भाग ४ - आणि यात्री जमले

नवीन दिवस उजाडला, 24 डिसेंबर 2022.

चेंबूरच्या हॉटेलच्या छोट्याशा खोलीत योगासने केली, आवरले...

पुढचे 15 दिवस केस धुवायचे सोडा, अंघोळ तरी मिळेल का या विचाराने निवांत आवरले.

अहमदाबादहून आलेले फॅसिलिटेटर  श्री. हार्दीक हे माझ्याच हॉटेल मधे आहेत असे समजले होते, त्यांनी आणि मी टॅक्सीने यशवंतराव चव्हाण सभागृह, नरिमन पॉइंटला एकत्र जायचे ठरवले, जिथे आज यात्रेचा  उद्घाटना सोहळा होणार होता. सायन रुग्णालयाजवळ मेघा म्हणून एक Facci थांबलेली तिला पण आमच्या टॅक्सीत घेतले.

रिअल इस्टेट मधे काम करणारे हार्दिक आणि सोलो ट्रॅव्हलर मेघा यांच्या बरोबर गप्पा सुरू झाल्या. माझ्या व्यवसायाबद्दल बोलणे झाले, अहमदाबादमध्ये काय करता येईल, संपर्क नंबर देणे घेणे झाले. (काल फॅसिलिटेटर प्रशिक्षण झाले असले तरी 72 माणसं वाचून होत नाहीत, आणि गरज पण नसते , त्यामुळे मी यांच्या बरोबर फार बोललेच नव्हते, नंबर तर सोडाच.)

सकाळच्या प्रहराचा हात पकडून उठून धावायला लागलेली मुंबईनगरी टॅक्सीच्या खिडकीतून दिसत होती.मुंबईचं ऊन स्वच्छ,  छान वाटत होतं कारण आम्ही मनातून उद्घाटन सोहळा आणि यात्रींना भेटायला उत्सुक होतो.

सकाळी 10 च्या सुमारास नरिमन पॉइंट, यशवंतराव चव्हाण सभागृहाच्या प्रांगणात पोचलो.....

एखादे कार्य असावे तशी गडबड, तरुणाईचा ओसंडता उत्साह, मोठमोठाल्या बॅग सावरत आलेल्या युवती, पोचवायला आलेले पालक लगबग, आतूरता, नजरेत शोध, तर काही युवक निवांत, अत्यल्प सामानात, 

काहींना रजिस्ट्रेशन करण्याआधी बॉम्बे का वडापाव खाना था.. तो कोई पेहली बार घरसे निकल रही थी.. कोई तो साथ साथ एकही शहरसे आये थे, तो कोई अचानक से मिला पडे..

मुंबईत येऊन अचानक तेलगू भाषिक भेटल्याचा आनंद कुणाच्या चेहऱ्यावर दिसत होता तर कुठल्याशा गटात तोडफोड हिंदी इंग्रजीत संभाषण चालू होतं आणि "अरे काय रे हे... किंवा. " हो का? मला माहित नव्हतं " असं पटकन कुणी बोलायचं आणि मग अरेरे.... मराठी येतंय होय मग बोला की मराठीतच, असं व्हायचं, तर त्यात एखादा विजापूरचा यात्री "थोड्डं कलतंय पण इंग्रजी बोला की ओ..It will easy for me" अशी विनंती करायचा (पहिला च दिवस होता ओ..नंतर विनंती वगैरे काही नाही जाच सुरू झाला, पण प्रेमळ) 

कोविड डोसचे सर्टिफिकेट, आधार,पॅनच्या झेरॉक्स असं सगळं करून  आम्ही आमचं रजिस्ट्रेशन करून आम्ही Facci Tag ,यात्रींनी Yatri Tag आणि जागृती टीम अर्थात ERC (Engine Room Club)च्या कार्यकर्त्यांनी ERC Tag , विशेष वक्ते किंवा जागृती कोअर टीमने ते हिरवे Tag गळ्यात अडकवून घेतले.

