्पण्या

  1. 🙏प्राची ताई,........ शब्द अपुरे आहेत. अप्रतिम.. 🌹🌹💐💐

    उत्तर द्याहटवा
  2. एकदा घर समजलं की माणसं समजत जातात!
    vvah. Prachy.

    उत्तर द्याहटवा
  3. खूप छान वाटले शेवटचे शब्द एकदा घर समजले की माणस समजत जातात

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग १ - इच्छा जागृतीची

भाग ३१ - यात्रा सफल संपूर्ण

भाग २५ - राजस्थान .. तिलोनीयाकडे