भाग १ - इच्छा जागृतीची

 " मेरी आवाज ही पहचान है.." असं लता मंगेशकरांसाठी जेवढं खरं आहे तेवढंच ज्यांना ज्यांना अनुभवकथन लिहिण्यापेक्षा बोलून सांगायला,पोहोचवायला आवडतं त्यांच्यासाठी पण हे खरं आहे. 

सुरुवातीला जरा जास्तच मोठं वाक्य झालंय, समजून घ्याल अशी अपेक्षा.

तर, मला देखील गोष्ट सांगितल्याप्रमाणे बोलून अनुभव सांगायला किंवा अनुभव बोलके करून सांगायला आवडतात.

जागृती यात्रेवरून परत आल्यावर असंच काही भागात करावं असं मनात होतं.पण , पण काय अहो, माझा आवाज तर ठिकाण्यावर असायला हवा ना.

आम्ही अहमदाबाद सोडलं आणि माझ्या आवाजाने मला.

९ जानेवारीला पहाटे सांगलीत पोहोचले, घशातून एकही शब्द फुटेना..

मुली जरा वैतागल्या, आईला इतकं शांत,न बोलता बघायची सवय नाही ना.. पण नवऱ्याला आनंद झाला... चला,  निदान चार दिवस तरी बायको बोलणार नाही, ऐकवणार नाही, सूचना करणार नाही.

विनोदाचा भाग सोडला तरी खरंच घसा पूर्ण सुजलाय, दर मिनिटाला चारवेळा खोकला येतोय.. खूप झोप येतीय, पण " परत आलीस का? कशी झाली यात्रा? कधी भेटूया? इतकं काय केलंस तरी काय १८दिवस?" अशा आशयाचे मेसेज आणि फोन यायला लागले.

फोन नवराच उचलत होता, मेसेजला मी उत्तर देत होते, देत आहे.

खरंतर सगळं सांगायचंय,पण शब्द रुसलेत, अंगात ताकद नाही पण उर्मी गप्प बसून देत नाही.

ज्ञान प्रबोधिनीमधील स्नेही, ज्येष्ठ कार्यकर्ते यांचे देखील विचारपूस करणारे मेसेज आले आणि ठरवलं, जसं वाटेल, येईल तसं लिहायला सुरुवात तर करूया..पुढचं पुढं...

तर त्याचं काय झालं की...

जरा मागे  २०२२च्या ऑगस्ट महिन्यात जाऊया.

जागृती यात्रेबद्दल खूप वर्ष मनात होतं.

आमची मैत्रीण वंदना कामठे २००८/९च्या टाटा जागृती यात्रेला जाऊन आली होती... तिच्या कडून ऐकलं होतं, उत्सुकता होती.

पण नंतर सलग १०वर्षे म्हणजे २०१८ पर्यंत विषय डोक्यातून काढून टाकला होता, शक्यच नव्हतं या काळात.

मग परत २०१८ ला सहज सर्फिंग करताना जागृती यात्रेचा जुना व्हिडिओ बघितला आणि भूत परत मानगुटीवर बसलं.

साईट उघडली, पण एकुणात खूप काय काय करायचंय असं लक्षात आलं आणि आळशीपणाला जवळ करून नाद सोडला.

२०१९ला एकदा परत उबळ आली आणि विरली.

२०२० आणि २०२१ ला  कोरोनामुळे यात्रा ऑनलाईन होणार हे लक्षात आलं, आणि मला  इंटरनेटवर कितीही छान झाली तरी यात्रा करायची नाहीये असं मी ठरवून टाकलं.

बघता बघता २०२२ सालचा जुलै उजाडला.

आमची मोठी मुलगी १०वीत गेलेली. धाकटी ४थीत.

माझा स्वतःचा सुरू केलेला व्यवसाय मी वाढवलेला आहे आणि ठरवून खूप पण वाढवलेला नाही पण..पण  तेवढा आहे, म्हणजे तरीही पुरेसा वेळ द्यावा लागण्याच्या ठिकाणी पोहोचलाय. आकाशवाणीमधे ड्यूटी नको लिहिलं तर चालेल अशी सध्या परिस्थिती, पूर्वी सारखं काम नाही. डिसेंबर मधली नेवरे(कोकणात बागेत कामासाठी) फेरी माझ्या वाचून आडणार नाही याची खात्री होती.याशिवाय माझ्या डोक्यात जे ऐत्यावेळी किंवा दर काही दिवसांनी किडे येतात त्यांना आधी ठरवलं तर थोपवून धरतात येईल याची मनात केलेली तयारी...