यालाच पुढे "यात्रा मंगलसूत्र" म्हंटलं जायचं. काही झालं तरी गळ्यातला हात ओळखपत्रपट्टा हवाच. गमतीने शशांक मणी त्रिपाठी याला " ये यात्रा मंगलसूत्र है सोते समय भी गलेसे उतारना नहीं " असं म्हणायचे.. इथून पुढं खरंतर सगळेच यात्री झाले, कामाच्या स्वरूपानुसार या ओळखपट्टीचे रंग वेगळे इतकंच.. पण मूळ रंग एकच "जागृती यात्रा के यात्री"

मूळ उद्देश हा की पटकन यात्री सापडावेत. या ओळखपत्रावर यात्रीचा फोटो, त्या यात्रीचं नाव, बोगी नं, cohort नंबर, ग्रुप नंबर सगळं छापलेले होतं. शिवाय अडचण आलीच तर आपत्कालीन दोन फोन नंबर पण दिले होते.

तर... हे झालं मंगळसूत्राबद्दल.. आम्ही बऱ्याच  यात्रींना cohort, group, याबद्दल माहिती दिली.. आपणहून.. जी गरजेचीच होती.

मी आणि ओरिसाच्या नीना मॅडम फिरायला बाहेर पडलो, सभागृहाशेजारी आवारात आठवडी बाजार होता... मी त्यांना त्यांनी मला आपापल्या भाषेत भाज्यांची,फळांची  ओळख करून देत फेरफटका मारला. त्या ओरिसात मोत्यांची शेती करतात, स्टिव्हिया शेती, उत्पादन करतात.. कालच समजलेलं आणि एक ताई म्हणून मला त्या पहिल्या भेटीतच आवडलेल्या.

तशीच मुंबईची  Facci वर्षा .. रश्मी बन्सल या लेखिकेबरोबर त्यांच्या पब्लिशिंग हाऊसमधे काम करते... उत्साही व्यक्तीमत्व..

पूजा तेंडुलकर ही अशीच एक तरुण फॅसिलिटेटर.. पाणी,सॅनिटेशनमधे स्वतः ची संस्था चालवते .. dynamic personality.

सातारच्या माणदेशी माणसं बॅंकेच्या माध्यमातून स्वतःचा व्यवसाय चालवणाऱ्या चौघी सातारकर यात्री भेटल्या.खरंतर माझ्याच वयाच्या..यात्री म्हणून आल्या होत्या. अजिबात बुजऱ्या नव्हत्या..फाडतोड हिंदी बोलत होत्या, इंग्रजी नाही समजत हे सरळ सांगत होत्या... उत्तम लघूउद्योजिका.. त्यांच्यासाठी तर हा प्रवास पर्वणी होता.... खरंतर त्या मजेत होत्या पण "काही लागलं तरी सांगा, बिनधास्त रहा" असं मीच उगीचच त्यांना सांगितलं.

उगीचच अशासाठी की त्यांना भाषेचा अडसर होता, शहरी exposure कमी होतं, विविध स्त्रीपुरूष वयोगटातील शहरी लोकांत मिसळायचा अनुभव कमी होता... अर्थात या त्यांच्या मर्यादा मला वाटतं होत्या... त्या एकदम जोरात होत्या.. 

शहरी निम शहरी ठिकाणाहून अनेक यात्री होते, यात्रेचा तो एक उद्देशही होता.. सर्व आर्थिक, सामाजिक, भौगोलिक स्तरातील उद्योजक, किंवा काही वेगळं करण्याची अस्वस्थता असणारे  युवक युवती एकत्र आणणे..

तर आपापले सामान नावाच्या चिठ्ठ्या लावून रेल्वे कडे पाठवून देण्याची व्यवस्था होती.. त्यामुळे फक्त दिवसभर लागणारी पिशवी जवळ बाळगली तरी पुरेशी होती.

हे सामान, चिठ्ठ्या, पाडलेले गट, Tags देणे जागृतीसाठी दिल्ली च्या गूंज संस्थेनी बनवलेल्या झोळ्या प्रत्येक यात्रीला देणं, त्यात पेन, वही आहे ना पाहून देणं,  त्या दिवशी साठी जेवण, चहा कुपन्स, सारं सारं सुबुद्ध, अत्यंत नियोजनबद्ध.

यासाठी  जागृती समितीने हे काम सुद्धा उत्तम पद्धतीने outsourcing केलं होतं किंवा मुंबईतील व्यवस्थापन महाविद्यालयातील मुलं अनुभव म्हणून हे काम करत होती, त्यांना सहभागी करून घेतलं होतं.

मूळ जे यात्रा कार्याची माहिती देण्याचं  घडायचं होतं ते जेवणानंतर सुरू झालं. कालच्या लेखात मी लिहिलंय  तसं India is not pyramid but it's Dimond ही संकल्पना शशांक मणी त्रिपाठींनी सर्वांसमोर मांडली.  प्रगती, केशव, अर्चना, आशुतोष (CEO of Jagriti) यांनी रेल्वे कशी असेल, डब्यांची रचना, काय कुठे कसं करायचं, का वगैरे तपशील दिले...

पण सतत सगळे एकच पालूपद उगाळत होते... "सब तो ठीक है पर अभी ट्रेन हमे मिली नहीं है" आता ही सस्पेन्स वाढवण्यासाठीचा भाग होता की खरंच हवे ते डबे हवे तिथे जोडून एकसंध रेल्वे तयार नव्हती... यामागचा हिरो होता,  चिन्मय वडनेरे जो चीफ ऑपरेटिंग ऑफिसर होता. थोडक्यात रेल्वे वेळेवर आणि हवे तसे डबे येण्यासाठी तो गेले आठ महिने जीवाचं रान करत होता. रेल्वेचे मुख्य अधिकारी चतुर्वेदी आणि चिन्मयने रेल्वे मिळण्यातल्या अडचणी, सगळे डबे भारतातून वेगवेगळ्या प्रांतातून येतात, हवे ते डबे पटकन मिळत कसे नाहीत. अर्ज आधी दिले तरी व्यावहारिक अडचणी काय वगैरे सांगितलं...

आपण ज्या रेल्वेने जाणार आहोत ती एकसंध रेल्वे नसून यात्रींप्रमाणेच देशभरातून डबे एकत्र आणून जोडलीय तर.... या कल्पनेनेच मला national integration चा feel आला..

मधे मधे सांस्कृतिक कार्यक्रम वादन, नृत्य सादरीकरण वगैरे झाले.. फारच छान सादरीकरण झालं. 

सगळ्यात कमाल केली गौरी त्रिपाठीने शिकवलेल्या आणि प्रसून जोशी लिखित गीताने...... आहा.. 

यारो चलो बदलाने की रुत है

          यारो चलो सवरने की रुत है....

हे यात्रा गीत.. म्हणजे सगळं सार, सगळा जोश, सगळं एकत्रीकरण, सगळं भारावलेपण.. 

दरवेळी कुठूनही निघताना आपण अच्छा म्हणतो, आश्वासन देतो, निरोप घेतो  तसेच  प्रत्येक ठिकाणी यात्रेत हे गीत आम्ही सादर करायचो."it was Yatra ritual ..which circulates  energy in every yatri"... One comment from our little young Yatri girl on last day...

हो माहितीय मी तुम्हाला अजून रेल्वेत चढवलं नाही 

पण थोडं पुढं मागं होणार... अहो, यात्रेचं दिवसाचं वेळापत्रक कोलमडायचं ते माझ्या मनाचं काय घेऊन बसलात... त्या त्या वेळी लिहिलेले मुद्दे समोर असले तरी ते मांडायला प्लॅटफॉर्म रिकामा लागतो ना... इथे किती गर्दी आहे डोक्यात.. कमीतकमी शब्दात बसवायचंय ना, ताणलं तर वाचणार नाही तुम्ही ..

ज्ञान प्रबोधिनीत पद्य कल्पना फार रुजलेली आहे... तशीच माझ्या मनात पण, त्यामुळे मला यात्रा गीत फार आवडायचं. फक्त हे गीत गायचं नसायचं तर देहबोलीतून पण साकारलं जायचं...