असं बरंच काही ठरवून, विचार करून जागृती यात्रेची साईट उघडली. फॉर्म फी १००रु भरले.

लॉग इन करून घेतले.

समोर भला मोठा फॉर्म माझी वाट बघत होता..

तो हिंदी किंवा इंग्रजीत भरायचाय, हे लक्षात आले. हिंदी पेक्षा इंग्रजी बरे.. म्हणून इंग्रजीला जवळ केले. फॉर्म सेव्ह करताना  सलग वेगवेगळ्या टप्प्यांवर माहिती,मतं, निबंध, बरंच काही पुढे वाढून ठेवलेलं होतं.

आता कुठे या सगळ्यात पडा.. असं वाटून पुढचे चार दिवस काही केलेच नाही.

ऑगस्ट उजाडला.

अमरला सांगितले तर तो म्हणाला, "अगं लगेच निवड थोडी होणार आहे, आणि झालीच तर मी सुट्टी घेऊन राहीन की मुलींसाठी"

ओह.. एवढं ऐकलं आणि मग मात्र आता माघार नाही असं ठरवलं.

तुम्ही कुणाला रोल मॉडेल मानता आणि का, तुमच्या भागातील शेतीच्या तुम्हाला काय समस्या वाटतात इथं पासून ते सध्याच्या तरुणांबद्दलचे तुमचे मत काय आहे? स्त्रीयांचं व्यवसायात स्थान, वावर ,  तुमच्या Extra curricular things, शिक्षणेतर काय काय केलंत....असे बरेच दीर्घोत्तरी, लघुत्तरी प्रश्न..

खरंतर तो सगळा प्रश्न -उत्तरांचा -निबंधाचा, भाग मी माझ्या अती दिव्य इंग्रजीत एका दमात म्हणजे तब्बल तीन तासांतच लिहून काढला. आधी लिहून मग तिथे उतरवले किंवा खूप विचार करून वगैरे मी फॉर्म भरत नव्हते. जे मनात येईल, इतकी वर्ष विचार केलाय तो उतरवत गेले बस.

(धाकट्या मुलीला खेळाच्या मैदानावरून परत आणायला जायचे होते, त्याच्या आत संपवणे हे ध्येय होते कारण  तरच मी विनाथांबा लिहू शकणार होते.)

शैक्षणिक प्रमाणपत्र वगैरे परत घरी आल्यावर रात्री अपलोड केली.

२२ ते २५ हजार लोक फॉर्म भरतात ऐकलं होतं, त्यात IIT, IIM, CA वाले पण असतात असं कळलेलं, पण तरीही केवळ उच्च शैक्षणिक पात्रता निवड व्हायला पुरेशी नाही हे पण वाचलं होतं म्हणून जराशी आशा वाटत होती.

ज्ञान प्रबोधिनीमधील विविध शिबीरे,मेळावे, अभ्यास दौरे, युवक युवतींबरोबर केलेलं काम, विचार मंथन, स्पर्धा, योगासने, आकाशवाणीवरील सलग काही वर्षे केलेलं निवेदनाचं  काम, स्वतःचा व्यवसाय... आणखीही काही गोष्टी होत्या ज्या मला कदाचित वेगळं ठरवू शकल्या असत्या. मी फॅसिलिटेटर म्हणून फॉर्म भरत होते, म्हणजे मी काही क्षेत्रात अनुभव घेतलेला आहे किंवा असणे गृहीत होते. यात्री म्हणून तुम्ही २०-३० वयाचे असावेत. फॅसिलिटेटर्स म्हणून ३० च्या पुढील वय हवे.

अर्थात याला ठोस नियम नाही. वय वर्षे ४० असणाऱ्या काही बायका यात्री म्हणून आल्या होत्याच, त्या देशातील विविध भागात स्वतःचा उद्योग करत होत्या. त्यांना गरज फक्त अशा मंचावर येऊन बोलण्याची होती, भाषेचा अडसर होता इतकंच.

सविस्तर लिहीनच यावर.

तर,

मला फॅसिलिटेटर म्हणून जाण्याची इच्छा होती, गाठीशी थोडा अनुभव होता, वय होतं इतकंच.