तर  उद्घाटन झालं..

सर्वच पाहुण्यात लक्षात राहिल्या माणदेशी बॅंकेच्या संस्थापिका आणि महिला उद्योजक विकास कार्यातील ज्येष्ठ कार्यकर्त्या चेतना गाला सिन्हा.. महिलांना आर्थिक सक्षम बनविण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि लग्नानंतर सातारजवळच्या माणदेशसारख्या छोट्या दुष्काळी भागात येऊन राहण्याची त्यांनी दाखवलेली तयारी, हिंमत, उभं केलेलं काम.. स्वातंत्र्यपूर्व काळातील नेत्यांबरोबर केलेले जाणीव जागरणाचे प्रवास आणि ही जागृती यात्रा यातलं त्यांना भावलेलं साम्य.. या गोड आजीला ऐकत रहावं असं वाटलं. (सर्वांना मुद्दाम अधिक काम समजून घ्यायचं असेल तर चेतना गाला सिन्हा असं गुगलवर टाईप करावे... मी इथं थांबते.)

दुसरे वक्ते लक्षात राहिले प्रदीप लोखंडे.. "भारतात जे झालं नाही,चुकीचं घडतंय, वाईट आहे यावरच जास्त बोललं जातं.. आपण चांगलं बघतच नाही,बघितलं तरी समजून घेत नाही, घेतलंच तरी सकारात्मक काही घडतंय हे बोलतच नाही हा खरा भारतीय विचारसरणीचा कच्चा दुवा आहे.. अरे जे छान आहे त्याला छान म्हणा की"... फारच रांगड्या भाषेत पण दिलखुलास चिमटे काढत त्यांनी संवाद साधला.  मुलांसाठी देणगी म्हणून पुस्तके मिळवून त्यांनी ग्रामीण भागातील ग्रंथालये उभी केली आहेत. देणगी म्हणून पुस्तके स्वीकारताना ते एका पोस्ट कार्डावर  पत्ता भरून घेतात. दिलेले पुस्तक मुलाला आवडले तर तो मुलगा पुस्तक दात्याला त्या पोस्ट कार्डवर पत्र लिहून कळवतो. महाराष्ट्र आणि बाहेरील राज्यांमध्ये आजवर 3600 च्या वर ग्रंथालये उघडली आहेत.. (प्रदीप लोखंडे गुगलवर टाईप केलंत तर आणखी तपशीलवार माहिती मिळेल.)

ग्रामीण मुलांसाठी आणि ग्रामीण महिलांसाठी प्रत्यक्ष काम करणाऱ्या दोन्ही वक्त्यांनी यात्रींनी संपूर्ण यात्रेत काय बघायचं, शोधायचं यांची झलकच दाखवली. हळूहळू खूप भारावलेपण यायला लागलं होतं. सभागृह यारो चलो ने भरून गेलं होतं... आणि ढोल ताशे वाजू लागले... जागृती यात्रेला सुरुवात म्हणून झेंडा फिरवला गेला..ढोल, झांज, ताशा .. वातावरण एकदम गणेशोत्सवात आहोत काय असं झालं.... तोच  गजर घुमवत रात्रीचं जेवण तिथेच झालं... उत्तम जेवण होतं आणि सारखं सांगितलं जात होतं  "खा लो ट्रेनमे इतना अच्छा खाना नहीं मिलनेवाला"  म्हणजे नेमकं काय की उगाचच भीती घालणे, गंमत करतायत असं वाटलं..  रेल्वेतलं जेवण याविषयी बोलेनच मी ....पण सध्या सीएसटी वर जाण्यासाठी बसेस यायला लागल्या.. ( हे माझं बोलणं/लिहिणं जरा flash Black, flash front होतं राहणार समजून घ्या. मी हाडाची लेखिका नाही)

एकेक करत बस भरत गेल्या आणि यशवंतराव चव्हाण सभागृह खाली झालं...

यात्री रेल्वे स्टेशनवर दाखल होत राहिले... आपापल्या बोगीसमोर स्वतः चं सामान शोधून घेत गप्पा चालूच ठेवत रेल्वे येण्याची वाट पाहू लागले... कोकाकोलाने पाणी प्रायोजित केलेलं .. त्या बाटल्या, जेवणासाठीचा शिधा, इतर सामान फलाटावर येत राहिलं...... आणि बहुप्रतीक्षित जागृती रेल्वे आली.... अनेकांच्या नजरा उंचावल्या, साधीच रेल्वे सारखी रेल्वे दिसल्यावर वाकड्या देखील झाल्या.. एकिकडे सतत गुगल करणाऱ्या यांना जागृती रेल्वे कशी असणार हे जणू माहीत नव्हते... हे म्हणजे पसंत केलेल्या स्थळाला नाही कळवण्यासारखे होते.. इंजिन आणि मागे 18 डबे जोडलेली आमची रेल्वे समोर उभी होती.. आमचं पुढच्या 15 दिवसांची चालतं, बोलतं, खातं ,नांदतं ,नाचतं , अभ्यास घरच हे.

बोगीचे डबे उघडले आणि सगळे सामानासकट आत शिरले. (डबा शब्द वापरायला हवा... पण या सर्व लेखमालेत मी मिश्र शब्द, इंग्रजी, हिंदी शब्द, मधेच खरंतर मराठीत कानाला खटकणारे शब्द मुक्त मनाने वापरणार आहे, माझ्यातली संपादक, मुद्रित शोधक मला याबद्दल माफ करणार नसली तरीही.)

तर माझी जागा होती 15/4 म्हणजे 15 नंबरचा डबा आणि 4 नंबरचं कंपार्टमेंट. असे ज्यांच्या गळ्यातील कार्डावर लिहिले होते त्या मुली जमा झाल्या.एका समोरचे 3- 3 बर्थ आणि बाजूचे 2 असे एकुणात 8 बर्थ. एक सामानासाठी रिकामा आणि एक मुलगी कमी होती आमच्या cohort मधे म्हणून तो ही रिकामा. आम्ही एकुण 6 जणी आणि 8 बर्थ असं आमचं हे छोटंसं कंपार्टमेंट म्हणजे एक खोली..

सगळे स्थिर होऊन, सामान चढून, हेडकाऊंट होऊन रेल्वे सुटायला रात्री 12.30/1 वाजला. नंतर मात्र आता पुरे... उद्या बोलू, ऐकू असे होऊन मी स्लिपिंग बॅगमध्ये स्वतःला बंद केले. मला झोपायचं होतं आणि माझा बर्थ खालचाच होता, अख्खा डबा जागा होता.... 

मला माहीत आहे तुम्हाला वाचताना खूप प्रश्न पडले असणार, उत्सुकता असणार पण  पण आज त्या Facci प्राचीला झोपेची गरज आहे. 

उद्या बोलू.

प्राची परांजपे

16 जानेवारी 2023

टिप्पण्या

  1. चांगलं लीहित्येना!
    सुंदर लिहिते ना ही!
    खूपच chhan

    तिचे automatic पुस्तक
    लिहून होईल.


    बिनधास्त जाऊ दे गाडी.


    उत्तर द्याहटवा
  2. खूपच ओघवती भाषा...तुझ्या पाठोपाठ चढले मी ट्रेन मध्ये आणि आता झोपते.😀😀.. उद्याच्या ब्लॉग ची वाट पाहते आहे

    उत्तर द्याहटवा
  3. प्रत्युत्तरे
    1. सोबतची रेल्वे आणि यात्री दोन्ही वेगात धावत होते ना त्यामुळे हा परिणाम..
      सर, नमस्कार

      हटवा
  4. कसलेल्या लेखका प्रमाणे लिहले आहे छान सुंदर

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग १ - इच्छा जागृतीची

भाग ३१ - यात्रा सफल संपूर्ण

भाग २५ - राजस्थान .. तिलोनीयाकडे