थोडक्यात काय मी फॉर्म आणि इतर गोष्टी पाठवून दिल्या.

सप्टेंबरमध्ये उत्तर आलं, 

You Are Selected. Ask for funding or scholarship.

मग आनंद तर झालाच पण मग Scholarships साठी पत्र तयार करणे, मला कशी गरज आहे आणि मला आपापल्या पैशावरच कसं यात्रेत यायचं आहे, नवऱ्याकडून पैसे घ्यायचे नाहीत वगैरे प्रस्ताव, माझं इन्कमटॅक्स सर्टिफिकेट जोडणं, 

शिवाय एकीकडे मुलाखतीची वेळही ठरली. आमचे मित्र वंदना आणि विक्रम कामठे यांची प्रशासकीय अधिकारी मैत्रीण विद्युत वरखेडकर हिचा सल्ला घेतला मुलाखती साठी.

तिने बऱ्याच गोष्टी सांगितल्या.

अखेर मुलाखत पार पडली.. जवळपास पाऊण तास मुलाखत झाली, गप्पा झाल्या म्हणूया.

ज्ञान प्रबोधिनीमधील अनेक उपक्रम मी सांगितले की जिथे मी ताई म्हणून काम केले होते... २००५  ईशान्य भारतातील दौरा, अनुभव यासाठी सगळ्यात कामी आला.

"तो" रेल्वेचा किस्सा ऐकवला आणि बहुतेक मुलाखत घेणारीला वाटलं की काही नाही तरी, मी लोकांना सुखरूप परत आणू शकेन.

असो.

यशावकाश सगळं जुळून आलं आणि माझी निवड झाल्याची खात्रीशीर मेल मला मिळाली.

महिना होता सप्टेंबर.

म्हणजे प्रत्यक्ष यात्रेला जायला तब्बल अडीच महिने नक्की होते...

फ्लॅशबॅक शिवाय प्रत्यक्ष सिनेमाच्या गोष्टीला मजा नाही किंवा हल्लीच्या भाषेत making of... ला महत्त्व आहेच ना..तशीच काहीशी ही पूर्वपिठीका...

प्राची परांजपे 

१२ जानेवारी २०२३

टिप्पण्या

  1. खूप शुभेच्छा.
    खरंच पुढचा भाग वाचायला आवडेल यात शंका नाही

    उत्तर द्याहटवा
  2. सुरवात तर एकदम बढिया आणि उतरोत्तर आणखी रंगत वाढणार यात शंका नाही

    उत्तर द्याहटवा
  3. खूप मस्त! पुढच्या भागाची उत्सुकतेने वाट पाहते आहे 🙂

    उत्तर द्याहटवा
  4. चांगली सूरवात आहे. पुढच्या लेखाची उत्सकता वाढली आहे

    उत्तर द्याहटवा
  5. अप्रतिम व्यक्त झाल्या आहात प्राचीताई

    उत्तर द्याहटवा
  6. अप्रतिम व्यक्त झाला आहात प्राचीताई 🌷🌷पुढच्या भागाची आतुरतेने वाट बघत आहे 😊👍

    उत्तर द्याहटवा
  7. वाचता वाचता रेल्वे स्टेशनवर आल्यासारखे वाटले.
    - अभिजित बेल्हेकर 👍🏼

    उत्तर द्याहटवा
  8. हे भारी आहे प्राची. 👌👍पुढचा भाग वाचायची उत्सुकता आहे आता.

    उत्तर द्याहटवा
  9. आज वाचण्याचा योग आला, तुझ्या लिखाणाचा आस्वाद घ्यायचा म्हणुन थोड निवांत वाचायचे ठरवले...सुरवात उत्तम, उत्सुकता वाढवणारी..

    उत्तर द्याहटवा
  10. खूप छान लिहिले आहेस प्राची, पुढचं वाचायची उस्तुक्ता वाटत्ये

    उत्तर द्याहटवा
  11. तुझ्या “त्या” अनुभवाचा भाग होते त्यामुळे थेटं भिडलं काय म्हणते आहेस ते. पुढचे भाग वाचायची उत्सुकता आहे 😃

    उत्तर द्याहटवा
  12. खूप छान पुढे वाचण्याची ओढ लागली

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग ३१ - यात्रा सफल संपूर्ण

भाग २५ - राजस्थान .. तिलोनीयाकडे